श्री वेंकटेश्वर - पदे ६१ ते ७०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


६१
सुंदरा व्यंकटेशा, तुम्ही त्रैलोकीं राजे ।
रंक मी शरण तुम्हां, हरा क्लेश जी माझे ॥ध्रु.॥
शेषाद्रीं सिंहासनीं तुम्ही बैसले देवा ।
इंद्रादि सकळही देव करिताती हो सेवा ॥
उजळोनि आरतिया लागताती हो पायां ।
जयजयकार करिती श्रीवैकुंठराया ॥१॥

६२
अणिमादी सकळ सिद्धी वारिताती चामरे ।
इंद्र हा घेउनि छत्र उभा राहे माघारे ॥
उर्वसी नृत्य करी स्वयें राये साचारे ।
गर्जती वेद चारी श्रुतिच्यानि गजरें ॥२॥

६३
तांडव नृत्य करी गणाधीश आपण ।
शारदा घेऊनि टाळ करी अनुवादन ॥
नारद घेऊनि वीणा वदे सामगायन ।
किन्नर वाजदंडी ( ? ) सप्तस्वर साधन ॥३॥

६४
रुद्र हा भद्र जेथे, यम न्यायें विचारी ।
विरिंची सहवास छत्र घेउनि करीं ॥
चंद्रमा सूर्य दोन्ही द्वारपाळ हो द्वारीं ।
विडिया करुनी देती रमा आपल्या करीं ॥४॥

६५
ऐसा हो राजसोहळा नित्य होतो वैकुंठीं ।
आनंद थोर न मायेचि पोटीं ॥
धन्य हा जन्म माझा, देव देखिला दृष्टीं ।
गोविंदतनयें गिरीं, धन्य धन्य हे सृष्टी ॥५॥

६६
जय देव जय देव जय व्यंकटेशा ।
संकट सर्वहि वारुनि तोडी भवपाशा ॥ध्रु.॥
रत्नखचित मुकुट मस्तकावरि साजे ।
कानीं कुंडल, तेजें पाहुनि रवि लाजे ॥१॥
तनु सावळी, कटिं वेष्टित पीतांबर पिवळा ।
त्रिपुटी नामावरती कस्तुरीचा टिळा ॥२॥
रत्नादिक बहु माला कंठीं वैजयंती ।
‘गोविंदा, गरुडध्वजा’ म्हणुनी दीन बाहती ॥३॥
पुष्करिणीतीरवासा शेषाद्रिनाथा ।
अभयकराने निववी दीन माणिक आता ॥४॥

६७
वेंकटेशनाम मंत्र जपुनिया मुखीं ।
जा भवाब्धि उडुन, राहि होउनी सुखी ॥ध्रु.॥
वेंकटे शवदनकमळ पाहुनी तया ।
चरणकमलिं शिर-सुकमळ अर्पुनी भया ॥
करुनि सांड, तत्क्षणीचं रे भवाचि ह्या ॥
राहि धरुनि हदयकमलिं रूप आणखी ॥१॥

६८
हिरण्याक्ष बघुनि, तारुनी महीस हा ।
आवरोनि उग्र कोलरूप ते महा ॥
भक्तकामकल्पवृक्ष होउनी पहा ।
धरि स्वरूप सौम्य, जाइं त्यासि पारखी ॥२॥
चतुर्भुज श्यामसुंदर आकृती बरी ।
धरुनि राहिलासे वेंकटाचलावरी ॥
शोभिवंत दिसति मूर्ति ध्यानिं अंतरीम ।
वेंकटेशबालका सदैव नीरखी ॥३॥

६९
उठा उठा हो भक्त साधक । स्मरा श्रीवेंकटनायक ।
भक्तजनप्रतिपालक । नटनायक श्रीवेंकटेश ॥ध्रु.॥
वैकुंठविहारी श्रीभगवान । आदिनारायण शेषशयन ।
क्षीरोदवासी गरुडवाहन । दुष्टदमन श्रीहरी ॥१॥
होउनिया वराहवदन । दैत्य हिरण्याक्ष विदारून ।
भूमिदेवीतें उद्धरून । दाढें उचलून आणिली ॥२॥
अतिभयंकर कोलवदन । भय पावती सर्वही जन ।
पाहून भवभयशमन । कृपाघन सुस्वरूप होतसे ॥३॥
गरुडातें आज्ञापून । क्रीडाचल वैकुंठाहून ।
आणून, शेषाचळीं स्थापून । अभयदाना उभा असे ॥४॥

७०
चतुर्भुज मूर्ति साजिरी । धनश्यामवर्ण मनोहरी ।
नानालंकार अंगावरी । कृपा करी भक्तजनां ॥५॥
आकर्ण कमलदलनयन । कृपादृष्टी सुहास्यवदन ।
भक्तजनमानसमोहन । देऊं दर्शन उभा असे ॥६॥
भवकारक भवहारक । लक्ष्मी-भूमि-नायक ।
वेंकटेश कुलपालक । सुखकारक वेंकटेश ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP