( गीतिवृत्त )
श्रीपतिभक्तोत्तम जो, गावा तद्रूप बामनस्वामी.
ज्या होवुनि लुब्ध, म्हणे, ‘ त्यजिन श्रीकृष्णनाम न, स्वा मीं ’. ॥१॥
सगुण, श्रीहरिभक्त, ख्यात, ज्ञात्या जनांत हा शुकसा
बहुजन्मसिद्ध; ऐसा साधेल सुपक्क योग आशु कसा ? ॥२॥
काम न वामनचित्तीं मोक्षाचा कृष्णभक्तिवांचून;
भगवद्भजनचि केलें अनुदिन; किमपि न तदन्य, वांचून. ॥३॥
श्रीहरिचीं बहु रचिली, देती जीं हर्ष नित्य नव, चरितें.
भक्तिज्ञानरसभरित यत्कवन, जयांत एक न वच रितें. ॥४॥
केली श्रीगीतेची व्याख्या, बहु भक्ति जींत गाजविली;
साजविली साधुसभा; भाषाकविकवनशक्ति लाजविली. ॥५॥
रीति समश्लोकीची अतुला, साधेल काय नव्यास ?
या सुयशें होयिल कां रोमांचव्याप्तकाय न व्यास ? ॥६॥
वाटे सूक्तिश्रवणें मस्तक वाल्मीकिनेंहि डोलविला.
प्रभुनें, भुलवाया मन, वामन हा वेणुसाचि बोलविला. ॥७॥
याच्या सद्रसभवनें कवनें तो नाचलाचि नाकर्षी.
हरिजन हरिजनहृदया, जैसा चुंबक अयास, आकर्षी. ॥८॥
अन्यत्र नसे, कवनीं यावे रस सर्व, हा नियम काहीं.
केली, भाषाकवि जे, त्यांची तों गर्वहानि यमकाहीं. ॥९॥
शोभावि भगवान् सुयशें, देवुनि वर, वामना सदा साचा.
करितो प्रसाद, येतां प्रेमा बरवा मनास दासाचा. ॥१०॥
वामन वामन साक्षात्, तरिच असा हा महातपा वेधी.
बहु सुख हरिदासांची, ज्याच्या कृतितें पहात, पावे धी. ॥११॥
निवतोचि वामनाच्या, मानुनि भगवंत वामन, कवनीं.
न शिरे, गुरुसीं हरिसीं चित्तांत असोनि वाम, नाकवनीं. ॥१२॥
भक्तमयूरें स्वविला वामन हा मन विशुद्ध होयास;
पंक प्रक्षाळाया प्रार्थावें प्रथम पूरतोयास. ॥१३॥