११.
अनुभव ज्याचा तो जाणे ॥ध्रु०॥
नवलक्ष याती जलचरें पुसती कूर्मासि हे गुह्य गोष्टी । तुमचे मातेचें तुम्ही स्तनपान करितां कैशी तुम्हांस हे पुष्टी । माझे मातेच्या उदरीं याल जेव्हां कळेल हें कृपादृष्टी ॥अनुभव०॥१॥
दशलक्ष पक्षी मुमुक्षु येऊनि पुसती चातकासी । तृषाकाळीं तुम्हां मेघोदक पावे याची क्रिया आहे कैशी । माझे मातेचे उदरीं याल जेव्हां कळेल हें कृपा ऐशी ॥अनुभव०॥२॥ व्यालीची वेदना व्यालीच जाणे वंध्या नेणे तो प्रकार । शब्दज्ञानी गुरुपुत्रासी म्हणती ब्रह्म दावा निर्विकार । सत्स्म्गें निजरंगें अनुभवी जाणती संशयीं पले अपार ॥ अनुभव ज्याचा तो जाणे ॥३॥
१२.
या प्रपंचीं पाहतां दु:ख्हें कैंचीं । हरिजन निजानंदपद भोगिती तें सुख नेणे विरिंची ॥ध्रु०॥
वृंदारकफल नामरूपा आलें, परि तें समूळचि शर्करेचें केलें । सेवूं जातां रसने गोड । पुरवी या चित्ताचें कोड । स्वात्मसुखामृइतगोडी । तेथें कैंची उंची नीची ॥या०॥१॥
नवज्वरें पय:पान विषवत् झालें । शुक्लपक्षीं चोरटे उपोषित मेले । हरिभक्तां हरिरूप चराचर । अंत:सुख नेणती पामर । विश्वपटीं चित्तंतु त्यासी । म्हणती कुलाई कुंची ॥या०॥२॥
व्याल म्हणुनि मणिमाल उपेक्षिति त्यांतें । भ्रांति पडली संकल्पसंनिपातें । निजानंदपदभुवनीं हाही । प्रपंच पाहतां उरला नाहीं, सहज पूर्ण निजरंगीं । चर्चा काय वदूं ती त्याची ॥ या प्रपंचीं पाहतां दु:खें कैंचीं । हरिजन निजानंदपद भोगिती तें सुख नेणे विरिंची ॥३॥
१३.
अवघा तूंचि तूं, मी नाहीं ॥ध्रु०॥
लहरी तरंग उदधि । तैसी ही जीवउपाधि । आत्मा अखंड निरवधि ॥अवघा०॥१॥
सांडुनि देहममता । तवपदीं नित्य रमतां । मग कैंची विषमता ॥अवघा०॥२॥
आत्मवें पाहतां देवा । श्रुति वदति एकमेवा । निजरंगीं रंग कैंचा दावा ॥ अवघा तूंचि तूं, मी नाहीं ॥३॥
१४.
ब्रह्म सनातन रे, तो हा ब्रह्म सनातन रे ॥ध्रु०॥
निगमागमनीतिशास्त्स्रविशारद, अवलीया तनु रे ॥तो हा०॥१॥
विधि हर सुर नर वंदिति ज्यातें, पदरजपावन रे ॥तो हा०॥२॥
पूर्ण रंग निज पालक तो रे, दु:खविनाश नुरे ॥ तो हा ब्रह्म सनातन रे ॥३॥
१५.
पूर्वज्ञात नसतां तुजला, जग भासत विस्मय नोहे ॥ध्रु०॥
मांसावरि विवर्त ठेला, अहि सत्यचि कैसा पाहें । या मूलमूल तें पाहतां, सत्तेवरि शून्यचि राहे । कल्पनाहि बहुविध झाली, त्या नामरूपें जग ठेलें । ज्ञेय ज्ञाता ज्ञानचि अवघें, मायेनें विवरत केलें । व्रुत्तीनें अनुभव दिधला, तो न्यायचि कैसा पाहें ॥पूर्व०॥१॥
ही अनिर्वचनि हरिमाया, नेणिव हें रूप जियेचें । लवलवीं त्रिकाळचि साधी, परि ब्रह्म न लोपत साचें । हा इंद्रजाल बिंदूचा, देह दाउनि नाहिंच केला । वटबीजीं दाउनि वट तो, बीजाचा पर्वत केला । अरुपामधिं अनंत रूपें, दावी हें नवल न लाहे ॥पूर्व०॥२॥
वंध्यासुत मृगजळडोहीं, बुडतां त्या अंधचि काढी । तो अंधचि पाहिल कैसा, संशय हा अवघा सोडीं । निर्धर्मीं धर्मचि म्हणता, तो अवघा विवर्त सारा । हें गारुड झालें कैसें, याचा तो विचार न करा । परिहारीं म्हणउनि हारीप्रति प्रार्थी रंग निजा हें । पूर्वज्ञात नसतां तुजला, जग भासत विस्मय नोहे ॥३॥