श्रीगुरुगीता

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीसद्गुरुनिजानंदाय नम: ॥
ॐ नमो सद्गुरु परब्रह्म । तूं निर्विकल्पकल्पद्रुम ।
हरह्रदयविश्रामधाम । निज मूर्ति राम तूं स्वये ॥१॥
तुझा अनुग्रह जयां घडे । तयां नाही कांही सांकडे ।
दर्शने मोक्षद्वार उघडे । तुझेनि पडिपाडें तूंचि तूं ॥२॥
कोणे एके दिवशी । श्रीसदाशिव कैलासी ।
ध्यानस्थ असे तो मानसी । पुसे तयासी पार्वती ॥३॥
जयजयाची परात्परा । जगद्गुरु कर्पूरगौरा ।
गुरुदीक्षा निर्विकारा । श्रीशंकरा मज देई ॥४॥
कवणे मार्गै जी स्वामी । जीव ब्रह्मरुप होता ते मी ।
पुसतसे तरी सांगिजे तुह्मी । अतर्यांमी कळे ऐसे ॥५॥
कृपा करावी अनाथनाथा । ह्मणोनि चरणी ठेविला माथा ।
नासोनिया भवव्यथा । कैवल्यपंथा मज दावी ॥६॥
ईश्वर ह्मणे वो देवी । तुझी आवडी मातें वदवी ।
लोकोपंकार प्रश्न पूर्वी । देवी दानवीं जो न केला ॥७॥
तरी दुर्लभ या त्रिभुवनांत । ते तूं ऐके वो सुनिश्चित ।
सद्गुरु ब्रह्म सदोदित । सत्य सत्य वरानने ॥८॥
वेदशास्त्रपुराणा । मंत्रतंत्रादि विद्या नाना ।
करितां तीर्थव्रततपसाधना । भवबंधमोचना न पावती ॥९॥
शैव शाक्त अगमादिके । अनेक मतें अपभ्रंशके ।
समस्त जीवा भ्रांतिदायके । मोक्षप्रापकें नव्हतीच ॥१०॥
जया चाड पराभक्ति । तेणे सद्गुरु सेवावा एकांती ।
गुरुतत्त्व न जाणती । मूढमती जन कोणी ॥११॥
होवोनि नि:संशय । सेवावे सद्गुरुपाय ।
भवसिंधूतरणोपाय । तात्काळ होय जडजीवां ॥१२॥
गूड अविद्या जगन्माया । अज्ञान संहारित जीवा या ।
मोहांधकार गुरु सूर्या । सन्मुख यावया मुख कैचे ॥१३॥
जीवब्रह्मात्व त्याचिये कृपा । होती निरसुनी सर्वपापा ।
सद्गुरु स्वयंप्रकाशदीपा । शरण निर्विकल्पा निघावें ॥१४॥
सर्व तीर्थाचें माहेर । सद्गुरुचरणतीर्थ निरंतर ।
सद्भावें सच्छिष्य नर । सेवितां परपार पावले ॥१५॥
शोषण पापपंकाचें । ज्ञानतेज करी साचें ।
वंदितां चरणतीर्थ सद्गुरुचें । भवाब्धीचें भय काय ॥१६॥
अज्ञानमूलहरण । जन्मकर्मनिवारण ।
ज्ञानसिध्दीचें कारण । गुरुचरणतीर्थ तें ॥१७॥
गुरुचरणतीर्थप्राशन । गुरु अज्ञानउच्छिष्ट भोजन ।
गुरुमूर्तीचें अंतरी ध्यान । गुरुमंत्र वदनीं जपे सदा ॥१८॥
गुरुसांनिध्य तो काशीवास । जान्हवीचरणोदक नि:शेष ।
गुरु विश्वेश्वर निर्विशेष । तारक मंत्र उपदेशिता ॥१९॥
गुरुचरणतीर्थ पडे शिरी । प्रयागस्नान तें निर्धारी ।
गयागदाधर सबाह्यंतरी । सर्वातरी साधका ॥२०॥
गुरुमूर्ति नित्य स्मरे । गुरुनाम जपें आदरे ।
गुरुआज्ञापालक नरे । नेणिजे दुसरें गुरुविना ॥२१॥
गुरुस्मरण मुखी राहे । तोचि ब्रह्मरुप पाहे ।
गुरुमूर्ति ध्यानी वाहे । जैसी कां हें स्वैरिणी ॥२२॥
वर्णाश्राम धर्म सत्कीर्ति । वाढवावी सद्वृत्ति ।
अन्यत्र त्यजोनिया गुंती । सद्गुरुभक्ति करावी ॥२३॥
अनन्यभावे गुरुसी भजतां । सुलभ परम पद तत्त्वता ।
तस्मात्सर्वप्रयत्नें आतां । सद्गुरुनाथा आराधी ॥२४॥
गुरुमुखीचे महावाक्यबीज । गुरुभक्तीस्तव लाभे सहज ।
त्रैलोक्यी नाचे भोज । तो पूज्य होय सुरनरां ॥२५॥
गुकार तो अज्ञानांधकार । रुकारवर्ण तो दिनकर ।
स्वयंप्रकाश तेजासमोर । न राहे तिमिर क्षणभरी ॥२६॥
प्रथम गुकारशब्द । गुणमयी मायास्पद ।
रुकार तो ब्रह्मानंद । करी विच्छेद मायेचा ॥२७॥
ऐसे गुरुपद श्रेष्ठ । देवा दुर्लभ उत्कृष्ट ।
गणगंधर्वादि वरिष्ठ । महिमा स्पष्ट नेणती ॥२८॥
शाश्वत सर्वा सर्वदांहा । गुरुपरतें तत्त्व नाही ।
कायावाचामने पाही । जीवित तेंही समर्पावे ॥२९॥
देहादि भुवनत्रय समस्त । इतर पदार्थ नाशिवंत ।
वंचोनिया विमुख होत । अध:पात घडे तया ॥३०॥
ह्मणोनि आरधावा श्रीगुरु । करोनि दीर्घ दंड नमस्कारु ।
निर्लज्ज होऊनिया परवारु । भवसागरु उतरावा ॥३१॥
आत्मदारादिकं चैव । निवेदन करुनी सर्व ।
हा नाही जयां अनुभव । तयांसि वाटे अभिनव वरानने ॥३२॥
जे संसारवृक्षारुढ झाले । पतन नरकार्णवी पावले ।
ते गुरुराये उध्दरिले । सुखी केले निजभजनी ॥३३॥
ब्रह्मा विष्णु सदाशिव । गुरुरुप ते स्वयमेव ।
गुरु परब्रह्म सर्वथैव । गुरुगौरव न वर्णवे ॥३४॥
अज्ञानतिमिरें अंध । ज्ञानांजनशलाका प्रसिध्द ।
दिव्य चक्षु शुध्दबुध्द । महानिध दाखविला ॥३५॥
अखंड मंडलाकार । जेणे व्यापिले चराचर ।
तये पदी केले स्थिर । नमस्कार तया गुरुवर्या ॥३६॥
श्रुतिसार शिरोरत्न । चरणांबुज परम पावन ।
वेदांत कमलनिचिद्भानु । तया नमन गुरुवर्या ॥३७॥
ज्याचे स्मरणमात्रे ज्ञान । साधका होय उत्पन्न ।
ते निजसंपत्ति जाण । दिधली संपूर्ण गुरुराये ॥३८॥
चैतन्य शाश्वत शांत । नित्य निरंजन अच्युत ।
नाद बिंदु कलातीत । नमन प्रणिपात गुरुवर्या ॥३९॥
ज्ञानशक्ति समारुढ । तत्वमालाभूषित दृढ ।
भुक्ति मुक्ति दाता प्रौढ । सद्गुरु गूढ सुखदानी ॥४०॥
अनेक जन्मीचे सुकृत । निरहंकृति निर्हेत ।
तरीच प्रबोध प्राप्त । जरी श्रीगुरुहस्त मस्तकी ॥४१॥
जगन्नाथ जगद्गुरु एक । तो माझा स्वामी देशिक ।
ममत्वासर्वभूतव्यापक । वैकुंठनायक श्रीगुरु ॥४२॥
ध्यानमूळ गुरुराय । पूजामूळ गुरुपाय ।
मंत्रमूळ नि:संशय । मोक्षमूळ गुरुकृपा ॥४३॥
सप्तसिंधू अनेक तीर्थी । स्नाने पाने जे फलप्राप्ती ।
एक बिंदूसम न पावती । सद्गुरुचरणतीर्थाच्या ॥४४॥
ज्ञानेवीण सायुज्यपद । अलभ्य लाभे अगाध ।
सद्गुरुभक्तीने प्रबोध । स्वत: सिध्द पाविजे ॥४५॥
सद्गुरुहूनि परात्पर । नाही नाही वो साचार ।
नेति शब्दे निरंतर । श्रुति शास्त्रे गर्जती ॥४६॥
मदहंकार गर्वे करुनी । विद्या तपाबळान्वित होवोनी ।
संसार कुहरावर्ती पडोनि । नानायोनी भ्रमताती ॥४७॥
न मुक्त देवगण गंधर्व । न मुक्त यक्ष चारणादि सर्व ।
सद्गुरुकृपेने अपूर्व । सायुज्यवैभव पाविजे ॥४८॥
ऐके वो देवी ध्यानसुख । सर्वानंदप्रदायक ।
मोहमायार्णवतारक । चित्सुखकारक श्रीगुरु ॥४९॥
ब्रह्मानंद परमाद्भुत । ज्ञानबिंदू कलातीत ।
निरतिशय सुख संतत । साक्षभूत सद्गुरु ॥५०॥
नित्य शुध्द निराभास । नित्यबोध चिदाकाश ।
नित्यानंद स्वयंप्रकाश । सद्गुरु ईश सर्वाचा ॥५१॥
ह्रदयकमळी सिंहासनी । सद्गुरुमूर्ति चिंतावी ध्यानी ।
श्वेतांबर दिव्यभूषणी । दिद्गत्नकिरणी सुशोभित ॥५२॥
आनंदमानंदकर प्रसन्न । ज्ञानस्वरुप निजबोधपूर्ण ।
भवरोगभेषज जाण । सद्वैद्य चिद्घनसद्गुरु ॥५३॥
सद्गुरुपरते अधिक कांही । आहे ऐसा पदार्थ नाही ।
अवलोकितां दिशा दाही । न दिसे तिही त्रिभुवनी ॥५४॥
प्रज्ञाबळे प्रत्योत्तर । गुरुसि विवादती जे नर ।
जे भोगिनी नरक घोर । यावच्चंद्रदिनमणी ॥५५॥
आरण्य निर्जल स्थानी । भूमती ब्रह्मराक्षस होवोनी ।
गुरुसी बोलती उध्दट वाणी । एक वचनी सर्वदा ॥५६॥
क्षोभतां देवऋषिकाळ । सद्गुरु रक्षी न लागतां पळ ।
दीनानाथ दीनदयाळ । भक्तवत्सल सद्गुरु ॥५७॥
सद्गुरुचा क्षोभ होता । देव ऋषि मुनि तत्वता ।
रक्षिति हे दुर्वार्ता । मूर्खही सर्वथा नायकती ॥५८॥
मंत्रराज हे देवी । गुरु ही दोनी अक्षरे बरवी ।
वेदार्थवचने जाणावी । ब्रह्मपदवी प्रत्यक्ष ॥५९॥
श्रुति स्मृति न जाणती । गुरुभक्तीची परम प्रीति ।
ते संन्यासी निश्चिती । इतर दुर्मति वेषधारी ॥६०॥
नित्य ब्रह्म निराकार । निर्गुण बोध परात्पर ।
तो सद्गुरु पूर्णावतार । दीपासि दीपांतर नाही जैसे ॥६१॥
गुरुकृपाप्रसादें । निजात्सदर्शनस्वानंदे ।
पावोनिया पूर्ण पदे । पेलती दोंदे मुक्तीसी ॥६२॥
आब्रह्मस्तंभपर्यत । स्थावरजंगमादि पंचभूते ।
सच्चिदानंदाद्वय अव्यक्त । अच्युतानंत सद्गुरु ॥६३॥
परात्परतरध्यान । नित्यानंद सनातन ।
ह्रदयीं सिंहासनी बैसवून । चित्ती चिंतन करावे ॥६४॥
अगोचर अगम्य सर्वगत । नामरुपविवर्जित ।
नि:शब्द जाण निभ्रांत । ब्रह्म सदोदित पावती ॥६५॥
अंगुष्ठमात्र पुरुष । ह्रदयी ध्यांता स्वप्रकाश ।
तेथे स्फुरती भावविशेष । निर्विशेष पार्वती ॥६६॥
ऐसे ध्यान करितां नित्य । तादृश होय सत्य सत्य ।
कीटकी भ्रुकुटीचे निमित्य । तद्रूप झाली ते जैशी ॥६७॥
अवलोकिता तयाप्रती । सर्वसंगविनिर्मुक्ति ।
एकाकी निस्पृहता शांति । आत्मस्थिति रहावे ॥६८॥
सर्वज्ञपद त्या बोलती । जेणे देही ब्रह्म होती ।
सदानंदे स्वरुपप्राप्ति । योगी रमती पै जेथे ॥६९॥
उपदेश होतां पार्वती । गुरुमार्गी होय मुक्ति ।
ह्मणोनि करावि गुरुभक्ति । हे तुजप्रती बोलतसे ॥७०॥
जे मी बोलिलो तुज । तें गुजाचें निजगुज ।
लोकोपकारक सहज । हे तूं बुझ वरानने ॥७१॥
लौकिक कर्म ते हीन । तेथे कैचे आत्मज्ञान ।
गुरुभक्तासी समाधान । पुण्यपावन ऐकतां ॥७२॥
एवं या भक्तिभावे । श्रवणे पठणे मुक्त व्हावे ।
ऐसे बोलतां सदाशिवे । डोलती अनुभवे गुरुभक्त ॥७३॥
गुरुगीता हे देवी । शूध्दतत्त्वपूर्णपदवी ।
भवव्याधीविनाशती स्वभावी । स्वयमेवी तपे सदा ॥७४॥
गुरुगीतेचे अक्षर एक । मंत्रराज हा सम्यक ।
अन्यत्र मंत्र दु:खदायक । मुख्यनायक हा मंत्र ॥७५॥
अनंत फळे पावविती । गुरुगीता हे पार्वती ।
सर्वपाविनिर्मुक्ति । दु:खदारिद्रनाशनी ॥७६॥
कालमृत्युभयहर्ती । सर्व संकटनाशकर्ती ।
यक्षराक्षसप्रेतभूती । निर्भय वृत्ती सर्वदा ॥७७॥
महाव्याधीविनाशिनी । विभूती सिध्ददायिनी ।
अथवा वशीकरणमोहिनी । पुण्य पावन गुरुगीता ॥७८॥
कुश अथवा दुर्वासन । शुभ्र कंबल समसमान ।
एकाग्र करुनिया मन । सद्गुरुध्यान करावें ॥७९॥
शुक्ल शांत्यर्थ जाण । रक्तासन वशीकरण ।
अभिचारी कृष्णवर्ण । पीतवर्ण धनागमी ॥८०॥
शांत्यर्थ उत्तराभिमुख । वशीकरणा पूर्व देख ।
दक्षण मारण उल्लेख । धनागम सुख पश्चमे ॥८१॥
मोहन सर्व भूतासी । बंधमोक्षकर विशेषी ।
राजा वश्य निश्चयेसी । प्रिय देवासी सर्वदा ॥८२॥
स्तंभनकारक जप । गुणविवर्धन निर्विकल्प ।
दुष्कर्मनाशक अमूप । सुखस्वरुप सनातन ॥८३॥
सर्वशांतिकर विशद । वंध्या पुत्र फलप्रद ।
अवैधव्य सौभाग्यप्रद । अगाध बोध जपताहे ॥८४॥
आयुष्य आरोग्य परमाश्चर्य । पुत्रपौत्र धैर्यौदार्य ।
विधवा जपतां परमाश्चर्य । मोक्षैश्वर्य पावती ॥८५॥
अवैधव्याची कामना । धरिता पूर्ण होय वासना ।
सर्व दु:ख भय विघ्ना । पासोनि सुजना ( पाठ दुसरा ( सुजाणा ) सोडवी ॥८६॥
सर्व बाधाप्रशमनी प्रत्यक्ष । धर्मार्थकाममोक्ष ।
जे जे चिंतिले तो पक्ष । गुरुदास दक्ष पावती ॥८७॥
कामिका कामधेनु गाय । कल्पिती तया कल्पतरु होय ।
चिंतिती त्या चिंतामणीमय । मंगळमय सर्वासी ॥८८॥
गाणपत्य शाक्त सौर । शैव वैष्णव गुरुकिंकर ।
सिध्दी पावती सत्वर । सत्य सत्य वरानने ॥८९॥
संसारमलनाशार्थ । भवबंधपाशनिवृत्त ।
गुरुगीतास्नाने सुस्त्रात । शुचिर्भूत सर्वदा ॥९०॥
अशनी शयनी गमनागमनी । अश्वगज अथवा यानी ।
जागृती सुषुप्ती स्वप्नी । पढतां होय ज्ञानी गुरुगीता ॥९१॥
गुरुगीता पढतां भक्त । सर्वदा तो जीवनमुक्त ।
त्यांच्या दर्शने पुनित । पुनर्जन्म न होत प्राणिया ॥९२॥
अनेक उदके समुद्रउदरी । नानावर्ष घेनू क्षिर क्षीरी ।
आभिन्न रुपें निर्धारी । सर्वातरी एकची ॥९३॥
घटाकाश मठाकाश । उपाधिभेदे भिन्न वेष ।
महदाकाश निर्विशेष । द्वैताचा लेश न ढळे ॥९४॥
भिन्न भिन्न प्रकृति । कर्मवेषे दिसती आकृती ।
घेऊनि जीवपणाची बंथी । विविध भासती नामरुपे ॥९५॥
नाना अलंकारी सुवर्ण । तैसा जीवात्मा पूर्ण ।
तेथे नाही वर्णावर्ण । कार्यकारणातीत तें ॥९६॥
या स्वानुभवे गुरुभक्त । वर्तंता ते जीवन्मुक्त ।
गुरुरुप तें वेदोक्त । जे का विरक्त सर्वस्वे ॥९७॥
अनन्यभावे गुरुगीता । जपतां सर्व सिध्दी तत्वतां ।
मुक्तिदायक जगन्माता । संशय सर्वथा न धरी तूं ॥९८॥
सत्य सत्य हे वर्म । मी बोलिलों सर्व धर्म ।
नाही गुरुगीतेसमा तत्व परम सद्गुरु ( पाठ तत्व ( परम पावन गुरुगीता ) ॥९९॥
एक देव एक जप । एक निष्ठा परंतप ।
सद्गुरु परब्रह्मस्वरुप । निर्विकल्प कल्पतरु ॥१००॥
माता धन्य पिता धन्य । याती कुल वंश धन्य ।
धन्य वसुधा देवी धन्य । धन्य धन्य गुरुगीता ॥१०१॥
गुरुपुत्र अपंडित । जरी मूर्ख तो सुनिश्चित ।
त्याचेनि सर्व कार्यसिध्दि होत । हा सिध्दांत वेदवचने ॥१०२॥
शरीर इंद्रिये प्राण । दारा पुत्र कांचन धन ।
श्रीगुरुचरणावरुन । वोवाळून सांडावे ॥१०३॥
अकल्प जन्म कोडी । एकाग्रमने जपतां प्रौढी ।
तपाची हे फळ जोडी । गुरुसी अर्ध घडी सुख नोहे ॥१०४॥
ब्रह्मादिक देव समर्थ । त्रिभुवनी वंद्य यथार्थ ।
गुरुचरणोदकावेगळे व्यर्थ । अन्य तीर्थ निरर्थक ॥१०५॥
सर्व तीर्थोत तीर्थ श्रेष्ठ । श्रीगुरुचरणांगुष्ठ ।
निवारी संसारकष्ट । पुरवी अभिष्ट इच्छिले ॥१०६॥
हे रहस्यवाक्य तुजपुढे । म्या कथिलें निज निवाडे ।
माझेनि निजतत्त्व गौप्य उघडे । करुनि वाडेकोडे दाखविले ॥१०७॥
मुख्य गणेशादि वैष्णव । यक्ष किन्नर गण गंधर्व ।
तयासही सर्वथैव । हे अपूर्व न वदे मी ॥१०८॥
अभक्त वंचक धूर्त । पाषांडी नास्तिक दुर्वृत्त ।
तपासी बोलणें अनुचित । हा गुह्यार्थ पै माझा ॥१०९॥
सर्व शास्त्राचें मथित । सर्व वेदांत समंत ।
सर्व स्तोत्रांचा सिध्दांत । मूर्तिमंत गुरुगीता ॥११०॥
सकल भुवने सृष्टी । पहातां व्यष्टी समष्टी ।
मोक्षमार्ग हा दृष्टी । चरणागुंष्ठी गुरुगीता ॥१११॥
उत्तरखंडी स्कंदपुराणी । ईश्वर पार्वती संवादवाणी ।
गुरुगीता ऐकतां श्रवणी । विश्वतारणी चिद्गंगा ॥११२॥
हे गुरुगीता नित्य पढे । तया सांकडे कवण पडे ।
तत्काळ मोक्षद्वार उघडे । ऐक्य घडे शिवस्वरुपी ॥११३॥
हे न ह्मणावां प्राकृतवाणी । केवळ स्वात्मसुखाची खाणी ।
सर्व पुरवी शिराणी । जैसा वासरमणी तम नासी ॥११४॥
श्रोतयां वक्तयां विद्वत् जनां । अनन्यभावे विज्ञापनां ।
न्यून पूर्ण नाणितां मना । क्षमा दीनावरी कीजे ॥११५॥
हे गुरुगीतेची टीका । न ह्मणावीजे पुण्यश्लोका ।
पदपदार्थ पहातां निका । दृष्टी साधक दिसेना ॥११६॥
आवडीची जाती वेडी । वाचे आले ते बडबडी ।
मूळग्रंथ कडोविकडी । न पहातां तातडी म्यां केली ॥११७॥
नाहीं व्याकरणी अभिनिवेश । नाही संस्कृती प्रवेश ।
धीटपणे लिहितां दोष । गमला विशेष मनातें ॥११८॥
परी सलगी केली पायासवें । ते पंडीत जनीं उपसहावें ।
उपेक्षा न करुनि सर्वभावे । अवधान द्यावें दयालुत्वे ॥११९॥
विकृतिनामसंवत्सरी । भाद्रपदमासी भृगुवासरी ।
वद्य चतुर्थी निरातीरी । ग्रंथ केला समाप्त ॥१२०॥
आनंदसांप्रदाय वंशोद्भव । माध्यंदिन शाखा अभिनव ।
गुरुगीतेचा अनुभव । ह्रदयीं स्वयमेव प्रगटला ॥१२१॥
सहजपूर्णनिजानंदे । रंगला तो साधुवृंदे ।
श्रवण करावा स्वच्छंदे । ग्रंथनिर्व्दद्व गुरुगीता ॥१२२॥

श्रीसद्गुरुनिजानंदार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP