मागें झाले, आतां असती, होणार जे पुढें काय,
त्या भागवतांचे म्यां भावें साष्टांग वंदिले पाय. ॥१०१॥
नामें चोखामेळा वाटे बहुधन्य तो महार मला;
कीं भगवद्भजनींच, त्यजुनि सकळ धामकाम, हा रमला. ॥१०२॥
भागवतज्ञानिसभामान्य सुकवि, जरि कबीर हा यवन;
हरिचें म्हणे, न पाहुनि यासि, न वाहुनि अवीर, ‘ हाय ! ’ वन. ॥१०३॥
ज्ञानें काय हरिजना म्हणतात महार, यवन, कुणबी जीं ?
उमटे तोचि तरुफ़ळीं, असतो जो काय गुप्त गुण बीजीं. ॥१०४॥
नच वचकति हे भक्त, श्वपच वर म्हणे तया शुका नर कीं;
निपट बहिर्दृष्टि असे जे बुडती काय ते फ़ुका नरकीं. ॥१०५॥
म्यां तों तुमचे चरण श्रीहरिजन हो ! सदैव वंदावे.
भगवान् प्रसन्न होतो येणें, कलिकालमोह मंदावे. ॥१०६॥
भगवान् भागवतजना ! परमप्रेमें तुला सकळ वळला.
बाळा ध्रुवा पहातां, प्रभु, जेंवि पिता मुलास, कळवळला. ॥१०७॥
हरिजन हो ! हरि करितो आंगें तुमचीच बरिक सेवा जी !
धुतले धनंजयाचे केवळ अश्लाध्य परि कसे वाजी ? ॥१०८॥
दामाजीचा होउनि हरि पाडेवार बेदरा गेला.
पंडित रागेले, परि नच तत्प्रेमज्ञ बेद रागेला. ॥१०९॥
न करी जपोनि अंगें बळकट घालून काय कछ पर ?
त्या नामदेवजीचें श्रीविठ्ठल विश्वनायक छपर. ॥११०॥
एक जनी हरिभक्ता सिंप्याची ‘हरि हरी ’ म्हणे बटिक;
तीस दळाया लागे भगवान्; वदतील साधु कां लटिक ? ॥१११॥
कोठें उष्टीं काढी, क्कोठें खटपट करी, भरी पाणी;
त्याचा होय गुमास्ता, श्रीरामानंदशिष्य जो वाणी. ॥११२॥
म्हणती, परि न भुलविला राघेनें प्रभुवियोग परिणामीं.
युष्मद्भक्तिमुकुंदां स्मरतां, स्मरतोंचि गीतिगरिणां मीं. ॥११३॥
तुमची भक्ति श्रीहुनि, वन्येहुनि जेंवि नागरी, बरवी;
भक्तिप्रताप कोठें ? कोठें हा अरितमा गरीब रवी ?॥११४॥
चिंता हृदयींच पुरे, जडहि म्हणे ‘ प्राप्तकाम होचि मणी. ’
प्रभुला किमपि न दुर्घट. भारी गरुडासि काय हो चिमणी ? ॥११५॥
जें चिंतितां तुम्हीं बहु वत्सळ सर्वत्र सर्वदा सम जे,
अकथितही सर्वज्ञा देवाधर्मादि सर्वदा समजे. ॥११६॥
निजभक्तोष्टयशस्कर जें कांहीं, तें न सांगतां करितो.
परि तोषप्रद केलें न वदे, न मनींहि आठवी हरि तो. ॥११७॥
म्हणुनि स्वमनींच म्हणा ऐसें मज किंकरासि सज्जन हो !
" वत्सा ! देव तुज म्हणो ‘ मत्कीर्तिसुधेंत मज्ज, मज्जन हो. ’ " ॥११८॥
साकेतीं झालां जे श्रीसीतारामभक्तबावाजी,
भरत तसे प्रभुवल्लभ, ते मज शरणागरासि पावा जी ! ॥११९॥
मथुरापुरींत झालां जें श्रीमत्कृष्णभत्कबावाजी,
देवासमीप वसतां, ते मज शरणागरासि पावा जी ! ॥१२०॥
वृंदावनांत झालां जे राधाकृष्णभक्तबावाजी,
श्रीवैकुंठीं वसतां, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२१॥
मायापुरींत झालां जे कोणी विष्णुभक्तबावाजे,
दीनाचे बंधु तुम्हीं, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२२॥
वाराणसींत झालां जे हरिहरभक्तराजबावाजी,
हरिहारसमीप वसतां, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२३॥
कांचीपुरींत झालां जे सदय मुकुंदभक्तबावाजी,
अघहरिते हितकरिते, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२४॥
प्रकट अवंतीमध्यें झालां जे श्रीशभक्तबावाजी,
निरुपमगुणरत्नाकर, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२५॥
श्रीद्वारकेंत झालां जे श्रीयदुराजभक्तबावाजी,
शुचिकरुणावरुणालय, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२६॥
पुरुषोत्तमसुक्षेत्रीं झालां जे प्रेमसिंधुबावाजी,
भक्त जगन्नाथाचे, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२७॥
जे पैठणांत झालां आदिकरुनि एकनाथबावाजी,
शांतिनिलय भूतसुहृद्, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२८॥
पंढरपुरांत झालां जे, व्हाल, असाल भक्तबावाजी,
श्रीविठ्ठलरूप तुम्ही, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२९॥
जे पूर्वदक्षिणोत्तरपश्चिमदेशांत, मध्यदेशांत,
जे ऊर्ध्वाधोदेशीं, जे सुरदितिदनुजमानवेशांत, ॥१३०॥
श्रीहरिहरभक्त सकलतीर्थक्षेत्राचलस्थलवनांत,
त्यांच्या, ‘ हा प्रणत तरो, ’ ऐसें येवू सकृत् तरि मनांत. ॥१३१॥
इतरांहीं स्वबागचे, गरलाग्नि तुवांचि शंकरा ! खावा.
बा ! उपमन्यु, स्तेन, व्याध तसा हाहि रंक राखावा. ॥१३२॥
जगदंबे ! तूं, प्रभुला प्रार्थुनि, बहु उद्धरीत आलीस.
मजविषयीं सांग; नको सांगों सांगावयास आलीस. ॥१३३॥
भगवति ! करुणामयि ! तव दयित वचन तो कधीं न मोडील.
जोडील क्षणमात्रें यश, वश पति पतितपाश तोडील. ॥१३४॥
त्या कालकूटपानीं त्वां अनुमोदन दिलें कसें पतितें ?
जें मदपराध गिळणें हें दुष्कर कर्म होय कीं सति ! तें ? ॥१३५॥
रेणुस करिल सुमेरु प्रभु, रेणुचि करिल कीं सुमेरूस ?
वद; रदबदल नच गणिल जरि, तरि पळमात्र तूं उभे ! रूस. ॥१३६॥
हरिनामा ! तार दहामांजि पदर धरिल हा लघु सलील.
अर्थी इष्ट न मिळतां नच सोडिल, करिल हाल, घुसळील. ॥१३७॥
भगवन्नामा ! अपयश होऊं देऊं नको. पतित सारे
तरले, एकचि उरतां, कोपेना काय तो पति तसा ? रे ! ॥१३८॥
श्रीहरिहरनामें हो ! जह्रि बहु दोषी असा धुवा दास
दीनीं एकींच अदयपण, तें पोषी असाधुवादास. ॥१३९॥
मी दीनबंधु ऐसें मिरविसि विश्वांत सर्वथा नातें.
न धरूं देसी जननीसुरभींच्या लेश गर्व थानांतें. ॥१४०॥
बहु भजुनि रामनामा ! वैकुंठीं सर्वथा पतित रमला.
बा ! न करु बाज होउनि आपण कळिकाल पाप - तितर मला. ॥१४१॥
चिंतामणिच्या धामा ! विसरविसी स्वर्गतरुकुसुमदामा.
आम्हां बाळां आमा रामाचा प्रतिनिधीच तूं नामा ! ॥१४२॥
नामा बा ! माता तों वात्सल्यें त्वां उदंड लाजविली.
उद्धरुनि पतित रामप्रभुकीर्तिहुनि स्वकीर्ति साजविली. ॥१४३॥
वसलेंसि पिंगलेच्या जैसें, श्रीनारदादि धीराच्या,
रामसुतमयूरमुखीं वस नामा ! वससि जेंवि कीराच्या. ॥१४४॥
उपसंहार
( अनुष्टुभ् वृत्त )
श्रीसद्गुरुप्रसादें हा उपाय हित पाहिला;
‘ महद्विज्ञापना ’ नाम ग्रंथ रामासि वाहिला. ॥१४५॥