श्रीगुरु हा नारायण सत्कीर्तिश्रीनिवास अवतारी.
जो घन साधुवनातें, शमवुनि नि:शेष पापदव, तारी. ॥२६॥
श्रीगुरु शंकर, येणें सुदृढ स्वानुभवभव्यचापधरें
भस्म क्षणांत केलें देहपुरत्रय सुतीक्ष्ण बोधशरें. ॥२७॥
श्रीगुरु शक्र, विचाराशनिपातेंकरुनि मोहवृत्रास
मर्दुनियां, दूर करी दु:सह देवादिदेहभृत्त्रास. ॥२८॥
श्रीगुरुचि लोकपाळक साक्षाद्यमधर्म वरूण वित्तप हा.
‘ सत्य स्वनुभवातें ’ श्रुति म्हणति, ‘ स्थिर करूनि चित्त, पहा. ’ ॥२९॥
श्रीगुरुपदप्रसादें श्रीगुरुचा जाणतात महिमा, ते
म्हणति, ‘ अनंता अचळा गुरुमूर्तिच तूं, असी न महि माते ! ’ ॥३०॥
श्रीगुरुमातेनें निजहृदयीं निववूनि आवळीला जो,
माता परेसि म्हणतां, तो , धात्री जेंवि आवळी, लाजो. ॥३१॥
श्रीगुरु समर्थ लोकीं; श्रीगुरुचि पडों न दे नता शोकीं.
श्रीगुरु चिन्मय तो, कीं श्रीगुरु समबुद्धि अरिजनीं तोकीं. ॥३२॥
श्रीगुरु शास्त्रपुराणश्रुतिसज्जनशतमतें असामान्य.
श्रीगुरु जसा कविजना, विश्वांत दुजा नसे असा, मान्य. ॥३३॥
श्रीगुरु माय, श्रीगुरु तात, श्रीगुरु धणी परित्राण.
श्रीगुरु वित्त, श्रीगुरु विद्या, श्रीगुरुचि जीवनप्राण. ॥३४॥
श्रीगुरु सनत्कुमार, श्रीगुरु नारद, जयासि कवि गाती.
श्रीगुरु वाल्मीकिमुनि, श्रीगुरु शुक, ज्यासि सन्मुनि ध्याती. ॥३५॥
श्रीगुरु कपिलाचार्य, व्यास, पराशर, वसिष्ठ, गाधिज. या
श्रीगुरुमूर्ति ध्याव्या, गाव्या, याव्या मुखासि आधि - जया. ॥३६॥
श्रीगुरुचरणांसि पथीं नच कंटक, कीं शिरीं खडा वाहो.
गुरुभक्त म्हणे ‘ जीवा ! मुक्त न हो, गुरुपदीं खडावा हो. ’ ॥३७॥
श्रीगुरुला जी कांहीं सेवा, सुखसंपदा नवि नवी; ती.
मागति गुरुभक्त; दुजी जोडाया कंपदा न विनवीती. ॥३८॥
श्रीगुरुचे चरण शिरीं नित्य धरुनि, गा. त्रपा दुकानातें
देती श्रीच्या; यांसीं लाविं, करुनि गात्र पादुका, नातें. ॥३९॥
श्रीगुरुतेंचि भजावें, नमन करुनि, धरुनि मुक्तिच्या चिबुका.
व्हावें चंदन, किंवा कासे लागोनि युक्तिच्याचि, बुका. ॥४०॥
श्रीगुरु सेविन, होउनि मृगमद, कर्पूर, केसर, अबीर,
या जडपणासि माज्या बहुबहु मानील मुक्तहि कबीर. ॥४१॥
श्रीगुरुतेंचि भजावें प्रेमें, होवूनि बा ! शुभ व्यजन.
स्वीकारील असें जडपण, तो पावेल आशु भव्य जन. ॥४२॥
श्रीगुरुच्या सेवेतें सोडुनि, मीं मुक्तितें भुलेंन्बा कीं.
तींत न हें सुख. येथें व्हावें तैसेंचि म्यां फ़ुलें नाकीं. ॥४३॥
श्रीगुरु कामद म्हणउनि, धरिली म्यां हे मनांत आस नतें.
हांसोत संत, व्हावें ज्यावरि गुरुमूर्ति भव्य, आसन तें. ॥४४॥
श्रीगुरुतें स्पर्शाया व्हाचा तद्वस्त्रपात्र, हा टोपी.
परमवदान्यापासीं अर्थीं न मनोरथास आटोपी. ॥४५॥
श्रीगुरुभक्त म्हणेल ब्रह्मयासि ‘ तुझेंहि पद नको. राया ! ’
गुरुपद गुरु पद व्हावें, करुनि नवस, यवस रदन कोराया. ॥४६॥
श्रीगुरुचें व्हावें जें लोड, उशी, दार, सुत, पलंग, डबा.
‘ सांनिध्यार्थ चरण घे मोडूनि ’ म्हणेल सुतप ‘ लंगड बा ! ’ ॥४७॥
श्रीगुरुसि आवडे जो, पावावें त्याचि सुरस महिम्यातें.
जें नावडे, न घ्यावें रूप क्षणमात्र सुरसमहि म्यां तें. ॥४८॥
श्रीगुरुचा भाट बरा. प्राप्त स्तुतिरूप सुरस भाटा कीं.
कवि म्हणति, ‘ हें न घडतां, जी जी म्हणतीहि सुरसभा टाकीं. ’ ॥४९॥
श्रीगुरुला स्तवितां सुख, तें काना न निज आलिया, स्तवन
स्वनुतिस गुरुभक्तश्रुति सन्मतिच्या म्हणति आलि यास्तव ‘ न ’ ॥५०॥