नामदेवस्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीनारदमुनिचें जें सुमहद्रत, तेंचि नामदेवाचें;
याणें प्रसिद्ध केलें ‘ विठ्ठल ’ हें भव्य नाम देवाचें. ॥१॥
शतकोटि अभंग मुखें कविसत्तम हा सुखें वदे, वाहे;
पूजा न आठवूं दे, लक्ष्मीचीही सुखेंच, देवा हे. ॥२॥
भक्तिप्रताप लोकीं अत्यद्भुत याचि नामदेवाचा;
परमप्रिय भक्त सखा कीं आत्मा आत्पकाम देवाचा. ॥३॥
बाळपणींच म्हणे हा नामा श्रीविठ्ठलास ‘ जेव कसा ? ’
देव, कसा उतरे जो, त्याचा होतो स्वयेंचि सेवकासा. ॥४॥
तो शुद्ध, नामयाच्या जो गातो आदरें अभंगातें.
जें पातक जड इतरा, श्रीगंगेच्या तसें न भंगा तें. ॥५॥
परमेश्वरप्रसादें भक्तीं अत्यद्भुता वसे शुचिता.
रुचि ताप हरी तीनहि, न तदुक्ति ब्राह्मणांसि कां उचिता ? ॥६॥
किंबहुना नाम्याची भक्ता दासी जनी, तिची वाणी
खाणी पातक, आणी तरिच खळाच्याहि लोचनीं पाणी. ॥७॥
ज्ञानेश्वर ने तीर्था, विरहें चिंता अनामया लागे.
प्रभु साधु श्रीस म्हणे, ‘ मम मन विसरे न नामयाला गे ! ’ ॥८॥
उद्धव, अक्रूर, प्रियभक्त श्रुतदेव, बहु असे कोटी.
परि याचि नामदेवीं प्रीति, चरमबाळकीं तसी, मोटी. ॥९॥
निर्जळदेशीं भरला अड, घेतां स्मरुनि आळ, या तृषितें.
प्रभुनें तेंवि जपावें भक्तास, जसें कृषीवळें कृषीतें. ॥१०॥
उठवी यवनपतिहता धेनु श्रीनामदेव, मग तो, बा !
निजकर्ण पिळूनि, म्हणे अति पश्चत्तप्त, पापनग, ‘ तोबा ! ’ ॥११॥
झाला हा गुप्त, महाद्वारीं जी प्रथमपायरी, तींत.
घालिति जडाहि याचे आपुलिया सदय पाय रीतींत. ॥१२॥
प्रभुतें तसेंचि संत स्तविती सप्रेम नामदेवास.
त्यासि मयूर म्हणे, ‘ बा ! स्वप्रेमाचाचि लेश दे वास ’. ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP