स्फुट पदें २१ ते २५

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


२१.
प्रारब्ध भोग आनंदें, एका घरिं नांदति दोघे ॥ध्रु०॥
मांडिला खेळ गारोडी, जाणुनियां सर्वहि खोटें । तैसी ही देखुनि सृष्टी, ज्ञान्याला कौतुक वाटे । बा भिन्न विषय दोहींचे, मग भांडण लागेल कैंचें । काय कमी होय ज्ञात्याचें, या प्रारब्धाच्या योगें ॥प्रारब्ध०॥१॥
वस्तु जरी मिथ्या ठरली, तत्काळचि नष्ट न होयी । सुखदु:खभोग व्हायाला, सत्याची गरजचि नाहीं । कां संशयडोहीं बुडसी, तूं व्यर्थ आग्रहा पढसी, आवडे तेंचि बडबडसी, भुललासी मायायोगें ॥प्रारब्ध०॥२॥
प्रारब्धें मिथ्या जग ठरवुनि आतां, कां करितां संसारातें । वरचेवर ऐसें पुसती, अविचारी तत्वज्ञाते । दोहींचीं भिन्नचि कामें, नेणति या सिद्धांतातें । प्रारब्धभोग तो देई, निजबोधचि निजसौख्यातें । निजरंगीं निजआनंदें, दोन्हीही कौतुक पाहें । प्रारब्ध भोग आनंदें, एका घरिं नांदति दोघे ॥३॥

२२.
रविवंशाभरणा हो यावें ॥ध्रु०॥
सत्यज्ञानानंत अपारा । विगतविकारा जगदोद्धारा । निगमागमसारा यावें ॥रवि०॥१॥
निर्गुणनित्यनिरामयधामा । अवाप्तकामा मंगलधामा । मुनिजनमनविश्रामा यावें ॥रवि०॥२॥
विश्वविलासा श्रीजगदीशा । पूर्णपरेशा सच्चिद्भासा । निजरंगा अविनाशा यावें ॥ रविवंशाभरणा हो यावें ॥३॥

२३.
हें रे, रे हें, रे रे, घ्याईं ॥ध्रु०॥
एक नवल देखिलें भाई । तेंचि बोलत नोबलें कांहीं । बोलत्यासिच ठाव पैं नाहीं । ऐसें तें काय एक पाहीं बापा ॥हें रे०॥१॥
तें हे जवळी परि भासेना । नांदे डोळ्यांत परि दिसेना । ऐसें अलक्ष्य बहु लक्षेना । ध्यानीं अतर्क्य तें तर्केना ॥हें रे०॥२॥
तेंचि सर्वांहूनि थोर आहे । लहान राईहुनिही पाहें । तें वर्णिलें कोणा नवजाये । ऐसें म्हणणें तेंचि तें आहे ॥हें रे०॥३॥
गुरुकृपे जेव्हां पाहसी । स्वानुभावें तुझाचि तूं होसी । मग उरी कैंचि बोलासी । निजरंगीं रंगुनि मौन रहासी रे रे ॥ हें रे, रे हें, रे रे, घ्याईं ॥४॥

२४.
मी माझें विसरें । नाहीं साधन बा दुसरें ॥ध्रु०॥
दु:खित जीव भ्रमें भुलालाहे । कारण त्यासि अहंममता हें ॥मी माझें०॥१॥
यासाठीं श्रुति संग्रहणें । सहकरणें मानस निग्रहणें ॥मी माझें०॥२॥
हाचि मंत्र सनकादिक गाती । भाविक हृत्कमलांतरिं ध्याती ॥मी माझें॥३॥
विद्वज्जनिं हा हृद्रत भाव ।हाचि पूर्ण निजरंगस्वभाव ॥ मी माझें विसरें । नाहीं साधन बा दुसरें ॥४॥

२५.
सज्जन जन सारे जन सारे । पाहतां वस्तुविचारें ॥ध्रु०॥
घटमठमहदाकाशीं । आकाश अद्वय अन्यअविनाशी ॥सज्जन०॥१॥
पाहतां नाना ध्वनी । अवघा एकचि नाद निदानीं ॥सज्जन०॥२॥
चित्सागरिंचे तरंग । सहजीं सहज पूर्ण निजरंग ॥ सज्जन जन सारे जन सारे । पाहतां वस्तुविचारें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP