पाखरे

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


-जीवा, काय म्हणतोस ?
- ही सगळी पाखरे की नाही तडफड तडफड करीत आहेत. आई आई !
कशी सुंदर पाखरे ! पण अन्नावाचून -
- मग त्यांना खायला का नाही घालीत ?
- घातले ! सगळे काही केले ! पण त्यांना हे तू आणलेले जाडेभरडे अन्न
आवडत नाही आणि खाल्ले तर पचतही नाही.
- मग मी तरी काय करु ?
- अरे त्यांना पचेल असे खायला आण. चांगले आकाश फोडून जाणारे
जोरदार पक्षी आणायचे आणि त्यांना खायला काय ? तर असली ही
नासकी कुचकी फळे ! आणि हा पिंजरा तरी काय ! सगळा
खिळखिळीत. कुठे पट्ट्याच मोडल्या आहेत तर कुठे ताराच निसटल्या
आहेत !
- आता एकसारखे जर हे पिंजर्‍याला धडक्या देत बसतात, तर तिथे
पिंजर्‍याने तरी काय करावे ?
- म्हणूनच ! मी जे म्हणत होतो ते येवढ्यासाठी की, आपली नाही
ऐपत, पिंजरा पडला साधा - तर साधे आणि गरीब पक्षी आणायचे !
ते दिले सोडून ; आणि हे अस्मानात जोराने उड्डाण करुन गातगात
भरार्‍या मारीत फिरणारे स्वच्छंदी पक्षी आणून ठेवले आहेत !
कशाला ? नाही त्यांना धड खायला की प्यायला !
- ते खरे, पण मी आणू कोठून त्यांना चांगले खायला आणि प्यायला !
मी की नाही अगदी खचून.....
- मग आणावे कशाला ? बरे हाकून देईन म्हटले तर ते जात आहेत
का ? इतके पिसाळलेले आहेत की जरा कुठे जवळ गेलो की
चवताळून अंगावर धावून येतात आणि मलाच फाड फाडून घेतात.
छे छे छे ! नको बोवा !

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016