स्फुट पदें ३१ ते ३५

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


३१.
जिणें दोंदिवसांचें नाहीं साचें । सत्य बोलतों वाचे ॥ध्रु०॥
उपजत दिवसापासुनि काळें, गणित नेमिलें याचें । त्याहीमध्यें आयुष्य परिमित, दु:ख त्रिविधगुणाचें ॥जिणें दों०॥१॥
बाळपणीं तें भय खेळाचें, प्रौढ वयीं वनितांचें । उत्तर वयिं असे भय रोगाचें, शेवटिं भय मृत्यूचें ॥जिणें दों०॥२॥
अस्थिमांसनखशिरनाडीचें, मोटाळें चर्माचें । मुसीं ओतलें हें त्रिगुणात्मक, अटकळ प्रारब्धाचें ॥जिणें दों०॥३॥
ऐकुनि उत्तर नित्य निरंतर, भजन करा रामाचें । निजानंदपदिं रंगुनि राघव, ध्यातां सार्थक या जन्माचें ॥ जिणें दोंदिवसांचें नाहीं साचें । सत्य बोलतों वाचे ॥४॥

३२.
श्रीगुरुराजधणी, असतां कळिकाळा न गणीं ॥ध्रु०॥
काय उणें मज केलें त्यानें, झालें पट्टराणी ॥श्रीगुरुराज०॥१॥
जातां एकांता, मुळी हारपली चिंता । जिकडे पाहें तिकडे अवघी, रंगलि निजसत्ता ॥ श्रीगुरुराजधणी, असतां कळिकाळा न गणीं ॥२॥

३३.
तरीच जन्मा यावें, तें रूप पहावें ग, बाई पहावें ग ॥ध्रु०॥
चिंतिति हरिहर, रूप जें नागर, असे परात्पर, अलक्ष्य अगोचर, तेथें मन हें न्यावें ग ॥तरीच०॥१॥
धोंधों झांगड, वाद्यें अवघड, नाद धडाधड, होत भडाभड, अनुहत ज्याचीं नावें ग ॥तरीच०॥२॥
उलटपलटकर त्रिकूटशिखरपर, अमृत झरझर, वाहे निरंतर, योगबळें तें प्यावें ग ॥तरीच०॥३॥
निजानंदें नारायणछंदें, सद्गुरुबोधें, रंगीं रंगुनि रहावें ग ॥ तरीच जन्मा यावें, तें रूप पहावें ग, बाई पहावें ग ॥४॥

३४.
भासे जगदाकार तरंग ॥ध्रु०॥ मायामृगजळ शाश्वत नसतां, धांवति जेंवि कुरंग ॥भासे०॥१॥
पुत्रमित्रगणगोत्र सर्वही, गजरथधेनुतुरंग ॥भासे०॥२॥
दृग्भ्रमयोगें रज्जु न जाणे, भासे तीव्र भुजंग ॥भासे०॥३॥
पूर्णरंग निजरंगीं रंगुनि, होय सहज भवभंग ॥ भासे जगदाकार तरंग ॥४॥

३५.
आजि धन्य, धन्य धन्य, धन्य, मी वो । हरिविनें न देखें अन्य, मी वो । पूर्वि आचरिलें नेणें कोण पुण्य, मी वो ॥ध्रु०॥
तये गोकुळीं गोपाळ भेटला । माझ्या हृदयीं आनंद बहु दाटला । भवसिंधु हा समूळचि आटला । सोनियाचा सुदिन आजि वाटला ॥आजि धन्य०॥१॥ हाता आले श्रीहरिचे पाय वो । सुख ब्रह्मांडीं तें नसमाय हो । जोडला हा मज तरणोपाय वो । आतां भवभव बापुडें तें काय वो ॥आजि धन्य०॥२॥
आतां कवणाचा नव्हे मी पांगिला । देहबुद्धिचा संग भंगला । लाभें लाभ बहु होतसे चांगला । सहज निजानंदीं पूर्णरंगें रंगला वो ॥ आजि धन्य, धन्य धन्य, धन्य, मी वो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP