( गीतिवृत्त )
श्रीदानें करुनि तुम्हीं करितां सत्कार नित्य नव संत.
न तुम्हां - ऐसा, करितो, परि तो सर्वत्र नित्य न, वसंत. ॥१॥
विटवित नसां कधीं त्यां, रंजवितां परम अंतरा ज्यांच्या.
लाजवितां रीतीतें सर्व तुम्हीं सदय संत राजांच्या. ॥२॥
निज संततितेंचि करिति पात्र निज धना, न अन्य संततितें.
करितां तुम्हींच जेंवि स्वीयेतें तेंवि धन्य संत तितें. ॥३॥
सर्वार्थपूरणव्रत तों चालविलें तुम्हींच संतानीं.
औदार्यसत्व चिंतामण्युपळीं काय ? काय संतानीं ? ॥४॥
जोडुनि पाणी, प्राणी जो गेला भवदवार्त संतापें,
व्याळें गरुडाश्रित - सा, तो सर्वहि सोडिलाच संतापें. ॥५॥
प्रकटचि आपण, तारुनि इतरासि भवांत, संत तरती, तें.
यास्तव, सच्चरणाब्जीं पावो चित्तालि संतत रतीतें. ॥६॥
व्हा सुप्रसन्नमानस, मज दीनावरि वळाचि, सज्जन हो !
दीनोद्धारींच हृदय तुमचें. इतरीं कदापि, सज्य न हो. ॥७॥
मेळवितां, दीनातें तारुनि, यशें तुम्हींच साधु निकीं.
मोक्षाधिकसुख होतें प्राप्त, असंशय पदार्थ साधुनि, कीं. ॥८॥
वाल्मीकिप्रमुख कवि स्तुति करिती फ़ार साधुरीतीची.
न सुधास्मरण करि रसिक; कीं न्यूना निपट माधुरी तीची. ॥९॥
तुमचें पदरज वाहे तो, जो पाप्यांसि सुगति दे वधुनीं.
कन्या जसि पितृभाग्यें, साधुयशें तेंवि फ़ुगति देवधुनी. ॥१०॥
हरितां दर्शनमात्रें सर्वांच्या पापतापदैन्यांतें.
भयद तुम्हीं षडरींतें, रामशर जसे पलाशसैन्यांतें. ॥११॥
कळिचें तुम्हांपुढें, बळ, भानुपुढें तुछ जेंचि संतमस.
काळमुखीं लावाया, प्रबळ तुम्हीं एक मात्र संत, मस, ॥१२॥
भाग्यें भेटे, असतां या भवसिंधूंत अटत, साधुवट.
होतो सच्चरणरजीं जन, दहनीं दिव्य पट, तसा धुवट. ॥१३॥
बहु रंकांच्या देते झाले पुरुषार्थ साधु निकरा जे,
वैन्यादिहि मानवले, केवळ न तयांसि आधुनिक राजे. ॥१४॥
तारावें दीनांतें, वारुनि उग्रांहि अंतरायांतें.
श्रीरामातें ठावें, कीं एक तुम्हांचि संतरायांतें. ॥१५॥
शरणागतें समस्तें पावावें, जेंचि शर्म संतानें.
केलें सर्वेंही जें भूतसुहित, तेंचि कर्म संतानें. ॥१६॥
तुमचें आर्जव करि तो करि, तोषकर प्रभु स्वयें जपुन.
अपुनर्भवप्रद पदहि आठवि भजनांत, आपुलें वपु न. ॥१७॥
केलें नच सत्पुत्रें, कीं तैसें भजन संत हो ! तातें.
करि तो तुमचें, टाकुनि, आत्मसुखीं अज न संत होता, तें. ॥१८॥
जेंवि तुम्हीं संत भवत्संगनिरत, एक हरि असा रसिक
सद्गुरु तुम्हींच, दुसरे म्हणति, ‘ हित नसेचि तरि असार सिक ’. ॥१९॥
न श्रीतें, परि हरि बहु भुलला तुमच्याचि या सुरीतीतें.
वर्णिति ईतें पूर्वीं इतुकें न गुणप्रिया सुरी तीतें. ॥२०॥
केवळ परार्थचि, तुम्हीं झालां, न स्वार्थ, संत, तरु सेकीं
काम धरी, तो नसतां, नच दे कांहींच, संतत रुसे कीं. ॥२१॥
निधिलाभें पूर्ण मनोरथ ज्या होतात संततोनाचे.
त्याहुनि बहु जो दु:खी, पाहे सुखसिंधु संत, तो नाचे. ॥२२॥
स्वात्म्याच्या परतापा जेंवि अमृतकांति ‘ संप ’ दानांहीं
म्हणतो, तेंवि म्हणतसां, कोठ्ठें हे शांतिसंपदा नाहीं. ॥२३॥
जीवांतें, न मुकुंदा अवलंबुनि, शांति हे, तुम्हां, तारी.
तुमचा ठायीं तरुणी, देवीं ईचीच हेतु म्हातारी. ॥२४॥
म्हणतो मुकुंद, ‘ आत्मा मज न तुम्हांहूनि अधिक, मज्जन हो ! ’
कथिलें शुकेंचि यास्तव, ‘ तुमच्याचि यशोमृतांत मज्जन हो ’. ॥२५॥
‘ देवाधिक ’ वदलों हें लागेलचि कठिण, चित्त परि साहो.
शिक्षित तुमचेंचि, किमपि वदतों शुकबाळसाच, परिसा हो ! ॥२६॥
गुरु म्हणति, ‘ निज श्रुतियुग, बाळमुखांतूनि, आयको, ये तें ’.
येइल अन्यपदार्थ प्रसवीं कुशलत्व काय कोयेतें ? ॥२७॥
वाद्य, स्ववादकजना जो संमत, तोचि धरुनि पथ, वाजे.
चाळकमतेंचि चालति गज, वाजी, मतिबलस्थ, अथवा, जे. ॥२८॥
स्वाराध्यातें सर्वाधिक म्हणतां कीं तुम्हींच कविराजे.
म्हणतों तुम्हां तसें मीं; कां हें न्यायें मदुक्त न विराजे ? ॥२९॥
भगवंता भगवदनुगां, आम्हां तों संत सदनुगां ठावे.
बाळें प्रथम बयेचे, बापाचे चरण, तदनु गांठावे. ॥३०॥
मज दीना देवाहुनि अधिक तुम्हीं संत सर्वथा धर्में.
बाळा जेंवि पित्याहुनि अधिका माताचि द्यावया शर्में ॥३१॥
आम्हां बाळांसि बळें स्वहित तुम्हीं संत पंत पढवीतां.
आत्मपदीं, कर धरुनि, प्रेमें, आग्रह करूनि, चढवीतां. ॥३२॥
नेणे, प्रवर्तवी जो जलदा, त्या सुरवरा हरिस, मोर
थोर प्रभु मानुनि, बहु तांडव मेघाचिया करि समोर. ॥३३॥
अजि मायबाप हो ! हें जरि न वदे तोक साधु, तरि याचें
स्वीकारा स्तवन, कुसुम भगवान् घेतो कसा धुरतियाचें ? ॥३४॥
आर्यांच्या सत्कृतिला आर्य केल्या जपोनि चवतीस.
या कीर्तिसुधेसि जसी, रसिककविमतें नसेचि चव तीस. ॥३५॥