मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ११० ते १२०

श्री दत्तात्रेयाचीं पदें - पदे ११० ते १२०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पद ११० वें. ( रागयमन कल्याण, तालत्रिवट. )
पाहूं या गुरुदत्त अवधूत वेषधारी । अनुसूया अत्रि ऋषि नारीचा, पुत्र मनोहारी, त्रैमूर्ति अवतारी ॥पा०॥धृ०॥
रमतां विषया सुखीं, तळमळ दु:ख शेखीं, नाहीं घडी विश्रांति संसारीं । पुरे पुरे किति येराजारी, भोगिल्या अविचारीं, गुंतुनि गृहदारीं ॥पा०॥१॥
गुरुवर तारक निजसुखकारक भेटतां संतोष होय भारीं । प्रगतला नित्य निर्विकारी, भक्तांचा सहाकारी, संकटें विघ्नें वारी ॥ पाहूं०॥२॥
धनय धन्य नरनारी, दर्शना येती सामोरीं, दत्त दत्त नाम हें उच्चारी । विष्णु कृष्ण जगन्नाथा तारीं, उघड चराचरीं, आवडला जिव्हारीं ॥पाहूं०॥३॥

पद १११ वें. ( रागजिल्हा, तालत्रिवट. )
ह्लदयीं साचा तुज गांठिला दत्ता । आतां कोठें जासी भावबळ मोठें निजभक्तांचें ॥ह०॥धृ०॥
दृश्य चराचर मिथ्या जें जें दिसतें, त्या तुझी एक सत्ता । ऐसा दाटला त्रिजगीं, येती लाटा आनंदाच्या ॥ह०॥१॥
तूंचि प्रकाशक एक निजात्मज्ञानें, खुण बाणलि चित्ता । होती कोटी ब्रह्मांडें ज्या पोटीं, जिवन जीवाचे ॥ह्ल०॥२॥
सत्संगतिनें अद्वय मागें, शोधितां मज लागला पत्ता । गुरु विष्णु कृष्ण जगन्नाथ, सौख्य भजनांचें ॥ह्ल०॥३॥

पद ११२ वें ( जलभरन जात जमुनाकेह्या चालीवर. )
श्रीगुरु यतिवर, जोडुनि प्रार्थितों कर, न पडूं निज विसर, दत्त दिगंबर ॥धृ०॥
होउनियां अविचार, चरणिं चुकलों फा, शरण तुज निर्धार, वारीं देह अहंकार ॥श्री०॥१॥
त्रिविध ताप हर, करिं देवा मजवर, करुणा जलधर, वृष्टि निरंतर ॥श्री०॥२॥
श्रीदत्त विष्णु गुरु, ह्लदय कमलिं धरूं, कृष्ण जगन्नाथ स्मरूं, त्रिभुवनीं सुंदर ॥श्री०॥३॥

पद ११३ वें. ( रागबेहाग तालत्रिवट. )
महिमा मोठा अनुसूया अत्रि मुनिचा । पुत्र ऐसा गुरुदेव दत्त यतिवर ज्याचा ॥धृ०॥
दत्त दत्त ऐशीं नांवें । गातां प्रेमरस भावें । संकट समयीं धावें । भक्ताभिमानी साचा ॥म०॥१॥
सदय ह्लदय भारीं । ऐसी कोणी ना संसारीं । पापी जनांसही तारी । घेतां लाभ दर्शनाचा ॥म०॥२॥
विष्णु गुरु दत्त राणा । प्रिय प्राणांहूनि जाणा ॥ कृष्ण जगन्नाथ आण । वाहे मी दास दत्ताचा ॥म०॥३॥

पद ११४ वें ( रागभैरवी, पंजाबीठोका. )
सेवुं दत्तगुरु दत्त दत्तगुरु दत्त नामरस रे । विषय मदें उन्मत्त चित्त हें सच्चित्सुख विसरे । पुत्र वित गृह कलत्र चिंतुनि, मोहजाळिं पसरे ॥से०॥१॥
ज्या रसपानें संसारांतुनि, पाय सहज निसरे । काय लाभ तरी याहुनि मनुजा, पुनर्जन्म घसरे ॥से०॥२॥
अजरामर होसी रस प्याया, एकांतीं बसरे । विष्णु चरणीं कृष्ण, जगन्नाथाचें मानस रे ॥से०॥३॥

पद ११५ वें ( रागवागेसरी, तालत्रिवट )
शरण आलों तुजला गुरुवरा ॥धृ०॥
शरण आलोम मज्जनन मरण हर चरण कमल दाविं दत्त दिगंबर ॥श०॥१॥
पावन करि देह भाव हरुनि मज, ठाव देउनि पदिं रक्षिं निरंतर ॥श०॥२॥
गलिताहंकृति होइल कधिं मति, प्रपंच हा अति होय भयंकर ॥श०॥३॥
स्मरण अविद्या हरणार्थ करीं, विष्णु कृष्ण जगन्नाथ निजपदीं किंकर ॥श०॥४॥

पद ११६ वें ( रागजिल्हा, तालत्रिवट. )
श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरु देवदत्त यतिराया ॥धृ०॥
तुजविण मजला क्षणभर न रुचे, प्रपंच धन सुत जाया ॥
स्वयंप्रकाशक दर्शन दे मज, हरुनिअविद्या माया ॥श्री०॥१॥
दत्त दिगंबर तन मन धन, हें अर्पण तुझिया पाया ॥ स्वस्वरुपीं स्थिरवृत्ति रहाया दाखविं निजपद ठाया ॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ बहु, आवडी भजन कराया । अखंद ब्रह्मानंद स्फूर्ति, वाढवि चित्त रमाया ॥श्री०॥३॥

पद ११७ वें( रागजिल्हा, तालत्रिवट. )
मधुर नाम तुझें श्री गुरु दत्तराया । जें कां विपद विराम होय ह्लदयीं आराम ॥ नाम तुझें ॥धृ०॥
औदुंबर तळवटीं चिंतितां, ध्यानीं ये निज मूर्ति । मावळवी देह स्फूर्तिं । पाववी आत्म ठाया । कधीं विषयीं नुपजे काम दावी सुखधाम ॥ नाम तुझें०॥१॥
शुकसनकादिक संत साधुजन सेवुनियां विश्रांति । सुख अनुभविती एकांति । परि प्रेम नाम गाया । योगी जरी झाले आत्माराम आवडे निष्काम ॥ नाम तुझे०॥२॥
चित्त एकाग्र घडेना बहुविध ग्रंथ विवरिले प्रांतीं । मग सांडुनि लैकिल भ्रांति । लागलो या उपाया । विष्णु कृष्ण जगन्नाथ गातां पावला विश्राम ॥ नाम तुझे०॥३॥

पद ११८ वें ( अभाग्याच्या घरीं बाबा कामधेनु आली, या चालीवर. )
घेऊं या चला जाऊं श्री दत्त दिगंबर भेटी । बहुविध येति संत साधु सद्भक्त भाव बळ नेटीं ॥धृ०॥
मुख्य दर्शनें बहु जन्मार्जित दु:खें हरति कोटी ॥ सख्यत्वें गुरुराज मिळुनि प्रख्याती होइल मोठी ।घेऊं०॥१॥
अभय वरप्रद हरिल आमुची देह वासना खोटी । स्वयं प्रकाशक निजात्म ज्ञानें आलिंगिल निज पोटीं ॥घेऊं०॥२॥
अलभ्यलाभ असा हा ह्मणवुनि गांठा हितकर गोष्टी ॥ विष्णु कृष्ण जगन्नाथ गुरु स्वरुपानंदीं लोटीं ॥घेऊं०॥३॥

पद ११९ वें. ( रागपरज, तालदादरा. )
तो हा दत्त चिद्‍घन आला रे ॥धृ०॥
नेटें भक्तांच्या अनुसूयात्रिचा पुत्र त्रैमूर्ति झाला रे । पायीं पादुका शोभति ज्याच्या, कंठीं रुद्राक्ष माला रे ॥तो०॥१॥
काषायांवर धारी तुंबर, नारद गाती ज्याला रे ॥औदुंबरीं वास रक्षी भक्तांस, जो वश गायनाला रे ॥तो०॥२॥
तारक भवहारक सुखकारक हा जिवाला रे ॥ श्रीविष्णु गुरुच्या कृपें कृष्ण जगन्नाथ निवाला रे ॥तो०॥३॥

पद १२० वें. ( रागमहाड, तालदादरा. )
मागणें तुजला दत्ता निज लाभ दे मला ॥धृ०॥
दुर्जन जरि गांजिति मति होउं निश्चला । देह मीपण हें करि क्षीण त्या विलक्षण स्वात्म ईक्षण प्रेम हो भला ॥मा०॥१॥
संत संगति आवडे अति नेट लागला । भेटति कधीं सज्जन करवीं सुखी मज मज्जन बहू जीव जाचला ॥मा०॥२॥
विष्णु गुरु कृष्ण जगन्नाथ विषयीं वीटला । नीट राजयोगासि साधित भोगुनि सुखदु:ख अद्वय रूपें वांचला ॥मा०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP