यूसलेस

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- बॅस् ! नऊ साडे नऊ नाही झाले तो चालले हपीसात !
- हं:
- दुसरा धंदा नाही. सकाळी उठायचे. जेवायचे की चालले
हपीसात. बरे तिथून आल्यावर तरी ? जेवायचे की स्वस्थ
निजून राह्यचे. फार झाले तर जरा कुठे इकडे तिकडे
चटक्या मारल्या की संपले.
-हं:
- कसले आयुष्य हे ! मला वाटते मेल्यावर जर यांचे सगळे
आयुष्य चाळून पाहिले तर त्यात दुसरे काय सापडणार
आहे ?
- हं:’
- जन्माला आले, शाळेत गेले, परीक्षा पास झाले, नोकरी
केली, डझन अर्धा डझन मुले उत्पन्न केली आणि मरुन
गेले ! हे त्यांचे आयुष्य ! यूसलेस !
- यूसलेस ! यूसलेस का ? नव्वद शंभर रुपये दरमहा मिळवतो
आहे, चांगला सुखाने संसार करतो आहे, आणि म्हणे
यूसलेस ! बरे पुन: तो वर्तमानेही चांगला आहे. मग काय
बिघडले ?
- बिघडायचे आहे काय ! तरी पण -
- हां बरोबर ! आले लक्षात त्यांचे आयुष्य यूस्लेस का ते
आता लक्षात आले. कारण तो वाङमय वाचीत नाही.
शेक्सपीअर वाच, मिल्टन वाच, हे वाच, ते वाच,
आमच्यासारखे लिटररी आयुष्य नाही ! कविता करतो,
चांगली चांगली पुस्तके वाचतो, तेव्हा आम्ही मोठे ! आणि
तो ? उं: !
- तसे नाही मी म्हणत रे !
- मग कसे ? उगीचच ऐट ! स्वारीची मिळकत पाहिली तर
पंधरा नाही तर वीस रुपडे ! घरची माणसे सगळी दारिद्रयात
विवळत पडलेली ! आणि हे चालले कविता करायला !
घरची कविता नाही नीट सांभाळता येत आणि चालले
जगावर कविता करायला ! काय रे, तुझे तरी काय मोठे
आयुष्य यूसफुल् आहे रे ?
- ना - ही खरेच. कारण जन्माला येऊन जीवांना सुख देणे
हीच खरी कविता की नाही ?
- हो मग ? मी तरी तेच विचारले की, जगात आल्यापासून
आपण काय कोणाला सुख दिले आहे ?
- काही नाही !
- होय ना ? तुझा बाप, तुझी आई, झालेच तर ही तीन चार
मुले, बायको, सगळ्यांच्या आशांवर नांगर फिरवून त्यांचे
जीवित उजाड करुन, तू बसला आहेस ना ?
- होय, बसलो आहे खराच !
- मरेपर्यंत तू स्वत: त्यांना रडवशील - आणि तू मेल्यावर
तरी ? ते तुझ्या नावाने रडतच बसतील ! मोठी जगाने तुझी
स्तुती केली, तर त्या स्तुतीला घेऊन यांना काय चाटायचे
आहे ? सांग !
- नको असा संतापूस.
- मग शरम नाही वाटत ? त्याला जो तू मोठ्या ऐटीने
हसलास ते काय म्हणून ?
- नाही, पुन: नाही हसायचा !
- तुला ठाऊक आहे ? तो जर मेला, तर त्याच्या प्रेतावर जे
कृतज्ञतेचे आणि प्रेमाचे अश्रू पडतील तसे तुझ्या प्रेतावर
पडतील का ?
- नाही ! कृतज्ञतेचा एक अश्रूसुध्दा पडणार नाही ! तर माझ्या
प्रेतावर निराशा, संताप, भय यांनीच भरलेले अश्रू !

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016