स्फुट पदें ४१ ते ४५

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


४१.
जाणिव तेंचि खरें । जें कां निजरुप दावि बरें ॥ध्रुवपद॥ जें ज्ञाने अनुभविलें । तेंचि बुद्धियोगें हृदयिं धरी । सकळ घटातें समजुनि उमजुनि । आत्मप्रभावें सहज स्मरे ॥जाणिव०॥१॥
दृढ निश्चय मी ब्रह्म म्हणोनी । कुटुंब ऐसें जग पाहे । आत्मप्रभेनें दावित आत्मा । तरणी होउनि सिंधु तरे ॥जाणि०॥२॥
आत्मज्योतिची दिव्य प्रभाही । जाणिव ऐसें वदत श्रुती । हृत्तमहारक वस्तुनिदर्शक । निजरुप साम्यक अर्ध स्फुरे ॥जाणिव०॥३॥
जो जाणे तो निर्जिव बीजचि । इच्छा अंकुर ज्यासि नसे । काष्ठपुतळा भोग घडे त्या । मिथ्या मानुनियां विसरे ॥जाणिव०॥४॥
निजानंद निज रंगें रंगुनि । उलटा होउनि जो पाहे । पाहतां पाहतां हें ना तें ना । निजरूपीं अवशेष मुर. ॥ जाणिव तेंचि खरें । जें कां निजरुप दावि बरें ॥५॥

४२.
नयनीं श्यामराज देखियला, हो बाई ॥ध्रु०॥
कटींतटीं पट केसरी । क्षुद्र घंटिका वरी । असुरमर्दना नरहरी । आला हो बाई ॥ नयनीं श्या०॥१॥
रहित त्रिगुणिं विरहित जनिं । आत्मसदनिं हृदयभुवनिं । वास जेणें केला हो ॥नयनीं श्या०॥२॥
श्रवणीं दिव्य कुंडलें । पदक हृदयीं शोभलें । निजानंदिं रंगलें । पूर्णपणें ठेला हो ॥३॥

४३.
कां हो अझुनी उमजाना । मी कोण हें समजाना । भावें सद्गुरुसी शरण जाना । निष्काम भजाना ॥ध्रु०॥
धरुनीयां अहंममता । विषयीं सुख मानुनि रमतां । लक्ष चौर्‍यांयशी योनी भ्रमतां । वाउगे श्रमतां ॥कां हो०॥१॥
जैसें अंजुळीचें जळ हो । गळोनि जाइल पळें पळ हो । तैसें क्षणभंगुर हें केवळ हो । दु:खाचें मुळ हो ॥कां हो०॥२॥
माथां कां घेउनि ओझें । म्हणतां कां माझें माझें । पाहतां काळाचें अवघें खाजें । भासतें जें जें ॥कां हो०॥३॥
विद्यावैभवें ताठा । भरला सर्वांगीं मोठा । तेणें बुद्धीसी फुटला फांटा । जातो अडवाटा ॥कां हो०॥४॥
ज्ञानी पंडित मी सकळी । आपणा म्हणवीं मी हेळी । मीपणें धडधडिती जैसी होळी । जाणों त्रिभुवन जाळी ॥कां हो०॥५॥
त्यजुनी संसार असारा । विकारी जड दृश्य पसारा । समुळीं हा परता सारा सारा । जाणॊनी श्रुतिसारा ॥कां हो०॥६॥
पावोनी दुर्लभ नरयोनी । निजरंगें रंगोनी । राहवें सर्वदा अधिष्ठानीं । सच्चित्सुखभुवनीं ॥ कां हो अझुनी उमजाना । मी कोण हें समजाना । भावें सद्गुरुसी शरण जाना । निष्काम भजाना ॥७॥

४४.
कामीं कां गुंतूं, कां गुंतूं । मग त्या फळभोगीं कुंथूं ॥ध्रु०॥
प्रारंभी सुख वाटे ज्यासी । परिणामीं दु:खाच्या राशी ॥कामीं कां०॥१॥
नाना योनी जन्मुनि मरणें । ऐसें विषयांचें करणें ॥कामीं कां॥२॥
निजरंगें रंगेन मी । स्वसुखामृत भोगुनि राहिन मी ॥ कामीं कां गुंतूं, कां गुंतूं । मग त्या फळभोगीं कुंथूं ॥३॥

४५.
येईं वो मोराई, माझे माउली, येईं वो ॥ध्रु०॥
प्रेमपान्हा मज देईं वो । ब्रह्म सनातन गाउलिये वो ॥येईं वो०॥१॥
निर्विकल्पकल्पलते तूं एकदंते । संसारश्रांतसाउलिये वो ॥येईं वो०॥२॥
निजरंगें नि:संग अभंग । धांवे पावे माझे माउलिये वो । येईं वो मोराई, माझे माउली, येईं वो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP