६.
संतत हरिचें भजन करावें, अनन्य भावें भूतीं रे ॥ध्रु०॥
खटाटोप अवघा हा यत्नचि, कर्म त्रिविध करि पारचि रे । सोहं सोहं निजआनंदें, ब्रह्मभुवनिं मग पावें रे ॥संतत०॥१॥
अव्यक्ताच्या मूर्ति सगुणा या, लोहस्कांतीं अटणें रे । खोटें परि प्रतिबिंब दाखवी, भाळींतिल जो आगम रे ॥संतत०॥२॥
ज्ञानें ज्या निजपदा जाणिलें, बुद्धी तेथें न्यावी रे स्वरुपामघिं तें अरुप पहाणें, परमामृत हें चाखें रे ॥संतत०॥३॥
हरि हरि म्हणसी पाहुनि त्यागिसि, तरि मग कैसा पावे रे ॥ निजानंद निजरंगीं रंगुनि, रंगनाथ धरि भावें रे । संतत हरिचें भजन करावें, अनन्य भावें भूतीं रे ॥४॥
७.
कशी मग देव करील दया ॥ध्रु०॥ शुष्क हरीचें नामचि वदसी, त्यागिसी ना काया ॥कशी०॥१॥
अनन्यभावें शरणचि म्हणवुनि, भोगिसि या विषयां ॥कशी०॥२॥
निष्कामाचें भजन सकामी, कर्म न सांग यया ॥कशी०॥३॥
तत्त्वमसीचा बोध न होतां, भवभय हाराया ॥कशी०॥४॥
निजानंद निजरंगीं रंगुनि, मन ठेवी पायां ॥ कशी मग देव करील दया ॥५॥.
८.
भाविक आवडती, ते मज भाविक आवडती ॥ध्रु०॥
अर्थी आर्ती जिज्ञासू नर, ते न मना पडती ॥ते मज०॥१॥
निद्रिस्तातें जागृत करुनी, जे भावें रमती ॥ते मज०॥२॥
अहंवृत्तिच्या टाकुनि भावा, ऐक्यरुपें जडती ॥ते मज०॥३॥
वेडे होउनि निजानंद निजरंगीं जे रमती ॥ ते मज भाविक आवडती ॥४॥
९.
कांहिं विवेक करा, जागा, कांहिं विवेक करा ॥ध्रु०॥
उदकाविण बिज उगम न पावे, स्वात्मविचार वरा ॥जागा०॥१॥
अद्वैताचें ज्ञान सफल हें, पूर्वाभ्यास हरा ॥जागा०॥२॥
बुद्धीचा हट निरसुनि याचें, कांहीं स्मरण वरा ॥जागा०॥३॥
निजानंद निजरंगीं रंगुनि, हा भवउदधि तरा ॥ जागा, कांहिं विवेक करा ॥४॥
१०.
संता प्राक्तनकर्म जडे, परि तो भोग तयां न घडे ॥ध्रु०॥
खडा मारितां अवनितटावरि, लागुनियां मुरडे ॥संतां०॥१॥
हेमबळें तें मस्तक फुटतां, दु:ख तयां न जडे ॥संतां०॥२॥
वर्षाकाळीं शुद्ध नदासी, क्षारचि तोय दडे ॥संतां०॥३॥
निजानंद निजरंगिं पाहतां, पाहणें तें विघडे ॥ संतां प्राक्तनकर्म धडे, परि तो भोग तयां न घडे ॥४॥