( गीतिवृत्त )
सद्योगगुणमणींची, ज्याच्या हृदयीं, सदा सुखनि वृत्ति,
तो, मज दीना दासा देवू, दावुनि पदा, सुख निवृत्ति. ॥१॥
जो ज्ञानराज भगवान् श्रवणीं सुज्ञान दे, वदे वाचा;
अवतार गमे अकरावा कां सुज्ञा न देवदेवाचा ? ॥२॥
नमन असो त्या, ज्याचीं वचनें वैकुंठसदनसोपानें;
सोपानें यश केलें कीं, ज्याच्या, मोहगद नसो, पानें. ॥३॥
जरि शुचिमूर्ति, सुवृत्ता, मान्या श्रवणोचितें गुणें, मुक्ता;
विद्धा, जडाहि ती; हे अगुणाही तीस करि उणें मुक्ता. ॥४॥
माझें नमन असावें त्या सिद्धा नित्य चांगदेवातें;
यन्नाम यशें, चंदन सुख निववुनि जेंचि आंग दे वातें. ॥५॥
साधु विसोबा खेचर राखे चरणानतासि सुज्ञानें;
केला कृतकृत्य क्षणमात्रें ज्या नामदेव सुज्ञानें. ॥६॥
म्यां वंदिला जनार्दनपंतहि; विसरेन अद्य संत कसा ?
नतमोहा नच राहों दे हा, देहा दृढाहि अंतक - सा. ॥७॥
नमिला शमिलास्यप्रद, शांतिजलाधि, एकनाथ तो भावें.
शोभावें ज्यांचें यश विश्वीं, ज्या देववृंद लोभावें. ॥८॥
मजवरि दया करो तो ब्रह्मज्ञ, ख्यात, केशवस्वामी.
मागतसें हरिचरणस्मृतिवर या नमुनि केशवस्वा मीं. ॥९॥
झाले वंद्य शतमखा ते, गेले शरण भानुदासा जे.
यासीं साम्य पहातां, न उदारा रत्नसानुदा साजे. ॥१०॥
वंदन विठ्ठलराया, ज्याला म्हणती म्हणोनि बुध आत्या;
कीं जे मुमुक्षुचातक, करिती ज्ञानामृतांबुदा ‘ आ ’ त्या. ॥११॥
कर जोडूनि करिन मीं न नृसिंहसरस्वतीस कां नमन ?
सज्जन सेविति ज्याचें सद्यश, व्हाया सुतृप्त कान मन. ॥१२॥
जयरामस्वामियशें हृदया ! राहोनि परिस वडगावीं;
संसारीं फ़ावेना क्षण तरि, पाहोनि परि सवड, गावीं. ॥१३॥
आनंदमूर्तिस शरण भावें, पसरूनि पदर, जावेंच.
बुध म्हणती, ‘ चिंतामणि न गणुनि, गुरुभक्तपदरजा वेंच. ’ ॥१४॥
स्वर्वल्लिसुरभिसुरसरिदधिका, श्रितसर्वकामदा, साची.
श्रीरामाची जैसी सत्कीर्ति, तसीच रामदासाची. ॥१५॥
श्रीरामदाससेवारत जो भरतावतार कल्याण
दुर्वारकामसिंहीं ज्या वीरें घातलेंचि पल्याण. ॥१६॥
नमिला साष्टांग श्रीपतिभक्तिरसज्ञ वामनस्वामी,
रसभवना तत्कवना, मानीं, या तेंवि वाम न स्वा मीं. ॥१७॥
पावे, प्रसन्न होतां देव, सुदामा जिला, असी माते
श्रीकीर्तिहि, जह्रि अल्पचि दे वसु दामाजिला, असीमा ते. ॥१८॥
ज्याच्या, हरिनारायण हें, क्षुधिताच्या जसेंचि अन्न, मनें
बहु मानिलें अहर्निश; त्यास शताधिक असोत मन्नमनें. ॥१९॥
हृदयें, वचनेंहि, रमावल्लभदासासि नत असों, देहें;
प्रभुसि म्हणेल ‘ स्वपदीं ’ दीनाचें चित्त ‘ रत असों दे हें ’. ॥२०॥
मान्य पुरंदरविठ्ठल सुकविकुळीं, पदपराज नाकवनीं;
ज्याच्या, प्रेम हरिपदीं, तैसें हरिपदपरा जना, कवनीं. ॥२१॥
वंदन मंद न करु त्या, ज्याचें प्रख्यात नाम, मालो हें;
मळ जाया, स्पर्शावें त्या, अजडस्पर्शमणिस या, लोहें. ॥२२॥
दासोपंतीं केला गीतार्णव मानवा ! सवालाख;
ग्रंथ परम दुस्तर तो न तयाचि, जसें न वासवाला ख. ॥२३॥
वंदन नंदनसा मीं करितों भावे मुकुंदराज्याला,
वश झाल्या सद्विद्या, सत्कीर्ति, सुमुक्ति, सुंदरा, ज्याला. ॥२४॥
सद्भक्त शंकराजीबावा, त्याला असो न कां नमन ?
तेणें श्रीविठ्ठलपर कवण न केला, असोन कान, मन ? ॥२५॥