हे जगदंबे, विश्वकदंबे, तूं निरलंबे, तूं शिवसांबे ।
मज अविलंबें, धाव पाव निर्वाणीं ॥
निरीक्षले म्यां बहु देव, माये । ते वंदिती सर्व तुझेचि पाये ॥
सत्कीर्ति तूझी भुवनांत गाजे । विष्णुप्रिये सुंदरि लोकपूज्ये ॥
श्रीकरवीरनिवासिनि! देवि महालक्ष्मि! तूंचि सर्वाद्या ।
तव चरण म्हणति, ‘सुरतरुचिंतामणि हो! निरोप गर्वा द्या ॥१॥
भगवति, जगदुत्पत्तिस्थितिसंह्रतिहेतु तूं महालक्ष्मी ।
त्वत्पदनखमणिरुचिनें चलन सुरांच्या न राहिलें पक्ष्मी ॥२॥
आद्यसति महालक्ष्मि! त्वत्पुण्यक्षेत्रराज करवीर ।
परिभवुनि बळें दुर्विधि, कळी यांकरवी सदैव करवी र ॥३॥
जी दुर्लिपि भाळींची तव चरणरजेंचि होय सल्लिपि ती ।
या तव यशोमृतातें जगदीश्वरि, सुरभि कल्पवल्लि पिती ॥४॥
विधि-हरि-हर तुज भजती भक्तांतें फार गौरवीतीस ।
देवि महालक्ष्मि! यश क्षीरधिकर्पूरगौर वीतीस ॥५॥
‘हा हा’ अशा करि, धरुनि बहु धाक, रवी रवासि निजनमना ।
चुकतां, जपतां, सुखविसि बहुधा करवीरवासिनि! जनमना ॥६॥
अघ सारिसि, भय वारिसि, नत तारिसि, तूंचि जननि जगदाद्या ।
जे नेणति वैद्यांतें, म्हणति, ‘अगद’ तेचि जन ‘निजगदा द्या’ ॥७॥
भक्त महालक्ष्मि! तुझा सुपदीं पोषूनि धर्म-नय नांदे ।
विष्णु तसा देवांच्या देवींच्या विपुल शर्म नयनां दे ॥८॥
कोण तुज महालक्ष्मि! स्तविना! कवि नारदादि यश गाती ।
ब्रह्मसभा, विष्णुसभा, शंभुसभा, त्वत्सुभक्तियशगा ती ॥९॥