सुदामचरित्र

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


ॐ नमो जी मंगलमूर्ति । अभयवर दे पुरवीं आर्ती । देऊनि सद्विद्ये स्फुर्ती । वाढवीं कीर्ति ग्रंथार्थी ॥१॥
जय जय वो चिच्छक्ति । वाग्देवी सरस्वती । नवरसरंगे चिद्रत्न ज्योति । जिव्हेप्रती उजळी तूं ॥२॥
जयजयाजी सद्गुरु । तूं निर्विकल्प कल्पतरु । पूर्ण रंगे अजरामरु । वज्रपेजरु पै तुझा ॥३॥
संतश्रोतयां मुनिजना । अनन्यभावे विज्ञापना । सुदामचरितवर्णना । वर्णी रसना तें कीजो ॥४॥
गणेश सद्गुरु सरस्वती संत । संतोषोनि अत्यंत । मस्तकीं ठेवोनिया हस्त । सुदामचरित बोलविले ॥५॥
तेचि कथा आरुषवाणी । बोलिलों संक्षेपेकरुनि । न्यून कांही पडतां नयनी । क्षमा सज्जनी करावी ॥६॥
सुदामा ब्राह्मण बाळपणी । विद्याभ्यास करितां झणी । मित्रत्वें जोडला चक्रपाणि । जो निर्वाणी रक्षितां ॥७॥
सकल स्वाध्यायी द्विजकुमार । गुरुसेवनी निरंतर । त्यांहीमाजि रुक्मिणीवर । निरंतर गुरुभजनी ॥८॥
गुरुपत्नी आज्ञा करित । ते मस्तकी वंदोनि त्वरित । उदक आणोनियां भरित । परपूरित सर्वदा ॥९॥
सुदामा आणि श्रीकृष्ण । बाळमित्र दोघे जण । गोमय काष्ठे शुभा तृण । गुरुगृही आपण आणिती ॥१०॥
गुरुसेवने विद्या प्राप्त । आचरोनि दावी अच्युत । पूर्णकाम लोकसंग्रहार्थ । अवतार धरी युगायुगी ॥११॥
पूर्ण विद्या झालियावरी । पूर्ण परब्रह्म श्रीहरि । राज्य करित द्वारकपुरी । सहपरिवारी वेष्टित ॥१२॥
ब्रह्मादिक सुरगणपंक्ती । बद्धहर्स्ते  वोळंगती । अहर्निशी उमापति । ध्यान चित्ती करीतसे ॥१३॥
येरीकडे सुदामा ब्राह्मण । दरिद्री कुटुंबी निर्धन । अशनवसनरहित दीन । अकिंचन सर्वदा ॥१४॥
दरिद्री आधीची आधि । दरिद्र तें महाव्याधि । दरिद्रे भ्रंशे बुध्दी । वेदविधि घडेना ॥१५॥
दरिद्रा परतें कांही । त्रिभुवनी दु:ख दुसरे नाही । दरिद्रायाची विद्या तेही । कोणासि कांही रुचेना ॥१६॥
परस्परे दारा कुमर । कलह करिती निरंतर । श्रवणी सुखाचें उत्तर । न पडे करकर सर्वदा ॥१७॥
असो यापरी द्विजोत्तम । दरिद्रे पीडिला नि:सीम । पूर्वपुण्ये मेघश्याम । विश्रामधाम आठवला ॥१८॥
पश्चात्तापे होतां बोधु । ह्मणे अगा ये करुणासिंधु । पतीतपावना अनाथबंधु । कोण अपराधु आचरलो ॥१९॥
दरिद्रादु:खापरते मज । करिसी तूंचि अधोक्षज । शरणांगतांची लाज । सर्वस्वे तुज श्रीकृष्ण ॥२०॥
ऐकोनिया करुणावचना । द्विजपत्नी ह्मणे गुणानिधाना । तुह्मी विसरलेति जनार्दना । दरिद्रव्यसना भुलोनि ॥२१॥
तुह्मी बाळमित्र उभयतां । उपार्जना नलगे आतां । करणें कवणाची तत्वतां । कृष्णनाथावांचूनि ॥२२॥
ऐसे असोनि विस्मरण । पडावया काय कारण । दृढ धरावे हरिचरण । जन्ममरणमोचक ॥२३॥
द्विज ह्मणे ऐके मातातो लक्ष्मीकांत  अनंत । त्याचिया दर्शना रिक्तहस्ता । जातां अयुक्त दिसतसे ॥२४॥
कांही संग्रह असता गांठी । तरी समर्पितो जगजेठी । करिता परमृतवृष्टि । कृपादृष्टी अवलोकने ॥२५॥
ऐसे ऐकोनि द्विजवनिता । मृण्मयपात्री पाहो जातां । तीन मुष्टी पोहे हाता । लागले भक्षितां उरले ते ॥२६॥
लवडसवडी वाडेंकोडे । आणूनि ठेविले पतीपुढे । येरु ह्मणे निज निवाडें । पहा हो केवढे आश्चर्य ॥२७॥
श्रीकृष्ण आत्मराम । मुनिमानसविश्रामधाम । क्षीराब्धिशायी अवाप्तकाम । पुरुषोत्तम श्रीहरि ॥२८॥
त्यासि मी दुर्बळ ब्राह्मण । तीन मुष्टी पोहेकण । नेऊनि देऊं आपण । उध्दटपण हे माझे ॥२९॥
जीर्ण सच्छिद्र ग्रंथी । अंगोस्तर घेऊनि हाती । माजि बांधिले निगुती । पोहे युक्तीकरोनी ॥३०॥
वदनी स्मरोनि कृष्णनाथ । धरिला द्वारकेचा पंथ । पाऊल टाकी जेथ तेथ । मनोरथ उद्भवती ॥३१॥
तंव अद्भुत वर्तले चोज । द्वारका देखिली तेज:पुंज । विस्मित होवोनियां द्विज । पाहे सहज स्वभावे ॥३२॥
रत्नखचित सुवर्णशिखरे । वरी नाचती हंसमयोरे । कोकिळा कूजती पंचमस्वरे । गगनी गोपुरे झळकती ॥३३॥
दिव्य पताका फडकती । गुढिया तोरणे शोभती । वेद बंदीजन गर्जती । वाखाणिती कृष्णमहिमा ॥३४॥
चित्रविचित्र मंडप । ठाईठाई रत्नदीप । रविकिरणां देती वोप । तेज अमूप प्रकाशे ॥३५॥
कुंकुमकेशरचंदनसडे । परिमळ उधळती चहूंकडे । गंधर्व गायन इडपाडे । सुस्वर पवाडे गर्जती ॥३६॥
नानावाद्यांचिये ध्वनी । अमर बैसूनी विमानी । वरुषताती दिव्य सुमनी । घोष गगनी न समाये ॥३७॥
वृक्ष लविन्नले अमृतफळी । सरोवरे भरली शीतळ जळी । वसंत फिरे महीमंडळी । सुवर्णकमळी सुगंध ॥३८॥
श्रीद्वारकेचे वर्णन । करितां शिणला चतुरानन । तेथ मतिमंद हीन दीन । काय महिमात्र अनुवादे ॥३९॥
नगर दृष्टी पहातां पाही । सुदामा बुडाला स्वानंदडोही। कौतुक पाहवें ऐसा कांही । उरला नाही संशय ॥४०॥
प्रवेश करितां नगरद्वारी । विचार करितसे अंतरी । द्वारपाळांचिया हारी । दंडप्रहारी ताडिती ॥४१॥
साशंकित भयभीत । मागें पुढे पाहत पाहत । सिंहासनी अच्युतानंत । अकस्मात् देखिला ॥४२॥
परब्रह्म पूर्णावतार । राधारमण शारग्ङधर । मनमोहन यादववीर । सगुण सुंदर देखिला ॥४३॥
अनंतब्रह्मांडनायक । वासुदेवकुलतिलक । शरणांगतप्रतिपालक । निजसुखदायक श्रीहरि ॥४४॥
किरीट कुंडलें वनमाळा । पीतांबरधारी घनसांवळा । अनंत विजेचा मेळा झाला । एकवळा हरिरुपी ॥४५॥
रखुमाई आणि राई । चामरें ढळिती दोही बाही । सोळा सहस्त्र लवलाही । सेवेसि पाही तिष्ठति ॥४६॥
नारद तुंबर विणे वाहती । विष्णुपदे गीती गाती । सनकादिक ध्यानी ध्याती । कृष्णमूर्ति सर्वदा ॥४७॥
यापरी श्रीभगवान । षडगुणैश्वर्यसंपन्न । देखता झाला आपण । सुदामा ब्राह्मण ते काळी ॥४८॥
सिंहासनाखालती । उडी घालूनि अवचिती । सुदामा धरुनि हाती । परम प्रीती आलिंगिला ॥४९॥
येरयेरा आलिंगने । झालिया मधुसूदने । हातीं धरुनि बहुमाने । सिंहासनी बैसविला ॥५०॥
चरणक्षालणालागी जळ । आणूनिया लक्ष्मीलीळ । रखुमाई वेल्हाळ । चरणकमळ धूतसे ॥५१॥
तीर्थ देऊनि सर्वासि । प्राशन करी ह्रषीकेशी । षोडशोपचारे पूजनासि । विध्युक्तेसि करुनि ॥५२॥
स्वागत पुसे नारायण । दादो आहां की कल्याण । झाली आमुची आठवण । नेणे कवण विचारे ॥५३॥
वोहिनीनी आह्मांलागीं । काय पाठविली वानगी । जे कैवल्यसुख भोगी । उपयोगी सनकादिकां ॥५४॥
ते द्यावी जी प्रस्तुत । ह्मणोनियां तो अच्युत । गाठोडीये घालोनि हात । सोडूनि पाहत लगबग ॥५५॥
तंव देखिली नवल परी । तीन मुष्टी पोहे माझारी । प्रथम मुष्टी कैठभारी । सुखांतरी घालीत ॥५६॥
द्वितीय मुष्टी घेवोनि हाती । वदनी घाली रमापती । त्रितीय मुष्टी परम प्रीती । घेतां चित्ती जाणवले ॥५७॥
रुक्मिणीने धरुनि करी । मुष्टी मागितली तिसरी । ह्मणे भले हो मुरारी । करितां चोरी कवणासि ॥५८॥
बाइजीने आह्मांप्रती । पोहे पाठविले निगुती । आमुचा भाग आह्मांप्रती । देणे श्रीपति उचित ॥५९॥
ऐसे बोलोनि रुक्मिणी । पोहे घेती झाली तत्क्षणी । जाणोनिया चक्रपाणि । अंत:करणी हांसत ॥६०॥
प्रथम मुष्टीसाठी हरी । विश्वकर्म्यासि आज्ञा करी । सुवर्णाची सुदामानगरी । क्षणामाझारी करावी ॥६१॥
द्वितीय मुष्टीकारणे । सयोज्य मुक्ती नारायणे । बाळमित्रालागी देणे । रमारमणे गोपाळे ॥६२॥
त्रितीय मुष्टीसि जाणा । रुक्मिणां द्यावी ब्राह्मणा । ऐसे कल्पितां यादवराणा । रुक्मिणी अंत:करणा कळाले ॥६३॥
ह्मणोनि रुक्मिणीने करी । सवेग धरुनि श्रीहरि । मुष्टी घेतली तिसरी । मनी घाबरी होऊनि ॥६४॥
ऐसे झालियानंतरे । सुदामयासि दामोदरे । करी धरुनि अत्यादरे । निज मंदिरे दाखविली ॥६५॥
नेऊनिया अंतरगृही । अभ्यंग करुनि लवलाही । दिव्य पीतांबर पाही । रुक्मिणी रारी नेसवीती ॥६६॥
गंधाक्षता सुमनमाळा । धूपदीपादि सोहळा । करुनियां घन:सांवळा । चरणकमळा वंदित ॥६७॥
रत्नखचित अडणीवरी । हेमताटी मिष्टान्ने बरी । वोगरिली नाना परी । जेवणारी जाणिजे ॥६८॥
अन्नपूर्णा रुक्मिणी सती । वाढीतसे उदार हस्ती । ग्रासोग्रासीं रमापति । करी विनंति आपण ॥६९॥
भोजन करितां द्विजवर । चित्ती चिंता अनिवार । ऐसी अन्ने निरंतर । दाराकुमार नेपाती ॥७०॥
अंतरसाक्षी संकर्षण । ह्मणे दादोजी आपण । यावत्तृप्ती अरोगण । परिपूर्ण करावी ॥७१॥
तृप्त झालिया सुदामा । ह्मणे देवा पुरोषत्तमा । दिनोदयी कैची आभा । ठाव तमा असेना ॥७२॥
करोनिया आपीशन । आंचवणालागी जीवन । घालीतसे जगज्जीवन । मनमोहन स्वहस्ते ॥७३॥
सोळा सहस्त्र अंत:पुरे । चोज करिती परस्परे । ह्मणती या परमेश्वरे । रुपे सुंदरे आणिली ॥७४॥
वेडेवांकुडे करचरण । रोडके बोडके कृष्णवर्ण । कोठूनि आणिला ब्राह्मण । नाही प्रावर्ण एकही ॥७५॥
दांतरे बोचिरे कुचदाढी । क्षणाक्षणां शेंबुड वोढी । ऐशियाची आवडी गाढी । पहा हो केवढी श्रीकृष्णा ॥७६॥
रुक्मिणी ह्मणे परत्या सरा । तुह्मी नेणा या विचारा । भक्तिप्रिय सर्वेश्वरा । दीनोध्दारा माधवा ॥७७॥
भक्तवत्सल दीनबंधु । पतीतपावन करुणासिंधु । त्यासि नाही देहसंबंधु । लाविती भवबंधु मूखत्वे ॥७८॥
ऐसे करितां संभाषण । निशा प्रवर्तली पूर्ण । शय्या घालूनि विस्तीर्ण । श्रीकृष्णे ब्राह्मण निजविला ॥७९॥
चरणकमळ कमळा चुरी । वैकुंठपति तो श्रीहरि । ब्राह्मणाची सेवा करी । चरण धरी स्वहस्ते ॥८०॥
अरुणोदयी येरे दिवशी । प्रबोधोनि ब्राह्मणासि । आज्ञा देतां झाला कैशी । ह्रषीकेशी परियेसा ॥८१॥
ह्मणे दादो तुह्मी जावे । पूर्वस्नेह असो द्यावे । प्रारब्धे होईल ते पहावे । स्वस्थ रहावे स्वस्थानी ॥८२॥
ऐसे परिसतां चित्ती । सुदामा मानी परम खंती । ह्मणे संभावनेची जाती । न दिसे प्राप्ती प्रारब्धे ॥८३॥
अदृष्टसाह्य जंववरी नाही । यत्न करितां व्यर्थ पाही । अटण करितां दिशा दाही । प्राप्ति कांही दिसेना ॥८४॥
संकल्प कल्पी काल्पनिक । ह्मणे पीतांबर हा अमोलिक । उत्तीर्ण झाला यदुनायक । देऊनि एक हे वस्त्र ॥८५
न धरुनि दुराशा विशेष । जावें होऊनि अल्पसंतोष । आज्ञा देतो परम परेश । द्वारकाधीश परमात्मा ॥८६॥
पीतांबराचा विक्रय । करुनिया अयनद्वय । क्रमावें हा सुनिश्चय । अभिप्राय चित्ताचा ॥८७॥
संज्ञा करितां चक्रपाणि समीप पातली रुक्मिणी । ह्मणे भावोजी अझुनी । पितांबर कोणी नेसते ॥८८॥
पाहिले त्याचें त्यास जीर्ण । अंगोस्तर नेसविले आणून । पीतांबर मागतां फेडून । सुदामा उद्विग्न मानसी ॥८९॥
पूर्व अंगोस्तर नेसोन । सुदामा दिसे दीनवदन । आज्ञा देऊन नंदनंदन । अभिनंदन करीतसे ॥९०॥
सद्गदित होऊनि कंठ । आलेनि पंथ धरिली वाट । दिग्भ्रम होऊनियां भट्ट । चालिला नीट स्वग्रामा ॥९१॥
कांही स्फुंदे कांही हांसे । कांही चाले कांही बैसे । मार्गी भेटे त्या त्या पुसे । भ्रमिष्ट भासे पाहतां ॥९२॥
यापरी मार्गी चालत । तंव गोरक्ष गोधने चारित । त्यासि सुदामा विचारीत । तुह्मी समस्त कवणाचे ॥९३॥
गाई ह्मैशींची खिल्लारे । सुरभी ऐशी मनोहरे । कवणे सभाग्ये नृपवरे । परम सुंदरे पाळिली ॥९४॥
गोंवळ ह्मणती ब्राह्मणासि सुदामाच्या गाई ह्मैशी । येरु ह्मणे आह्मांसि । विनोद करिसी कां बापा ॥९५॥
तयांसि टाकूनियां मागे । पंथ कमितां लागवेगे । पुढे देखिली सव्य भागें । विचित्र रंगे रंगली ॥९६॥
अश्वरत्ने नानापरी । नाचती ती चौपायांवरी । रत्न जडीत अलंकारी । सुवर्ण पाखरिली ॥९७॥
चपळ चौताळती रथ । सिध्दी नेती मनोरथ । श्यामकर्ण वारु तेथ । गगनपंथ आक्रमिती ॥९८॥
वायुवेगे फेरे देती । चित्ती चिंतिले तेथ नेती । त्यांचिया सारथियांप्रती । सुदामा निगुती पुसतसे ॥९९॥
तुह्मी कवणांचे सेवकजन । भक्षितां कवणांचे वेतन । सांगा स्वामीचें नामाभिधान । अश्वरत्न कवणांचे ॥१००॥
येरु ह्मणती आमुचा स्वामी । सुदाम देव नेणा तुह्मी । जो सबाह्यांतर्यामी । सायोज्यलक्ष्मी पुत्र तो ॥१॥
हे सर्व ही त्याची संपत्ती । वर्णितां शिणला वाचस्पति । कुठित झाली सरस्वती । त्याच्या श्रीपति बाळमित्र ॥२॥
विस्मित होवोनि सुदामदेव । ह्मणे काय ह्मणती अभिनव । अवघे घेती माझेंचि नांव । शब्दगौरव देताती ॥३॥
गोंवारी ह्मणती गा ब्राह्मणा । किती पुससी कांटाळवाणा । जाई प्रभूच्या दर्शना । झोडी मिष्टान्न यथेष्ट ॥४॥
मागें सांडूनियां त्यांसि । पुढे जातां वातवेगेसि । तंव नवल देखिले दृष्टीसि । तेज रविशशीसादृश ॥५॥
सुस्नात पंडित अग्निहोत्री । वैद्य ज्योतिषी महामंत्री । वेदपाठक चतु:शास्त्री । भूतमात्री सदय जे ॥६॥
ऐसे भेटले द्विजवर । सुदामा करी नमस्कार । प्रवेशतां नगरद्वार । हर्षे निर्भर मानसी ॥७॥
सुवर्णाची सुदामनगरी । लोक बोलती घरोघरी । ऐकोनियां अंतरी । आश्चर्य करी क्षणक्षणा ॥८॥
जिकडे पहावें तिकडे । माडिया गोपुरे हुडे । सुवर्णाची खाणी उघडे । तृणझोपडे दिसेना ॥९॥
माझे कौपट कोणे नेले । कोठे गेली माझी मुले । येथेंचि होतें काय झाले । उडोनि गेले केउते ॥१०॥
येथे कोणाचे हें मंदिर । दिव्य दामोदर सुंदर । भीतरी प्रवेशला सत्वर । महाद्वार उल्लंघूनि ॥११॥
शतानुशत दासी शिरी । सुवर्णकलशाचिया हारी । घेऊनियां गृहांतरी । जाती कामारी लगबग ॥१२॥
या दासी की स्वामिनी । हे तत्वतां नेणे कोणी । दिव्य अलंकार भूषणी । मिरवती लेणी लेवूनी ॥१३॥
रत्नखचित डोलहारा । माजी बैसली विप्रदारा । परिचारिका सुंदरा । विजणवारा घालिती ॥१४॥
अपर इंदिरा विराजमान । सकळ सौभाग्ययतन । उदारधीर गुणसंपन्न । प्रसन्नवदन सर्वदा ॥१५॥
ऐशी सुदामयाची राणी । सौंदर्ययत्नांची खाणी । पतिव्रताशिरोमणी । नक्षत्रगणी रवि जैसा ॥१६॥
निज भर्ता अवचिता । दृष्टी देखतां द्विजवनिता । अनन्यभावे पतिव्रता । चरणी माथा न्यासित ॥१७॥
कनकताटीं दिव्य ज्योति । उजळूनि ओंवाळिला पति । ह्मपो स्वामी कृपामूर्ति । माझी विनंति परियेसा ॥१८॥
तुह्मी गेलेति कृष्णभेटी । दयावंत तों जगजेठी । अवलोकूनि कृपादृष्टी । अमृतवृष्टि हे केली ॥१९॥
द्वारकेहुनि आगळी । सुवर्ण नगरी भूमंडळी । करुनि अर्पिली ततकाळी । ऐसा वनमाळी तुष्टला ॥१२०॥
आतां सोडूनि शोक चिंता । भावें भजावें भगवंता । दरिद्र पळाले तत्वतां । दूरि दिगंताबाहेरी ॥२१॥
नानाउपभोग संपत्ति । वेचितां न सरे कल्पांती । ऐसे देऊनि तुम्हांप्रती । रमापती तुष्टला ॥२२॥
ऐकोनि स्त्रियेचे शब्द । ब्राह्मणासि ब्रह्मानंद । नाहींच झाला विषादखेद । भेदाभेद गळाले ॥२३॥
वदनेंदु षोडशकळी । पूर्णपौर्णिमा नभमंडळी । तेज फांकले स्वानंदमेळी । सुखकल्लोळी मन विरे ॥२४॥
मग नेऊनि पर्यकावरि । सुमन शेज आरु वरी । बैसविला आदरें करी । धरुनि अंतरी समवेत ॥२५॥
नगर नागरिका लोका । दर्शना पातल एक एका नमस्कारिती सकळिक । सेवेसि सेवक तिष्ठति ॥२६॥
वस्त्राभरणे अलंकार । उपायने नानाप्रकार । घेऊनि येती जे जे नर । ते ते सत्वर धांवती ॥२७॥
सोडूनि सराफ लक्षापती । अष्टादश पगड याती । एकापुढे एक धांवती । धन्य म्हणती प्रारब्ध ॥२८॥
नगरीचा स्वामी नगरा । आला पाहूं करा त्वरा । एक ह्मणती दाटी बारा । लोक सारा परौते ॥२९॥
दीप जाळूनि सुवर्णताटी । नगर नारी येती भेटी । सुदामदेव पाहता पोटी । आनंदकोटी होतसे ॥१३०॥
अखंडदंडायमान । ऐसा सोहळा अनुदिन । लक्ष्मीवंत समसमान । सर्वही जन सारिखे ॥३१॥
असो ऐसा श्रीहरी । भक्तकाज कैवारी । सुदामया सुवर्णनगरी । क्षणामाझारी दीधली ॥३२॥
वर्णिता सुदामचरित्र । पावन होय वक्त्र । श्रवण करितां श्रोत्र । अतिपवित्र सर्वदा ॥३३॥
सुदामदेवाची कथा । आणिती जे वाक्पंथा । ते प्रिय होती कृष्णनाथा । सुदामदेवासारिखे ॥३४॥
सुदामदेवयाचे आख्यान । पढतां निजानंद घन । पूर्ण रंगी रंगोन । ब्रह्मसंपन्न करील ॥३५॥
भारतसमुद्र वेदव्याप्ते । मथिला होता चिद्विलासें । तेथील रत्न हे प्रयासे । दासानुदासे घेतले ॥१३६॥
॥ रंगनाथकृत सुदामचरित्र संपूर्ण ॥


References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP