मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
खरे कारण

खरे कारण

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- छेः चुकलेच ते !
- पण त्याला काही इलाज नव्हता.
- मी म्हणतो दिला असता खांदा. काय बिघडले असते ?
- बिघडले नसते काही... पण
- चार तर खांदेकरी, बोवा अधिक असते तर काही हरत नव्हती.
- ते खरे...
- अन् त्या पुढल्या दोघांपैकी एकजण तर किती वाकला होता, अगदी रडकुंडीला आला होता !
- रडकुंडीला येईल नाहीतर काय होईळ ! बिचारे सोळा सतरा वर्षाचे तर पोर ! अन् थोडे का लांब जायचे !
- मग इतके असून तू का नाही मला खेचलेस, काही काम नव्हते काही नव्हते.
- कामाचे नाही रे ! अन् असते काम तर काय मोठेसे - ! अशा वेळेला नाही उपयोगी पडायचे तर केव्हा पडायचे ?
- असे वाटत असून मग का... ? का प्रेत परदेशाचे होते म्हणून ?
- नाही तसे नाही ! परदेशाचे, नाही कोणाचेही असले, वेळ पडली तर खांदा हा द्यायलाच पाहिजे.
- हेही तूच म्हणतोस, अन् ‘ नको जाऊस ’ हेही तूच म्हणतोस ! तेव्हा आता... हं !
- मला वाटते... प्रेताचा विटाळ... आणि ‘ लोक काय म्हणतील ! ’ ह्याचे भय, यामुळेच आपण कचरतो.
- इतकेच काही नाही...
- आणखी थोडे प्रेताचे भय...
- मग मुसलमानांना नाही का वाटत प्रेताचे भय ? ते का... ?
- पण प्रेताच्या भयापेक्षा, ‘ खांदा नाही दिला तर लोक काय म्हणतील ! ’ याचे भय अधिक त्यांना वाटत असते ! आणखी त्यांच्यात प्रेताचा विटाळही नाही.
- एकंदरीत जगातले वागणे, म्हणजे “ लोक काय म्हणतील ! ”
- पण त्याच्याही मुळाशी धर्म आहे !
- हो. तेही आहेच.
- ‘ रस्त्यात प्रेत चालले असता, त्याला खांदा न देणे म्हणजे महत्पाप, अधर्म आहे ’ अशी समजूत जर आपल्याही हाडीमासी खिळली असती तर आपणही -
- म्हणजे बुद्धीला बरे वाईट वाटण्यापेक्षा, धार्मिक सवयीनेच पुष्कळसे जग चालले आहे ?
- यात काय संशय ! काही काही धार्मिक सवयीच इतक्या अमोलिक आहेत की, त्यामुळेच माणुसकी, स्वदेशाभिमान, स्वदेशरक्षण, वगैरे...
- काय पहा ! मधापासून आपण बोलतो आहो, पण ते प्रेत काही केल्या डोळ्यांपुढून हालतच नाही ! चैनच पडत नाही !
जाऊ दे रे !
- ‘ तूं खांदा का दिला नाहीस ? तूं खांदा का दिला नाहीस ? ’ असे सारखे विचारीत आहेसे वाटते.
- लक्षच देऊ नकोस म्हणजे झाले.
- मी मेलो तर... माझे प्रेत एका खांद्यावाचून खोळंबले राहील ! असेच भय... ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP