( दोहावृत्त )
संतांची ऋजु रीति हे, जना लाविती वेड.
कीं पाहति सम विप्र, हो, कुंजर, कुतरे, धेड. ॥१॥
देती हे स्वाश्रितजना शोभा नव नव संत.
असा सदा शोभवि, करुनि लोभा, न वन वसंत. ॥२॥
सदय पद यशा निर्मळा निरुपम उदार संत.
सुरतरु, यांचें ऐकतां सुचरित, म्हणती ‘ हंत ! ’ ॥३॥
ईशचि किंबहुना यशें ईशाधिक हे संत.
काम न संभवला पुन्हा, याहीं करितां अंत. ॥४॥
करिति अनुग्रह सर्वदा; सम सर्वत्रहि संत.
सबळ धवळ हा गुण, जसा गजवदनाचा दंत. ॥५॥
भूतदया या वरगुणें परम महित हे संत.
सेवक होउनि सेविला प्रभुनें एकोपंत. ॥६॥
लाविति षडरिमुखासि हे संत मस, तप नसेच.
ऐसें इतरीं नाशिती संतमस तपनसेच. ॥७॥
संतांच्या करुणा वसे सदा आंत बाहेर.
म्हणति नता, ‘ स्वानंदपद हृदय यांत बा ! हेर. ॥८॥
संतांच्या ऐकुनि जगीं यश:सुधासत्रास,
बाधे न भवाचा जडा, जसा बुधास, त्रास. ॥९॥
तापत्रय सत्संग हरी, लावी न पळ उशीर.
अमृतकरहि ऐसा न, मग किति कर्पूर उशीर ? ॥१०॥
सत्संगें पशुहि तरले, तरति, तरतिलहि फ़ार.
सत्संगश्रित पावतो सुखें भवार्णवपार. ॥११॥
कळि किति ? काळहि जोडितो हात संतरायांस.
विघ्नेश्वरसे शासिती संत अंतरायांस. ॥१२॥
प्रभुगुणसे उडविति रजहि, संत, तमहि मानाच.
यांचा निववि, म्हणे जना संतत महिमा ‘ नाच ’. ॥१३॥
देव न धाले, निश्चयें अमृतें धाले संत.
अन्यरसीं निस्पृह सदा निर्भय झाले संत. ॥१४॥
गंगा संतांच्या स्तवी संगा, पादरज्यांत
अंगा न्हाणी, बहु रमारंगा, आदर ज्यांत. ॥१५॥
गुरुसत्कीर्ति प्रभु गृही राबला, जसा दास.
इच्या धरी ऐकुनि सुधा - राव लाज सादास. ॥१६॥
जो पापनगीं तृणसमीं अनळ - समान, सदार
प्रभु संतांचें, सेवितो, अनळस - मानस, दार. ॥१७॥
मिळतां, कळिकाळांत, या संतांचा शेजार,
न करि जननमरणाख्य हें महाव्यसन बेजार. ॥१८॥
संतांचा, शुभविधिबळें, होय सोयरा जीव.
सत्पुरुष तदाश्रित तसे, जसें तोय राजीव. ॥१९॥
श्रित दीन न होवूं दिला संतानीं परतोन.
मिरवी उदारपण सुगुण संतानीं पर तो न ॥२०॥
ज्यांच्या बोधदिवाकरें हरिति संत तिमिरास,
त्यांच्या विधिहरिहरपदा करिति संतति मिरास. ॥२१॥
संत भक्तिरत मागती, संपदा न, देवास.
मायेला यांचा सदा कंपदान दे वास. ॥२२॥
संतांचे संपादिती सुखेंचि शुचि तप दास.
होती त्यांच्या ते तसे आपण उचित पदास. ॥२३॥
जो भाग्यें सत्कीर्तितें गुणें भाळला जीव,
त्या बुध म्हणती, ‘ जिष्णुचें उणें भाळ लाजीव ’. ॥२४॥
ज्या नम्रा घडलें असे यजन, शुद्ध तप, दान,
तो संतांच्या पावतो, इतर उद्धत, पदा, न. ॥२५॥
युक्तियुता सद्वदनजा उक्ति माय, जे बाळ
भुक्ति काय ?, त्यांच्या गळां मुक्ति घालिती माळ. ॥२६॥
लक्ष पतित तद्दुरित तें कक्ष, दवानळ संत.
दक्ष असे करिते जगीं न क्षम भवविपदंत. ॥२७॥
हरिहरसद्गुण हंस हे, यांचें सन्मुख नीड;
यांला संतांची तसी नसे परांची भीड. ॥२८॥
प्रखरषडरि ते जड रिते पडति, रडति कलिदोष.
संतांच्या तेजापुढें होय विघ्नमुखशोष. ॥२९॥
सच्चरणाश्रित भवभयें न धरी कंपा दीन.
काळहि न म्हणे, ‘ तज्जयें अभिमत संपादीन ’. ॥३०॥
ज्यावरि संतांची दया, त्यावरि हरिची होय.
तेथेंचि पिके, वर्षती जेथें तोयद तोय. ॥३१॥
कवि म्हणति,‘ सदाश्रित सुखें आतपत्र पावेच.
नृपतिपुढें न करुनि वृथा आतप त्रपा वेच ’. ॥३२॥
ढळति पराच्या नच वरें चवरें शिरीं सदैव.
सदनुग्रह नसतां, नव्हे तो शतमखहि सदैव. ॥३३॥
संतांच्या लोकत्रयीं चिर बहुमान वरेंच.
उतरुनि घेती परकरें सुर, बहु मानव, रेंच. ॥३४॥
सदनुग्रह नव्हतां, असे भगवदनुग्रह काय ?
सदनुग्रह उडतां म्हणे भगवदग्रजहि ‘ हाय ’. ॥३५॥
‘ संत अणिक भगवंत हे एकचि ’ म्हणती वेद.
खेद काय जरि कल्पिला भक्तिसुखार्थचि भेद ? ॥३६॥
सामर सहस्रनयन ज्यां पापरसम ते संत.
तामरसनाभिचा रुचे नामरसचि अत्यं. ॥३७॥
सत्कीर्तिस म्हणती सुधा, सुधेसि कांजी, जीन.
असे संत, मग सुर तयां म्हणतिल कां ‘ जी जी ’ न ? ॥३८॥
श्रीदेवर्षिप्रमुख जे विठ्ठलसेवक संत,
त्यां सर्वांतें वंदितो भावें मयूरपंत. ॥३९॥