ताडी

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- काय ताडीचा वास येत आहे पण ?
- फारच गोड !
- ती पहा त्याने ग्लासात घेतली आहे. जसे काही ताकच.
- हुश्श ! ऊन किती प्रखर पडले आहे ? मी तर तहानेने कसा
अगदी व्याकुळ झालो आहे ! पहा कसा घटाघटा पीत आहे.
काय रे, मला वाटते आपणही -
- हो, हो, त्याला काय हरकत, पण -
- मग काय चलाय - चे ?
- मोठा शहाणा ! ताडी ? ती ताडी प्यायची ?
- काय चमत्कारिक आहेस रे ! छे बोवा ! कोणत्या वेळेस
तुला काय इच्छा होईल आणि काय नाही ! एक वेळ दैवी
इच्छा, तर लगेच दुसर्‍या वेळेस सैतानी !
- खरेच असे का बरे ?
- काय बोवा.
- पण हे असे होते खरे. नाही ? ज्ञानाचे इतके आपण
जोरजोराने घाव घालतो पण अजून काही वाईट वासना
पुरत्या मरत नाहीत ! मेल्यासारख्या वाटतात, पण पुन:
केव्हा दगा देतील, काही सांगता येत नाही ! निदान
जागच्याजागी चुळबुळ तरी खास करीत राहतील ! पण
कायमच्या मरत म्हणून नाहीत.
- हं:, मला नाही वाटत त्या अजिबात कधी मरतील -

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016