श्री वेंकटेश्वर - पदे ४१ ते ५०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


४१
कोणी जन वेंकोबा, कोणी तिमया, असेहि जे म्हणती ।
गंगाप्रमुखें तीर्थे करिती तयांकरणे बहु प्रणती ॥२६॥
कोणी कान्हकन्हय्या, कोणी रणछोडराय या नावें ।
आळवुनि, भक्त तरती, श्रीविष्णो! तुज कसेहि वानावे ॥२७॥
वससी प्रकट प्रभु तू श्रीभूयुक्त स्वयें जया स्थानीं ।
ज्ञानी ‘वैकुंठचि ते’ म्हणती, धरिती सदैवहि ध्यानीं ॥२८॥

४२
श्रीवेंकटेशचरणीं रामसुतें या समर्पिल्या आर्या ।
कार्या प्रभुभक्तांच्या साधितिल, जशा धरेंदिरा आर्या ॥७॥

४३
शेषाचलकृतनिवास हा नतभवास गोष्पद करी ।
न संकट व्यंकटरमणावरी ॥ध्रु.॥
तीन कोस हा पर्वत उंची, लंबि तीस योजने ।
तयावरि नांदे भगवज्जने ॥
शारदीय नवरात्र, रथोत्सव, नानाविध अर्चना ।
लोभवी विविध जनांच्या मनां ॥

४४
हा व्यंकटपति त्या गिरिवरि अति शोभला ।
या पादपंकजीं अनंत जन लोभला ।
श्रीरामानुज या देवबळें लाधला ।
याहुन जागृत दुसरे दैवत नाही पृथ्वीवरी ।
एक हा निजजनदुरिता हरी ॥१॥

४५
चिंच तिखट नैवेद्य तेलकट, परि सुर झड घालती ।
सुधेचे रस त्यापुढे लाजती ॥

४६
लखलखाट मंडप सुवर्णदीपाळी ।
कर्पूर उजळतो असा न जगतीतळीं ।
तो ध्वजारोहणानंद न कनकाचळीं ।
पुष्करिणीचे स्नान करुनिया सेवा-मंडप दुरी ।
पहावा शिरोनि भुवनांतरीं ॥२॥

४७
सुभक्तवत्सल देऊळगावीं राजाच्या राहुनी ।
घेतसे पूजा बहु मानुनी ॥
काही काणगी नको कराया, कानगिला घेउनी ।
पावतो देतो प्रभु लेहुनी ॥
पृथ्वीपतिचा वल्लभ ऐसा पुत्र देतसे गुणी ।
इथे हा नवसाला पावुनी ॥

४८
व्यंकटेशजी नाम चांगले । आवडे मला, चित्त रंगले ।
ध्यान मानसीं, लागली प्रिती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥१॥
देखिली तुझी दूरुनी पुरी । हर्ष वाटला बहुत अंतरीं ।
ध्यान मानसीं, लागली प्रिती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥२॥
व्यंकटेशजी स्वामि राजसा । पावसी मला हाचि भर्वसा ।
म्हणुनिया तुझी मांडली स्तुती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥३॥
व्यंकटेशजी, तूजवेगळें । दीन दीसतो, दावि पाउले ।
करुणांतरी भाकिजे किती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥४॥
व्यंकटेशजी कूलदेवता । तूंचि श्रीगुरू माउली, पिता ।
इष्ट मित्र बंध्वन्न संपती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥५॥

४९
त्रिभुवनासि या तूचि रक्षिता । शेष शीणला गूण वर्णितां ।
वेदही तुझी नेणती स्तुती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥६॥
कमलजापती, कमललोचना ॥ कमल श्रीगुरू भक्तरक्षणा ।
कमल श्रीगुरू ब्रीद गाजती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥७॥
साधना तरी काय मी करू ? भक्ति कोणती सांग हो धरू ? ॥
तीर्थयात्रा मी फिरलो किती । पाच गा त्वरें लक्षुमीपती ॥८॥
हदय फूटले, कंठ दाटला । नीर लोचनीं, पूर सूटला ।
धीर मी धरू मानसीं किती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥९॥
उशिर हा तरी फार लागला । मार्ग लक्षितां दीन शीणला ।
अझुनिही किती अंत पाहसी । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥१०॥

५०
पृथ्वीवरी सकळ क्षेत्रामाजी पवित्र ।
कलियुगीं वेंकटाचल नामक क्षेत्र ॥ध्रु.॥
सुवर्णमुखरी-उतरतीरीं आहे डोंगर ।
तो वैकुंठासमान, ज्यावरि तीर्थे अपार ॥
चतुर्युगीं ज्या मणती वृषगिरि अंजनाद्रिवर ।
शेषाचल आणि वेंकटाद्रि मणती सुरवर ॥
कृतयुगीं वृषासुर । मातला त्या गिरिवर ।
निवटिला शीघ्र मावरें ।
यास्तव वृषगिरि मणतीं कृतयुगीं ऐका विस्तार ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP