श्री वेंकटेश्वर - पदे १३१ ते १४०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


१३१
धनुर्मासाचे सित पक्षात । द्बादशी तिथी पर्व विख्यात ।
ब्रह्मादि सुरवर इच्छित । तया तीर्थाचे स्नान पै ॥५.९६॥
जितुकी तीर्थे पृथ्वीवर । ती येथेचि वसती निरंतर ।
ऐसे स्थळ पाहूनि श्रीधर । राहों इच्छी तये स्थानीं ॥९७॥
तीर्थासमीप सुरेख । तिंतिणी वृक्ष असे एक ।
तयाखाली वल्मीक । होते जाण निर्धारीं ॥९८॥
त्या वल्मीकाचे अंतरीं । प्रवेशता झाला मुरारी ।
गुप्तरूपें ते अवसरीं । तया स्थळीं राहिला ॥१९॥

१३२
आंदणालागी राजेंद्र । मुकुट एक देईन परिकर ।
आठां दिवशीं भृगुवारीं । मुकुट मस्तकीं घालीन मी ॥१९५॥
त्या वेळीं दर्शनासी । तू येत जाई निश्चयेंसी ।
तेव्हा क्षणमात्र सुख तुजसी । होईल जाण राजेंद्रा ॥१९६॥
ऐसा उच्छाप वदोन । गुप्त जाहला जनार्दन ।
राव पिशाच होवोन । वनामाजीं राहिला ॥१९७॥

१३३
मी एकलचि वसतो येथे । कोणीच नाही मज सांगातें ।
रहावयासी स्थळ यथार्थ । तेही न मिळे जाण पां ॥२१६॥
तरी या पर्वतावरी देखा । मज ठाव देई भूमिपाळका’ ।
वराह म्हणे, ‘जगन्नायका । अवश्य राही येथेचि’ ॥२१७॥
मग नगमस्तकीं यथार्थ । शतपाद भूमी हरीसी अर्पित ।
तया स्थळीं क्षीराब्धिजामात । राहता जाहला ते काळीं ॥२१८॥

१३४
द्वादशाध्यायपर्यंत । जाहला वेंकटेशविजय ग्रंथ ।
जय पुरुषोत्तमा वैकुंठनाथ । तुज प्रीत्यर्थ हो का सदा ॥१२.९७॥
वेंकटेशविजय राजेश्वर । हे द्वादश त्याचे प्रंचड वीर ।
महत्पापांचे संहार । श्रवणमात्रें करिती ते ॥१८॥

१३५
जय देव जय देव जय वेंकटराया ।
संकटविलया सदया अहिपतिगिरिनिलया ॥ध्रु.॥
भूसुरवरपदताडन मिमित्त हे करुनी ।
भूमीवरी पातली भुवनत्रयजननी ।
भुजगारिवाहना तू तद्‍विरहेंकरुनी ।
भूतलीं या आलासे वैकुंठाहूनी ॥१॥

१३६
वर्ष दशसहस्त्र वल्मीकीं क्रमिले ।
वज्रपाय मौळीवरि प्रहार तू धरिले ॥
वत्सासह गोरूपी देवां रक्षियले ।
वराहमत्ते वसुधाधर गिरिवरि वसले ॥२॥
अष्टविंशति कलिच्या आधी प्रकटोनी ।
अवतार नटलासी अनुपम्य अवनीं ॥
अश्र्वारूढ क्रमिता अरण्यस्थानीं ।
आकाशनृपतनुजा अवलोकिलि नयनीं ॥३॥

१३७
ऐकुनि हरिगुण पावे नृप परमानंदा ।
अत्यादरें अर्पियली कन्या गोविंदा ॥
अद्यापि अक्षय तू आनंदकंदा ।
आत्मारामा कुडची श्रीवीरवरदा ॥५॥

१३८
सहजबोधाचा आत्मकुमर । शिवकल्याण योगेश्वर ।
वयसां सात संवत्सर । दर्शन जाले अंबेचे ॥११.२२५॥
गोपाळादि त्याचे वंशीं । ज्ञान-विज्ञान-तेजी राशी ।
तेथेचि उद्‍भव शिवरामासी । अत्रितनयासी जो साम्य ॥२॥

१३९
व्यासवाणी आदिशक्ती । आदिमाया जे भगवती ।
मातृकापटीं अमृतमती । तदाधारें चालतसे ॥
व्यासवाणीचा मथितार्थ । भाषा मात्र हे प्राकृत ।
जाणोनि खर्परीं नवनीत । टाकी पंडित, हे न घडे ॥

१४०
बंकार म्हणजे अमृतबीज । कट ऐश्वर्य संज्ञा सहज ।
प्रथम मीळणी, म्हणोनि गुज । व्यंकटाद्रि हे घडले ॥१.५६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP