आचार्य नकार सिकवि बहुबहु, परि तव मुखास येनाच,
गी म्हणती कीर्तिस, ‘ कविवदनीं, द्याया सुखा सये ! नाच. ’ ॥७६॥
जड उपकार न करिल, स्वाधीन असोनि कल्पनग, मोहें;
सुज्ञा ! अल्पोद्धारें यश जें, तें होय अल्प न, गमो हें. ॥७७॥
पाणी एकोपंत द्रवुनि विकळ तृषित रासभा पाजी.
‘ तें लक्षविप्रभोजनसम झालें म्हणति साधु बापा ! जी ! ॥७८॥
म्हणशील, ‘ बांधिला जो मानी, केला पदच्युत, छळिला,
स्वार्थपरा ! अविवेका ! सांगसि हें कार्य काय त्या बळिला ? ’ ॥७९॥
तरि हें मीं मानीना, त्वांचि छळिला मुकुंद, फ़सवीला.
वसवींला प्रभु ! सुतळीं, करुनि निजद्वारपाळ, बसवीला. ॥८०॥
‘ तूं दीन; दीनबंधुप्रभु; न विनविसी स्वयेंचि कां गा ! या ? ’
म्हणसिल बा ! बळिराज्या ! जरि, सांगसि कां मलाचि सांगाया ? ॥८१॥
तरि बा ! त्वदधीन सदा; द्वार कसें द्वारपाळ सोडील ?
मोडील न्याय न, हें आज्ञेनें यश पळांत जोडील. ॥८२॥
स्वाधीन प्रभु असता, दीनजनाचे हरावया कष्ट;
हरि ! हरि ! तरि मज इतुकी ग्लानि करावी न लागती स्पष्ट. ॥८३॥
सुज्ञ ! समर्थ ! उग्र कां ? पतितोद्धारीं यशोर्थ मन घाला.
प्रभु ! हो ! हेचि प्रभुता, नवल न जरि उद्धराल अनघाला. ॥८४॥
व्यासा ! बा ! साक्षात् तूं नारायण, जडजनासि ताराया,
अवतरलासि दयार्ण्व बोधें अज्ञान सर्व साराया. ॥८५॥
कवि म्हणति, ‘ उजळिली त्वां मारीचसखा पराशरा ! वाती.
मंगळघटप्रतिष्ठा मोट्याहि न खापरा शरावा ती. ’॥८६॥
वर्णुनि सत्यवतीतें कश्यपसह म्हणति अदिति ‘ हा साधू
तीर्था त्रिविक्रम तसा म्हणतो जगदंह सदितिहासा धू. ’ ॥८७॥
तुझिया सूक्तिश्रवणें लेशहि तापत्रयें न बाधावें.
बाळें स्तन्यें, अन्यें अमृतरसेंही, असें न बा ! धावें. ॥८८॥
जी शारदी निवविती सर्व चकोरांसि पुनिव, राहो ती.
त्वत्सूक्ति सेवित्यांसि न तिळहि पुह्नां ताप मुनिवरा ! होती. ॥८९॥
पळही जसे स्वरूपा, ज्ञाते विसरति न विप्र भागवता;
ग्रंथ न असा पर; न दे दर्भत्व वरुनि नवि प्रभा गवता. ॥९०॥
बा ! त्वत्प्रसाद हो या तप्ताच्या एकपळ वितान वरी.
मज उद्धरु जो कुंडिननगराजवळूनि पळविता नवरी, ॥९१॥
म्हणसी, ‘ व्हा भागवत, प्रेमें पाहोनि भागवत, नाचा. ’
सर्वांसि सर्व देसी स्वसुख; पिता दे विभाग वतनाचा. ॥९२॥
म्हणसी, ‘ भागवता ! हो मुक्तहि, भगवत्कथापर शुका पी. ’
म्हण मजहि; अरींस तुझा बोध जसा दे व्यथा परशु कापी. ॥९३॥
करुनि कृपा शप्तनृपापरि तारीं तूंचि बा शुका ! मातें.
पुरवी साधु नताच्या न तसा कल्पद्रु आशु कामातें. ॥९४॥
राजा रंक सम तुला; त्वां निववावाचि तापला जीव.
बा ! वरिवरिच निववित्या चंद्रा, हरुनि त्रिताप, लाजीव. ॥९५॥
सांगे प्रह्लाद गुरुप्राप्त समुपदेश दैत्यतोकांतें;
नसतां यश प्रकटिता ज्ञान, जसें चंद्र शैत्य, तो कां तें ? ॥९६॥
कथिलें भागवत तुवां इंद्रप्रस्थाकडील विप्राशी.
हे कीर्ति ‘ भक्तमाळा ’ कथिती, जिस सर्व सत्कवि प्राशी. ॥९७॥
श्लोक, श्लोकार्ध मला कीं सांग श्लोकपाद, नव्यास.
सर्वगतचि तूं, ऐके काय द्रुमदत्तसाद न व्यास ? ॥९८॥
हो सकृप पुंडरीका ! ज्ञानेशा ! पाव, नामदेवा ! हूं.
सांग तुकोबा ! प्रभुच्या चरणीं मन आठ याम दे वाहूं. ॥९९॥
गुरु हो ! पढवुनि जड हरिनाम म्हणायासि जेंवि शुक लावा.
हा चिदचिद्भंथि तुम्हीं बाळकगलपाश तेंवि उकलावा. ॥१००॥