मी आणि ही

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- का ? एकदम असा दचकलास का ?
- ऊन कोण रखरखीत पडले आहे, आणि ही तर भांडी
घाशीत आहे !
- मग ? हे तर रोजचेच आहे.
- आणि मी तर खुशाल आपला माडीवर झोप ताणीत होतो !
- आज सुटी आहे म्हणून. येरवी तर नाही ?
- येरवी तरी काय ?
- नोकरीवर नाही जावे लागत ?
- अरे पण नोकरी जरी झाली, तरी अशी भर उन्हात नाही
करावी लागत ! आणखी मधून मधून आम्हाला सुट्या
असतातच ! तसे कोठे आहे यांना ?
- हो ! बायकांना ठेवल्या आहेत सुट्या त्यांच्या बापांनी ! हं: !
- खरेच, काय हे आयुष्य ! सकाळपासून ते निजेपर्यंत,
झाडणे, सारवणे, स्वयंपाक करणे, धुणी, धुणे, दळण,
कांडण -
- रामराम ! रोज तेच तेच ! घरात विस्तव, बाहेर विस्तव !
किती दुर्दैवी आणि किळसवाणे आयुष्य हे ! बहुतेक सगळे
ओसाड असते झाले !
- अरे बाबा, बायकांचे हे असेच असायचे !
- काय असेच काय असायचे ! सत्कृत्याच्या वातावरणात
जीवाला भरार्‍या मारीत नेणारे जोरदार विचार, आणि मधून
मधून चमकणार्‍या सुंदर कल्पना.... पार सगळ्या अगदी
पिसे न् पिसे आम्ही तोडून टाकतो ! आणि मग हाय !! हे
बिचारे जीव ! असेच मरेपर्यंत मातीतच कसेतरी
खरडत - खरचटत फिरत असतात झाले !

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016