स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३
देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.
कैलास शिखरीं जातां । बहुजनांसि भय हे वाटे ॥
पशुपती सांब शिव भोळा । अक्षय ही वसती तेथे ॥
कथियली अंबिका पुराणीं । लक्ष्मी लोळते चरणीं ॥
शरण मी तुला बहु आले ।
पाहुनिया अंबाबाई । मन माझे तल्लिन झाले ॥
ॐ नमो गणपती सारजाचरण ।
विघ्नविनाशककरो कारण ॥
आरती उजळिती, वरी घालिती माणिकवाती ।
देखिली महालक्ष्मी, मनीं फिटली भ्रांती ॥
जय देवी महालक्ष्मी, कुळिची राणिये उमे ।
त्रिभुवन मोहियेलें तुम्ही, देवीं केला शृंगार ॥१॥
औट पीठाच्या केल्या डावा ।
चौसष्टी मिळुनी वळिला दिवा ॥
घालिती सुवर्णताटीं वरी घालिती माणिकवाती ॥२॥
कोल्हापुराहुनी आली मायराणी ।
चांचर्या केसांची मोकळी वेणी ॥
एका हातीं दंड, एका हातीं पानाचा विडा ॥
एका हातीं फुलांचा झेला. एका हातीं कोंदणी मुद्रा ॥३॥
कोल्हापुराहुनी आली महायात्रा ।
मेघडंबरावरी शिरगिली छत्रे ॥
विशाल माउलियें दोहीं हातीं घेतलीं पुष्पे ॥४॥
इंदु जोदण्यांवरी तानिवडे, वरती नागबंदाची फुले ।
हंसळिया भोवरिया, वरी पदक ल्यायली लेणे ।
नासिक रत्नबिंब, गळां ल्याइली त्रिदळ पाटी ॥
ऐसी बाळा कोल्हापूरची, महालक्ष्मी गोमटी ॥५॥
इंदु जोडवी, ल्याइली तोडे. सरळ साखळ्या हातीं काकणे ॥
ल्याइली नागदोरे. गळां ल्याइली सरी ॥६॥
आरतीपुढे नैवेद्य आणा, घारिया पुरिया, घृतपूर लाडू ॥
गुळवरिया, सांजोरिया, केला गुळाचा पाक ॥
लाडू जे वळियेले । राजसबाळी साळीचा भात ॥७॥
महालक्ष्मीची आरती त्रिकाळ गाती ।
त्यांचिया पुण्या नाहीसे मिती ॥
पांगुळ्या पाय येती, अंधासी नेत्र जे येती ॥
निपुत्रिका पुत्र होती, ऐसे महालक्ष्मी माय बोलती ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2014
TOP