( द्रुतविलंबितवृत्त )
निजजना अमृतें बहु तर्पिती, स्वअनवे - अनवे कर अर्पिती;
सतत पूर्ण मुकुंद यशोरसें न, वदना ! वद ना, म्हणती असें. ॥१॥
करिति विठ्ठलभक्त सभामुखें विकसितें नटुनी स्वमहा सुखें;
अहिशिरीं करि नृत्य महामना, नटप तो टपतो अवलोकना. ॥२॥
अजित विठ्ठलभक्त यश:कथा करुनि, दाविति मुक्तिमहापथा;
रसिकसाधुमुखांबुरुहांप्रती हंसविते सवितेचि नराकृति. ॥३॥
शुकचि विठ्ठलभक्त न हें मृषा. नुरविती रसिकीं दुसरी तृषा.
हरियशोरस फ़ार रुचे असा. रसिकता सिकता नुतरे कसा. ॥४॥
करिति विठ्ठलभक्त कथा बरी, सुदृढ बाळहि जीस मनीं धरी;
वश जयासि सदा भगवान् हरी, कुतुक या तुकयापरि भूवरी. ॥५॥
सदय विठ्ठलभक्तचि तोडिती त्रिगुणजाळ, जडासहि सोडिती;
प्रभुचियाहि सुसंकट जें मतें, उलगडील गडी दुसरा न तें. ॥६॥
न तुकयासमशील, न नामाया, प्रिय मिळे न कळींत अनामया.
वरि अभंगसमुल्लसनें रसीं, शुकवचें कवचें नृप तो जसीं. ॥७॥
हरिजनोक्तिसमुल्लसनीं पटु वचन जें वदती न कधीं कटु;
त्यजिति, सेवुनि ज्या, अघवासना; बलवती लवती सदुपासना. ॥८॥
सुख तसें सकळांसहि वाटतें, असुख सर्व पळांतचि आटतें;
निरखितांचि जसें भवपारदा मुनिजना निजनायक नारदा. ॥९॥
वदति जीं वचनें परितोखदें, भवतमाप्रति होतिच ओखदें;
निवविले बहु वंदुनि मागती, भजन ते जन तेथचि जागती. ॥१०॥
कथिति जेथ मुकुंदयश:कथा त्यजुनि विठ्ठलभक्त भवव्यथा;
निरखितां करूणामृतवृष्टिचें अजिर तें, जिरतें अघ सृष्टिचें. ॥११॥
सम सदा अमृत प्रभु वर्षतो, निवुनि सर्वहि सेवक हर्षतो;
घनचि विठठल, भक्त मयूरसा, समजला मज, लास्य करी तसा. ॥१२॥