आठवण

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- हेच ते झाड नाही !
- हो, याच कढिलिंबाच्या झाडाखाली आपण एक चिमणीचे
पिलू पुरले होते ! किती बरे वर्षे झाली असतील ह्या
गोष्टीला ?
- काही फार नाही तीन किंवा चार वर्षे झाली असतील.
- बिचार्‍याच्या अंगाला कितीतरी मुंग्या लागल्या होत्या !
सारखे तडफडत होते ! ऐन उन्हाची वेळ !
- पण आपण त्याच्या अंगावरच्या सगळ्या मुंग्या काढून
त्याला पाणी पाजले.....
- हं: कसे चोच वासून पाणी पीत होते नाही ?
- हो ! मग त्याच्या चोचीत थोडेसे पीठ घालून त्याला
कापसामध्ये एका टोपल्याखाली निजवले होते ! नंतर मला
वाटते तू तेथे पुस्तक वाचीत बसला होतास का ?
- पुस्तकही वाचीत होतो आणि मधूनमधून त्याला पाहातही
होतो ! पण शेवटी एक दोन तासांनी ते बिचारे मेलेच !
मला त्या वेळेला किती वाईट वाटले ! आणि अजूनही ही
जागा पाहिली म्हणजे -
- मुंग्यांनी बिचार्‍याला अगदी तोडतोडूनच घेतले होते, तेव्हा
आपण तरी काय करणार ?
- हं !
- पण त्याला आपण रस्त्यात फेकून दिले नाही येवढे बरे
केले ! या झाडाखाली चांगले सावलीमध्ये.....
- हीच ती जागा नाही ? येथेच एक लहानसा खड्डा खणला
आणि मग खालीवर कापूस घालून त्याला पुरुन टाकले,
तेव्हा आपल्याला किती समाधान..... किती आनंद वाटला !

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016