निजानंदसाधने

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


निजानंदप्राप्तीची साधने । कर्णी आकार्णिजे सावधमने ॥
साधवया साधक जने । जैसी निधाने पायाळे ॥१॥
सद्गुरुकृपा दिव्यांजने । वांचूनि न दिसती धने ॥
अवलोकितां परोक्षज्ञाने । भूते, स्मशाने, भासती ॥२॥
संत श्रोतयांचे कृपेने । किंचित बोलो अरुष वचने ॥
क्षमा करुनि विद्वज्जने । द्यावी अवधाने समस्ती ॥३॥
वर्णाश्रमी विहित कर्मे । नित्य नैमित्यके सम्त्रमे ॥
अवश्य स्वधर्मे । त्यांची वर्मै जाणुनी ॥४॥
प्रथम साधन मूळ पाया । भूमिका हे तरणोपाया ॥
उपादान अनुकंपाया । सदगुरुपायाची पाहिजे ॥५॥
काम्य कर्म तें गाळिजे । निषिध्द निषेधे वाळिजे ॥
निरहंकृतीने पाळिजे । फळेच्छे जाळिजे समूळी ॥६॥
ब्रह्मी ब्रह्मार्पण बुध्दी । कर्मै समर्पिता त्रिशुध्दी ॥
उतरोनिया भवाब्धी । सायोज्य सिध्दी तो पावे ॥७॥
साधनचतुष्ट्य द्वय दुसरे । संक्षेपे बोलिजे निर्धारे ॥
ते परिसावे चतुरे । अति आदरे करुनी ॥८॥
पहिला नित्यानित्य विचार । करावा निरखुनी साचार ॥
जैसा मराळ क्षीरनीर । निवडूनि सार स्वीकारी ॥९॥
देहादि भुवनत्रय अनित्य । त्यागावें जाणोनि अकृत्य ॥
निजानंद परतें सत्य । घ्यावें नित्य निरंतर ॥१०॥
इहामुत्र फलभोग । तोचि प्रत्यक्ष भवरोग ।
काकविष्ठा सुंदर सांग । तैसा प्रसंग परियसा ॥११॥
शम दम तितिक्षा उपरम । समाधान श्रध्दा परम ॥
शमादि षटक याचें नाम । विश्रामधाम दायिते ॥१२॥
मनासी संपूर्ण शम घडे । तरी विषमता सहज मोडे ॥
निजानंद जोडी जोडे । साधनी घडे सापेक्षे ॥१३॥
दम इंद्रियनिग्रह भागे । तो कवि किंकरा केंवि सांगे ॥
श्रोतयांनी प्रश्न प्रसंगे । कृपापागें हा केला ॥१४॥
तंव स्मरण झाले अंतरी । रमतो ऐसिये परी ॥
आंगी सुइजे दाही द्वारी । इंद्रिये व्यापारी वर्ततां ॥१५॥
रामकृष्ण नारायण हरी । वाचें स्मरण निरंतरी ॥
प्राणांत झालिया वैखरी । उच्चार न करी निंदेचा ॥१६॥
करे करावें हरिपूजन । किंवा करावें धर्मदान ॥
पडिलियां वापी कूपांतून । कडे काढून रक्षावें ॥१७॥
चरणाची हेंचि करणी । दीन जन संरक्षणी ॥
तीर्थ देवालय - प्रदक्षणी । हरीरंगणी नाचावे ॥१८॥
लिंगाप्रती हा नियम । विध्युक्त पाणीगृहणी काम ॥
तेथेही अधमोत्तम । करावा संभ्रम विवेके ॥१९॥
गुदे क्षरावे परिमित । शौचविधी शुचिष्मंत ॥
कर्मैद्रियाची हे मात । ज्ञानेंद्रिया देत अवधारा ॥२०॥
श्रवणे करावें सच्छास्त्र - श्रवण । त्वत्रे स्पर्शावें हरिगुरुचरण ॥
चक्षुरिंद्रिये अवलोकन । घ्यावे दर्शन संताचे ॥२१॥
जिव्हे रामरसचि सार । इतर रसी अनादर ॥
घाणे होवोनि भ्रमर । निर्माल्य सुंदर सेवावें ॥२२॥
दशेद्रिये येणे रीती । नेमावी अहोराती ॥
या वेगळी एक रती । ढळो कल्पांती नेणावी ॥२३॥
आतां उपरम तो कैसा । बोली बोलतां झणी चिळसा ॥
वांती न पाहे सहसा । मागुति जैसा त्याग या ॥२४॥
अनेक जन्मी अगणित दु:खे । भोगिली ती नाकळे नखे ॥
परावृत्ती धरोनि सुखे । जवळी पारिखे येऊं नेदी ॥२५॥
तितिक्षा बोलिजे ऐसी । सहनशीलता मानसी ॥
गर्जन तर्जन निंदापसी । न गणी सोसी सर्वथा ॥२६॥
समाधान ते पांचवे जाण । आत्मप्राप्तीलागी पूर्ण ॥
अखंड दंडायमान । ज्ञानसंपन्न व्हावया ॥२७॥
श्रध्दा नित्य नवी गाडी । पदोपदी चढावोढी ॥
निजानंद पद प्रौढी । पावावया गुढी उभारी ॥२८॥
शमदभादि षटक इया नावें । तृतीय साधन जाणावे ॥
यावरी मुमुक्षु स्वभावे । लाहे दैवे मुमुक्षु ॥२९॥
मुमुक्षत्वाची ऐसी गोष्टी । तरणोपायांची इच्छा पोटी ॥
अनिवार धरुनि उठी । विरक्ति गांठी बांधोनि ॥३०॥
साधनचतुष्ट्य ह्मणिजे । जे ऐसिये चिन्ही जाणिजे ॥
इतर साधनी न शिणिजे । न गणिजे कलि काळा ॥३१॥
येणे साधने सुनिश्चिती । निजानंदपद प्राप्ती ॥
जरी भेटे सद्गुरुमूर्ती । तरी भवभ्रांती फिटेल ॥३२॥
जन्ममरण निस्तराया । दुस्तर भवसिंधु तराया ॥
शरण जावें सद्गुरुराया । उध्दराया अपपणे ॥३३॥
पळे पळ निमिष । करावें सद्गुरुदास्य ॥
पूर्ण ब्रह्म होती सतशिष्य । भूत भविष्य वर्तमानी ॥३४॥
त्या सतशिष्याची लक्षणे । ह्र्दयभुवनी संरक्षणे ॥
अत्यानंदे विचक्षणे । नुपेक्षणे सर्वथा ॥३५॥
अक्रोध वैराग्य जितेंद्रिय । क्षमा शांती जनप्रिय ॥
निर्लोभ दाता निर्भय । सदय ह्रदय जयाचे ॥३६॥
निरभिमान निर्वैर । नि:संग निरुपचार ।
असूया निंदा तिरस्कार । जयाचे अंतर नेणेची ॥३७॥
अहिंसा अदंभ आर्जव । सबाह्य शोच मार्दव ॥
धैर्योदार्य हे सर्व । गुण अपूर्व ज्यापासी ॥३८॥
मुखी रामनाम स्मरण । साधुसंता अनन्य शरण ॥
शुध्दसत्व अंत:करण । जन्ममरण मोचका ॥३९॥
श्रवण कीर्तन विष्णुस्मरण । पादसेवन अर्चन वंदन ॥
दास्य सख्य आत्मनिवेदन । नवविधा जाण या नावें ॥४०॥
जे सिध्दाचें समाधान । तेंचि साधकाचे साधन ॥
पूर्ण ब्रह्म सनातन । भवबंधनछेदक ॥४१॥
ऐसिया साधने सिध्द झाले । निजानंदपद पावले ॥
जैसे विहंगम झेंपावले । तृप्त केलें अमृतफळे ॥४२॥
या साधन परिपाठी । शुक्रसनकादिकांचिया कोटी ॥
सरत्या झाल्या वैकुंठ पिठी । विष्णु जगजेठी संनिध ॥४३॥
निजानंदाची गोडी । नेणतीच ते बापुडी ॥
विषयसुखे झाली वेडी । पायी बेडी ममतेची ॥४४॥
अनाधिकारी येविशी । साधनी विमुख अहर्निशी ॥
निजानंद त्यांचिये देशी । औषधासी मिळेना ॥४५॥
हा त्यांसचि फावला । अहळे बहळे उपेगा गेला ॥
जैसा अमृतसमुद्री जुडाला । तो मेला, वांचला न ह्मणावें ॥४६॥
तो देही परी विदेही । जगदोध्दारी लीलाविग्रही ॥
एतद्विषयीं संशय नाही । श्रुतिस्मृति ग्वाही देताती ॥४७॥
तो सहज पूर्ण निजानंद । रंगी रंगोनि निर्द्वद्व ॥
निरतिशय सुखाचा कंद । विचरे स्वच्छंद स्वभावे ॥४८॥

N/A


References : N/A
Last Updated : December 16, 2016