महद्विज्ञापना २

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


उद्धरुनि शिळा केला प्रभुदित तो अतितपा वनामाजी;
बा ! दुष्करा समुद्धृति काय अशा पतितपावना माजी ? ॥२६॥
सामर्थ्य विश्वविश्रुत, अमित समुद्रांत तारिले दगड,
होइल कीर्ति, प्रभुशीं मजविषयीं बा ! बिभीषणा ! झगड. ॥२७॥
अथवा कुबेर, शंकर, नारद, इकडून सूत्र लाव कसा !
तुज जड नसेंचि बा ! मीं, दीनतर खगेश्वरासि लावकसा. ॥२८॥
गुण पुससिल, तरि पढला शास्त्रास न मंद हा, न वेदास;
येतें नामाचि; सर्वश्रेष्ठ म्हणुनि ज्यास मानावे दास. ॥२९॥
आहेंचि लहान, तुझ्या, बा ! न म्हणावाचि परि लहान, मनें,
कीं गुरुयशस्कर पतित उद्धरिला कोटि करिल हा नमनें. ॥३०॥
मज भागवतांचा, कीं नामाचा भरवसा, न इतरांचा,
बा ! अकलंका ! लंकानाथा ! बाळासि जेंवि पितरांचा. ॥३१॥
द्रवलें नाम, तुम्हींही गुरु भागवत द्रवाल, अटकळतें;
परमप्रिय नाम तुम्हां; यासि न जें अनुसरेल फ़टकळ तें. ॥३२॥
आदिकवे ! प्रभुचरितीं सुज्ञ, जडहि, पावतो हुरुप, रमतो;
श्रीरामचरणकमळीं लाविल जीवांसि जो, गुरु परम तो. ॥३३॥
गातां त्वत्कृति, मानिति पुरवासाहूनि कुशल वनवास.
स्मरति, स्मरविति न वपुहि, केवळ तव शिष्य कुश लव, न वास. ॥३४॥
झालासि पढविता प्रभुपुत्रांतें रचुनि तूं सुकाव्यास,
देवर्षिवरें जैसें निववाया भागवत शुका व्यास. ॥३५॥
तें आयके स्वयें प्रभु, हयमेधीं सत्सभेसि आयकवी;
नायक विद्वांसांचा निवुनि, म्हणे, ‘ रचिल अन्य काय कवी ? ’ ॥३६॥
चरित श्रीरामाचें जें शतकोटिप्रविस्तर, तशातें
तूं सुललितप्रबंधें रक्षक सुकविच बलप्रद यशातें. ॥३७॥
त्यजिली वनांत अनघा, ती त्वां प्रतिपाळिली, जसी तातें,
उपकारलक्ष विसरे पलहि न रघुराजमति, न सीता तें. ॥३८॥
जनकदशरथांचा तूं प्रियसख, तातचि, न हें किमपि चित्र;
गृध्रा जटायुतें प्रभु ‘ तात ’ म्हणे, गुरुचि होय गुरुमित्र. ॥३९॥
भीड तुझी प्रभुला गुरुगाधिसुताची जशी तशी आहे,
वाल्मीके ! भगवंता ! माझी विज्ञापना तुला बा ! हे. ॥४०॥
प्रभुसि कथुनि, मज तारीं; विश्व तुझें यश महाकवे ! गाय.
धर्मज्ञा ! वाल्मीके ! आली तृषिता न हाकवे गाय. ॥४१॥
ब्रह्मण्य श्रीराम प्रभु, करि राहुनि समोर विप्राज्ञा;
वेदचि मूर्त स्ववच; श्रोत्यांचा तूं तमोरवि प्राज्ञा ! ॥४२॥
लिहिलें त्वांचि प्रभुवर, सर्व करुनि उक्त, हर्षवि श्वातें,
बा ! तुजचि न, देइल हा जन, होउनि मुक्त, हर्ष विश्वातें. ॥४३॥
ज्यातें त्यातें ‘ तारा, तारा ’ म्हणतों, नमूनि मीं पाय;
म्हणसिल मज लुब्रा म्हण. सुब्राह्मणसत्तमा ! करूं काय ? ॥४४॥
अर्थिजनें प्रार्थावे, जेंवि सुमलिनें अयें परिस, दाते
फ़ळतीच, आर्जवावे, बहु सोडुनि आळसा, परि सदा ते. ॥४५॥
पसरुनि आनन, मान न धरुनि, वरुनि दासता दरिद्र वदे,
अकरुणधनिकजनमनीं लेशहि न प्रार्थना तरि द्रव दे. ॥४६॥
बा ! साधु तुम्हीं, न तसे नतसेवककामकल्पतरु, सावे,
पावा मज. न तुम्हांवरि तुमचे गुण ‘ हंत ’ जल्पत रुसावे. ॥४७॥
बोलाना, भेटाना; भ्यालां पापासि ? नारदस्वामी !
काय म्हणेल तुम्हां ? जो म्हणतो ‘ भवसिंधुपारद स्वा मीं. ’ ॥४८॥
बा ! पापिजनोद्धारीं तुजचि सदा परम हर्ष देवर्षे !
देसी प्रणतांसि, जसा मेघ मयूरांसि हर्ष दे वर्षे. ॥४९॥
तुज भामादुर्गांहीं हरिहर दिधले, तुझी खरी सत्ता;
न असा अन्य, ब्राह्मणवर भृगु मारी जह्री उरीं लत्ता. ॥५०॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP