नमनेंचि जना सत्पथदर्शक ज्याला भला निळोबा हो;
मज तों प्रसाद त्याचा, प्रणता ज्या लाभला, मिळो, बाहो. ॥२६॥
वंदाया मजला, तो ब्राह्मण बहिरा, तथा पिसा, मान्य.
जह्रि उकिरड्यांत पडला, मळला, न हिरा, तथापि, सामान्य. ॥२७॥
भव्य कथाकल्पतरु, क्षितिवरि, सर्वत्र सुलभ, जो लावी;
डोलावी देवसभा, तद्बहुमतता असीच बोलावी. ॥२८॥
प्रह्लादें, बळकाउनि नवघननिभकाय गड, बडवयानें
कळि न गणिला. करावी तेथें मग काय गडबड वयानें ? ॥२९॥
‘ परिसा भागवत ’ म्हणे. तेंचि वदति नाम परिसते ज्याचें,
तम पुनरपि न उरों दे, बळ मिरवी, भानुपरिस, तेज्याचें. ॥३०॥
हरिविजयग्रंथातें मग, आधीं श्रीधरसि वंदीन.
शिववंदनकामाहीं लंघावा प्रथम देवनंदी न. ॥३१॥
श्रीमुक्तेश्वर कविवर यातें कोण न शुभेच्छु वंदील ?
बंदी लक्ष जयाचे, ज्याचें यश भव्य जेंवि मंदील. ॥३२॥
श्रीलीलाविश्वंभरपदनति हेतु ध्रुवाचि यागाला.
स्पर्शे शिष्या यत्कर, जेंवि हरिदर ध्रुवाचिया गाला. ॥३३॥
ज्यातें जनीं जनार्दन ऐसें बहु साधु जाणते म्हणती;
त्याकारणें असोत, श्रीकृष्णाकारणें जशा, प्रणती. ॥३४॥
कृष्णदयार्णव कृष्णचि, करिन तया कां न दास मीं नमनें ?
संतासि मुमुक्षुमनें न विसंबावें, नदास मीनमनें. ॥३५॥
त्या नमन, वर्णुनि रघुप - पदयुगळीला, स्वभक्तवशगेला,
जो रामदास, तनुसह, वैकुंठातें, करूनि यश, गेला. ॥३६॥
उद्धव - चिद्धन केवळ, मीं मोर, तयासमोर हर्षानें
तांडव करितों, होउनि गतताप, तदीयसूक्तिवर्षानें. ॥३७॥
श्रीदामोदर देवीं धरिसि मना ! मनुजभाव कां ? टाकीं.
जो, भूतसुहृत्, काढी व्याघ्र्याचा, कळवलोनि, कांटा कीं. ॥३८॥
करुणासागर, नागर नरसिंह, क्रोधलोभकामहता
मज, रक्षील न शरणागर जाणुनि, कीर्तिशोभ कां महता ? ॥३९॥
नमिला यमिलाभावह पददर्शन योगिराज रुद्राजी.
जेथें तीच ऋषभजडभरतादिसुयोगियांत मुद्रा, जी. ॥४०॥
झालों, त्या ऋषिभट्टस्वामीतें, धन्य धन्य मीं, नमुनीं.
जो पाहतां गमे, ते ऐसेचि, ब्रह्मसिंधुमेनमुनी. ॥४१॥
आठवला, आठवितां, तोहि जगन्नाथ, मज, बरा, बावा.
नांदे सत्प्रनतिश्री, तेथें गुण कोण मग न राबावा ? ॥४२॥
मध्वमुनीश्वर चित्तीं आणुनि, जाणुनि हरीच तो, भावें
नमिला; नारदयशसेसं, ज्याचें यश सज्जनांत शोभावें. ॥४३॥
कीर्तनसुखार्थ, झाला अवतारचि अमृतराय जीवाचा;
भलत्या मुखांतुनि असी, सुरसखनि, निघेल काय जी वाचा ? ॥४४॥
म्हणती निरंजन श्रुति ज्या, त्याचि समान, हा निरंजन हो.
कीं जो म्हणे, ‘ परांचें, होउनि निजमानहानि, रंजन हो. ’ ॥४५॥
भक्तिसुखाधिक मानुनि, मुक्तिसुख कदापि याचिना; म्यां, तें
अत्यद्भुत आयकिलें सद्वृंदीं, नमुनि याचि नाम्यतें. ॥४६॥
कर जोडितों, सुटाया तनुरूपा, तापहेतु, कारा, मीं.
कीं सतनु मुक्त झाला, योगाची सिद्धि हे तुकारामीं. ॥४७॥
जें, सांवता, करुनि दे, उदर, श्रीमंदिरा भवन, माळी,
त्यातें, प्रेमें वसउनि, मानी श्रीमंदिराभ वनमाळी. ॥४८॥
गोरा ज्या म्हणती, त्या स्मरूनि, सुखी तूं, मना ! कुलाला, हो.
घे भक्तिचा, जयाची मति संसारीं अनाकुला, लाहो. ॥४९॥
हरिहरिजनपदभजनें, प्रकटी अद्भुत रुचिप्रभाव जनी.
स्पष्ट महासत्याधिका भरलीच इची शुचिप्रभा वजनीं. ॥५०॥