श्रीगुरुराया ! शुद्ध ब्रह्माचि तूं. नर न, दिससि जरि नर - सा.
तक्र तसें दुग्ध दिसे; दोहींच्या किमपि साम्य परि न रसा. ॥७६॥
श्रीगुरुराया ! दिसला गोपांच्या बाळकांत बाळक - सा;
म्हणुनि म्हणावा, कळतां तेज, पशुपबाळ विश्वपाळ कसा ? ॥७७॥
श्रीमद्रुरो ! दिसे श्रीदत्त म्हणुनि योगिनायक पिसाच.
मारुति कपि - सा दिसतो, यास्तव तो होय काय कपि साच ? ॥७८॥
श्रीगुरुराया ! उपमा नाहीं तुज, हें तुजें तुजचि समजे.
ते न बधतीच, झाले, भजुनि तुज स्वात्मदा, तुजचि सम जे. ॥७९॥
श्रीगुरुनाथा ! माथा लववुनि, हा दास बोलतो कांहीं.
बोलावेचि शिकविले, हृदविनोदार्थ, बोल तोकांहीं. ॥८०॥
श्रीगुरुराया ! उपमा योजावी विष्णुची तुला, तरि तो
मायापति, तूं मायाहर, हा गुण मम मना मना करितो. ॥८१॥
श्रीगुरुराया ! माया, पायाला या भिऊनियां, पळती,
श्रीवुष्णु जिला आश्रय झाला, न टिकेचि तुजपुढें पळ ती. ॥८२॥
श्रीगुरुराया ! करितो परिपूर्ण तुझा अनुग्रह रित्यातें.
उग्र कनककशिपुसि, जो तत्सुत, झाला अनुग्र हरि, त्यातें. ॥८३॥
श्रीगुरुराया ! ज्या तूं होसी, होती प्रसन्न त्या सर्व;
जैसे सुर पार्थातें झाले, होतां प्रसन्न तो शर्व. ॥८४॥
श्रीगुरुराया ! अंतर्बाह्य न अन्यत्र सर्वथा नातें.
आया - बाया, माया दाविति, देती न सर्व थानातें. ॥८५॥
श्रीगुरुराया ! कथिली जी त्वां कर्णांत हे तुजी वाचा
चतुरक्षरा, इणें तो हरिला, जो मोहहेतु जीवाचा. ॥८६॥
श्रीगुरुराया ! बा ! या तुझिया नमितांचि पादराजीवा,
शिवता - स्वयंवरवधू घालितसे माळ सादरा जीवा. ॥८७॥
श्रीगुरुराया ! जाया आयासा या स्वजन्ममरणाच्या,
स्मरणाच्या कासेला लागावें बा ! तुझ्याचि चरणांच्या. ॥८८॥
श्रीगुरुराया ! न शिवे ताप कधीं तव पदास शिवल्याला.
अंतर्बाह्य निरंतर बा ! कोण तुझा न दास शिव ल्याला ? ॥८९॥
श्रीगुरुराया ! ‘ दीनं मामव ’ म्हणउनि पदास शिवला जो,
म्हणसि भ्रम स्मरुनि तो उमजुनियां आपणासि शिव लाजो. ॥९०॥
श्रीगुरुराया ! म्हणवी जीवदशा ‘ हाय ! ’ कविस भाजी जी;
तीच शिवमयी केली; तरिच तुला आयकवि सभा ‘ जी ! जी ! ’ ॥९१॥
श्रीगुरुराया ! त्वां दृढ कंठींचा पाश अनव सरकविला.
ऐशा तुज न भजाया संसारीं कोण अनवसर कविला ? ॥९२॥
श्रीगुरुराया ! तूं श्रीकृष्ण, तुझा तत्वबोध हा वेणु,
श्रोतृश्रुति गोपी, व्रज सद्व्रज, नत तोचि पदकमळरेणु. ॥९३॥
श्रीगुरुराया ! प्रेमें सेवावे म्याम तुझे सदा चरण.
हें मात्र न सोडावें, जोडावें निश्चयें सदाचरण. ॥९४॥
श्रीगुरुराया ! टिकला शिकलाहि अलोल कीर हा. यास
पदपंजरीं कथितसे चिरकाळ अलोलकी रहायास. ॥९५॥
श्रीगुरुराया ! वत्सलसागर तूं सर्वदासमैनाकीं.
शिक्षित किमपि वदे ती बहुमान्या प्रभुसि होय मैना कीं. ॥९६॥
श्रीगुरुराया ! कवणा संसारीं स्पर्शला अनय नाहीं ?
स्खलनावांचुनि केलें गमन न विषयीं पथीं अनयनाहीं. ॥९७॥
श्रीगुरुराया ! पावे, ज्यातें पावोनि चित्त आधीतें,
बा ! मज तव प्रसादें, न रुचो स्वप्नींहि वित्त आधीं तें. ॥९८॥
श्रीगुरुराया ! नियमें बुडवुतसे वाहत्यासि गर्व तमीं.
चरणीं असेंन होउनि रज कीं बोधार्णवांत पर्वत मीं. ॥९९॥
श्रीगुरुराया ! द्यावें ज्ञान भजाया, जना न सांगाया.
कां गाया लावील न तुज, तें यावें अभाग्य आंगा या ? ॥१००॥
श्रीगुरुवरा ! रविकरानुगृहीत सुपूर्ण इंदु होय जरी,
रविसम तम शमउनि, सुनिपुणगुण तो न प्रकाश तेंवि करी. ॥१०१॥
श्रीगुरुराया ! पडते मागुनि, घेऊनि जरि उणीव, रिते
तरि ते दासत्व, गळां, पायांच्या पडुनि, कां गुणी वरिते ? ॥१०२॥
श्रीगुरुरया ! व्हाया जलधिच जलधींत मेघबिंदु निघे,
गुरुभक्तिरसज्ञ न तो, गंगावदनेम नद्यांत निंदुनि घे. ॥१०३॥
श्रीगुरुराया ! माझी हे आवडि आळ बा ! पुरीव. सती
अर्धांगीं आहे कीं. वैकुंठाख्या कसी पुरी वसती ? ॥१०४॥
श्रीगुरुराया ! ज्या या जायासुतवित्तसंपदा, साच्या
कृत्याशा अत्युग्रा देती हृदयासि कंप दासाच्या. ॥१०५॥
श्रीगुरुराया ! त्या ती बाधों न दिली सुदर्शनें कृत्या.
चालुं न द्यावें मजवरि संसृतिच्या या सुदर्शनें कृत्या. ॥१०६॥
श्रीगुरुराया ! ‘ स्वयशा ’ जरि ‘ हंस करावया, अहंसा धू ’
ऐसें सांगसि, अद्भुत करिसि, तरि न म्हणसि तूं ‘ अहं साधु. ’ ॥१०७॥
श्रीगुरुराया ! त्यजिना मीं तवपदभजनमानवेशपथा.
करितां या पायांच्या, कोण कुशळ न जन मानवे, शपथा ? ॥१०८॥
श्रीगुरुराया ! नलगे भजनेतर म्हणुनि आण वाहूं द्या.
प्रभुजी ! जें बहुमत, तें मज बाळचि गणुनि आणवा, हूं द्या. ॥१०९॥
उपसंहार
( गीतिवृत्त )
अष्टोत्तरशतसंख्या या स्तुतिरूपा, मुनिर्मळा, मुक्ता
श्रीगुरुरामपदाब्जीं नमुनि मयूरें समर्पिल्या युक्ता. ॥११०॥