गुरुस्तुतिमुक्तांजलि १

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीगुरुचरणस्मरणप्रणतिस्तुतिदर्शनार्चनश्रवण
येथेंचि हृदय संतत संत तरति करुनिया अतिप्रवण. ॥१॥
श्रीगुरुचें चरनाबुजरज जें, तें मुख्य होय मंगल गा !
अंगलघा सिद्धि सदा याच्या; याचाचि धरिति संगलगा. ॥२॥
श्रीगुरुचरणोदक हें तीर्थांचें जनक; विप्र या गाती.
‘ याची सुकीर्ति ’ म्हणती ‘ न ’ ज्ञाते जन कवि ‘ प्रयागा ती. ’ ॥३॥
श्रीगुरुराज वदान्य; प्रणति करिति सर्व कल्पनग यातें.
जें हा प्रणतां देतो, जीवांला शेषतल्प न, गया तें. ॥४॥
श्रीगुरुकडे भवमहाव्यसनीं गुरुभक्त चित्त पाठउनी,
होय सुखी, हेमंतीं देउनि शीतार्त जेंवि पाठ उनीं. ॥५॥
गुरुभक्ता बहु मानी, हंस भजे मानसा सरला जो.
श्रीगुरुला श्रीपतिचा करिता बहुमान सासरा लाजो. ॥६॥
श्रीगुरुच्या कीर्तीची, ज्योत्स्रेची, सम म्हणों नको रीती.
अतिधवळा हे होती, केवळचि वही म्हणोन कोरी ती. ॥७॥
श्रीगुरुची, चंद्र अमृतकर म्हणति परि, न बराबरी लाहो;
याची प्रबोध पावो, कीं पात्र गुणें बरा बरीला हो. ॥८॥
दोषाकरा जडात्म्या आणिल गुरुच्या नवीन समतेला,
सारासारज्ञाता न म्हणे हय्यंगवीनसम तेला. ॥९॥
गुरुभक्तांत नव्हे, जो म्हणता गुरुराज तपन - सा, मान्य,
नाशी गुहातम न. मग कैसें तत्तेज तप न सामान्य ? ॥१०॥
श्रीगुरुचें नुरवी परदर्शन सुखसदन ताप दासांचे.
कामादि शत्रु जे जे, त्यांतचि गुरुपदनतापदा, सांचे. ॥११॥
श्रीगुरुनें लीळेनें सर्व श्रुतिशास्त्रसार पढवीलें.
ध्रुवबहुमत  परमपदीं, रंकांतें कर धरूनि चढवीलें. ॥१२॥
श्रीगुरुचा प्रेमा जो म्हणती करिजेल तो कवि न तातें.
वात्सल्यभरें भावी केवळ कळवळुनि तोक विनतातें. ॥१३॥
श्रीगुरु - अधिक, सुखविलें जें पोषुनि काय, न, मन माते तें.
कोप न याया शतदा मीं न करिन काय नमन मातेतें ? ॥१४॥
श्रीगुरुच्या सोडावें न नता प्रेमें, जसें नभा वातें.
इष्टा मित्रा सुहृदा आप्ता सख्ख्याहि ये न भावा तें. ॥१५॥
श्रीगुरुच्या उक्तिसमा नुति मजि म्हणेल कामकपिला जो,
पशुता कल्पुनि चित्तीं तोही म्हणतां न रामकपि लाजो. ॥१६॥
श्रीगुरुला ‘ चिंतामणि ’ न म्हण जिभे ! शब्द मान; दगड दया -
काय करिल ? न पडों दे श्रीगुरु पदरेणु मानद गडद या. ॥१७॥
श्रीगुरु न स्पर्शमणिहि, कीं तोहि तयाचि सारिखा; परिस
निवडहि करितो, लोह स्वीकारी, दूर सारि खापरिस. ॥१८॥
श्रीगुरुचें वचनामृत त्या अमृताहूनि अधिक; या सुरसा
सेउनि, इतरा न रसा नर साधायासि तळमळे सुर - सा. ॥१९॥
श्रीगुरुचे जे, त्यांच्या कामाद्युग्रारि साहती लत्ता.
गुरुभक्ताची चाले त्या काळावरिहि सर्वदा सत्ता. ॥२०॥
श्रीगुरुचरणाची जी संख्येयाखिलगुणा न धूलिहि ती.
मोजावयासि असतें शक्य तरि, कधींच विधित्रधू लिहिती. ॥२१॥
श्रीगुरुनें क्षणभरि जें द्यावें सुख किमपि दंभरहितातें,
तें देइजेल न सुता, विधि होउनि कल्प शंभरहि, तातें. ॥२२॥
श्रीगुरुपदसरसिज जें तदुपासकचित्त बंभरचि तें हो !
गुरुयशसें न इतरसुख; अमृत - तसें काय अंभ रचितें हो ? ॥२३॥
श्रीगुरु हा भवसिंधुप्राशनकरिता महाघटज नांदे.
जनिमरणपथश्रांतां, पर सुख, पांथां जसा वट, जनां, दे. ॥२४॥
श्रीगुरु हा चतुरानन चतुरासि नव्या नव्याचि सृष्टींत
किति न चमत्कृति दावी ? प्रकटाया प्रेमबाष्प दृष्टींत. ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP