१०१
पदीं त्वदिय ठेवण्या शिर कुणा नसावा कर ।
पिता जननि तू जगा, धरू नको कुणाला दुर ॥
धना उणिव ना तुला, त्वदिय दास्य लक्ष्मी करी ।
नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥७॥
अहेस स्थित तू जसा पुनित चंद्रभागातिरा ।
तसाच गिरिच्या वरी बस सदैव शारंगधरा ॥
त्रिताप गणुचे कृपा करुनि तू करावे दुरी ।
नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥८॥
१०२
नाना ब्रह्मांडे हाच गिरी । चैतन्य जें तें तू श्रीहरी ।
तेथ तुझे हस्त चारी । धर्म अर्थ काम मोक्ष ॥९॥
चारी वेद तुझे वदन । उपनिषदे हाच प्राण ।
पूर्वोत्तर मीमांसा जाण । पाठ पोट देवा, तुझे ॥१०॥
मत जे का अद्बैत । तोच तुझा मुगुट शोभत ।
द्बैत सिद्धान्त झळकत । वत्सलांछन हदयावरी ॥११॥
विशिष्टाद्बैत पीतांबर । वल्लभी मत शेला सुंदर ।
जगद्रूप देहावर । धारण केलास व्यंकटेशा ॥१२॥
म्हणजे सर्व मतांसी । तू संमत निश्चयेंसी ।
अंतर्बाह्म विश्वासी । तूच व्यापिले गोविंदा ॥१३॥
परी त्या तव स्वरूपाला । समर्थ कोणी न जाणण्याला ।
म्हणून वाटे, हा धरिला । वेष तुम्ही सगुण येथ ॥१४॥
१०३
तूच होऊन दिगंबर । शैवार्थ झालासी शंकर ।
भोवती भूतांचा बाजार । रंजनास्तव निर्मिला ॥३८॥
तेथे कस्तुरीचिन्ह पुशिले । भस्माप्रती स्वीकारिले ।
पीतांबरासी त्यागिले । कौपीन लेऊन वल्कलासी ॥३९॥
किरीट शिरींचा काढिला । तेथे जटाभार वाहिला ।
धारण केले हलाहल । कौस्तुभाऐवजी ते ठायां ॥४०॥
गदेऐवजी धरिला शूल । एक्या करीं नरकपाल ।
शंखाठायीं मात्र विमल । प्रेम धरिले दोहों ठायीं ॥४१॥
का की तुझा मेहुणा । म्हणून त्यातें नारायणा ।
न विसरलासी मनमोहना । वाटे लक्ष्मीभयाने ॥४२॥
१०४
कोठे समूळ जटेचा त्याग केला । अल्ला इलाही तुम्हीच बनला ।
वेदांऐवजी निर्मिला । नमाज तेथे तुम्हीच ॥४७॥
कोठे बनून अहिंसक । झालात जैन मताचे पोषक ।
कोठे नीती व्यावहारिक । बौद्ध होऊन सांगितली ॥४८॥
कोठे झगा घातिला । शांतपणाचा कळस केला ।
कोठे होऊन राहिला । पारशांसाठी अग्नि तुम्ही ॥४९॥
जरी गोदेचे पाट फुटले । परी न तिशीं पारखे झाले ।
दृष्टीकारणें अनेक दिसले । परी जल एकचि ॥५०॥
ऐसा तू सर्व मतां । संमत अससी लक्ष्मीकांता ।
का की तुझ्यावीण परतां । देव मुळी उरला नसे ॥५१॥
१०५
येऊ न देता कुणा जवळी । तुम्ही आपुल्या, वनमाळी ।
जागा ही बरी पाहिली । शैलशिरास एकीकडे ॥७०॥
पदां न कुणा शिवू देता । तुम्ही आपुल्या भगवंता ।
दर्शनासाठी कुणी येता । पैसे मागता त्याते बहू ॥७१॥
का की देवा, पंढरीत। पैशावरी न ठेविला हेत ।
मोकळीक पद स्पर्शण्याप्रत । ठेविली तुम्ही ते ठायां ॥७२॥
१०६
येथे तुम्ही हो केशवा । वाटेल तितुके कर बसवा ।
पदही आपुले झाकून ठेवा । परी न आम्ही भिऊ तया ॥७८॥
आम्ही वाट पहात राहू । दार उघडेल तेव्हाच येऊ ।
तुला नेत्रांवाटे लुटून घेऊ । कोंडून ठेवू हदयात ॥८४॥
येथे तू दारे लविशी । तैसाच रहा हदयाशी ।
का की, सवय हषीकेशी । कोंडून घेण्याची लागली तुज ॥८५॥
तुला स्नान घालावया । बंदी आम्हांस ये ठायां ।
परी प्रेमाश्रूंनी प्रक्षालाया । अधिकार आहे केव्हाही ॥८८॥
१०७
मी वंदुनी प्रथम विघ्नविनायकातें ।
श्रीशारदा-गुरु-मुनीश्वर सज्जनांतें ॥
होऊनि लीन तुज आळवितो सुरेशा ।
दावी भवच्चरणपंकज व्यंकटेशा ॥१॥
सर्वज्ञ, सत्त्वगुणमंडित, सौख्यखाणी ।
तू निर्गुण, त्रिभुवनस्थित, मोक्षदानी ।
सच्चित्सुखस्वरूप तू अमितप्रकाशा ।
दावी भवच्चरणपंकज व्यंकटेशा ॥२॥
१०८
तू दीनवत्सल, दयाघन, सौख्यदाता ।
त्राता, जगत्प्रलयकृञ्जगदेकभर्ता ॥
नानावतार धरिलेसि जगन्निवासा ।
दावी भवच्चरणपंकज व्यंकटेशा ॥३॥
मी हीन, दीन, अनभिज्ञ, अपंग, आर्त ।
तू धाव घेसि शरणागतरक्षणार्थ ॥
आलो तुला शरण यास्तव यादवेशा ।
दावी भवच्चरणपंकज व्यंकटेशा ॥४॥
१०९
हिंडोनि योनि बहु मानवदेहिं आलो ।
मोहूनिया विषयपंकिं अहा बुडालो ।
दीनासि तारि तुजवाचुनि कोण ऐशा ।
दावी भवच्चरणपंकज व्यंकटेशा ॥५॥
त्रैताप, षड् रिपुहि गांजिति, दीननाथा ।
ते साहवे न मजसी, करु काय आता ? ॥
नेई तरोनि भवसागर, भार्गवेशा ।
दावी भवच्चरणपंकज व्यंकटेशा ॥६॥
११०
आणी न दोष मनिं माउली लेकरांचे ।
तूही तसे न गणि या तव किंकराचे ॥
ठेवी शिरीं निजकृपाकर इंदिरेशा ।
दावी भवच्चरणपंकज व्यंकटेशा ॥७॥
दावी मला सगुण रूप तुझे दयाळा ।
जे देखता सुखद शांति मिळे मनाला ।
ही एकमेव विनती पुरवी परेशा ।
दावी भवच्चरणपंकज व्यंकटेशा ॥८॥
या अष्टकेंकरूनि आळविता सु-गीतें ।
लाहोनि सौख्य इह, पावति मुक्तिही ते ॥
याकारणें सुजन हो! नित सुप्रभातीं ।
भावें करा पठण, ही गुरुदास-उक्ती ॥९॥