मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १

स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं पानमळा ।
पूजा घेती तीन वेळां । अंबाबाई ॥
कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं सोनार ।
नवा घडविला चंद्रहार । अंबाबाईला ॥
कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं तांबट ।
नित्य पूजेला नवं ताट । अंबाबाईला ॥
कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं पटवेगार ।
बाजूबंदाला गोंडे लाल । अंबाबाईला ॥
कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं हंडे हंडे ।
तुझ्या गस्तीला राजा हिंडे । अंबाबाई ॥

कोल्हापूर शहर । दोन्ही बाजूंनी तांबट ।
अंबाबाईच्या नैवेद्याला । रोज लागे नवं ताट ॥
कोल्हापूर शहर । दोन्ही बाजूंनी सोनार ।
अंबबाईला घडविती । रोज नवा चंद्रहार ॥
कोल्हापूर शहर । चहू बाजूंला ग हांडे ।
अंबाबाईच्या गस्तीला । राजा जातीनं ग हिंडे ॥

कोल्हापूर शहर । पाण्याच्या डबक्यात ।
फुलांच्या झुबक्यात । अंबाबाई ॥

कोल्हापूर शहर । पेठोपेठीं सोनार ।
नवा घडविते चंद्रहार । अंबाबाई ॥
कोल्हापूर शहर । पेठोपेठीं पटवेदार ।
बाजूबंदाला गोंडे चार । अंबाबाईच्या ॥
कोल्हापूर शहर । भोवती तांबट तांबट ।
निरी पडली तीनशे साठ । पैठणीची अंबाबाईच्या ॥

नवरात्राच्या पूजेचा । काय सांगू मी थाट ।
रोज नवीन रूप घेऊनी । येई अंबा देवळात ॥
नवरात्राच्या पूजेची । उडते घाई घाई ।
माझी ग अंबाबाई । नवस पुरवुनी जाई ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP