खंड ३ - अध्याय ५१
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । मुद्गल सांगती दक्षाप्रत । महोदराचें क्षेत्र स्थित । तें दक्षिण दिशेंत । तेथ स्थापिती गणेशमूर्ति ॥१॥
दहा योजनें विस्तार । ऐसें मानदा तें क्षेत्र । चतुरस्त्रांत महोदर । स्थापिती देवमुनी तेथ ॥२॥
पूर्वे जो आपापल्या खंडांत । द्वीपांत सर्वत्र स्थापिला असत । दक्षिण दिशेत विराजत । त्या वेळीं तो ब्रह्ममय ॥३॥
त्या क्षेत्रीं देवऋषि वसत । योगी तीर्थक्षेत्रें अगणित । आपुल्या तीर्थांत स्नान करित । समुद्रस्नान फळ त्यांसी ॥४॥
आणि तें ऐसे तीर्थस्नान करुन । गणेशाचें करिती भजन । परस्परांचे हित रक्षून । महोदरचरित्र सदा स्मरती ॥५॥
त्याचीं विविध कार्ये स्मरती । रोमांचित शरीरें होती । सिद्धिबुद्धिसहित भजती । मूषकवाहन ज्यासमोर ॥६॥
दूर्वादींच्या उपचारें पूजन । भाद्रपद चतुर्थीउत्सव महान । प्रतिवर्षी करिती प्रसन्न । अनेक भक्त यात्रा करिती ॥७॥
तेथ महोदराच्या दर्शनें लाभतीं । मानव ईप्सित जें चित्तीं । स्मरणमात्रेंही मुक्त होती । सर्वार्थांनी ते सदा ॥८॥
क्षेत्रांत येतां मरण । ब्रह्मभूतत्व पावे जाण । नर तें मुक्त होऊन । गणेश सायुज्य लाभतो ॥९॥
अष्ट विनायक प्रख्यात । त्यांचीं क्षेत्रें पुनीत । ब्रह्मभूतमय असत । शिवादी देव तेथें ॥१०॥
भक्तिकार्यार्थ तेथ निवसती । शेषादी जे श्रेष्ठ जगती । ते सर्व क्षेत्रांत राहती । या अष्टविनायकांच्या ॥११॥
तेथ गणेशतीर्थं अद्भुत । महोदराचें प्रिय असत । त्यांत स्नानमात्रें होत । मानव सर्वसिद्धियुक्त ॥१२॥
विष्णुआदिक अन्यतीर्थांत । गाणेशक्षेत्री जीं असत । त्यांत स्नान करता लाभत । इच्छितार्थ प्राणि जात ॥१३॥
त्या त्या पदाचा लाभ घेत । अंतीं ब्रह्मभूत ते होत । स्वानंदीं वास करित । यांत संशय कांहीं नसे ॥१४॥
अन्य देवांचे जे भक्त । ते जरी मरण पावती या क्षेत्रांत । आपापल्या देवलोकांत । जातात ते भक्तिभावें ॥१५॥
महालयीं तीन देव । लय पावती सर्व । तरी ते निर्जलोकीं अभिनव । सुखप्रदांत जातील ॥१६॥
गणेशक्षेत्रीं मरणसंस्कार । होता उद्धार पावतील नर । ब्रह्मभूत ते उदार । पावन जाणावें जगीं ॥१७॥
म्हणोनि भक्तीनें सेवावें । गणेशक्षेत्रासी जावें । कोठे अन्यत्र भजती स्वभावें । तेही होती ब्रह्मभूत ॥१८॥
पावन ते लोकांसी होत । शिवादींचे भजन करित । तें जन्मजन्मांतर जाता होत । त्या संस्कारें ते गणेशयुक्त ॥१९॥
गणशाहून न परब्रह्म भिन्न । सर्वसंमत तें सुखनिधान । म्हणून जे गणेशभक्त ते महान । ब्रह्मभूत ऐसी ख्याती ॥२०॥
हे महोदर आख्यान । सर्वसिद्धिप्रद पावन । यथामति कथिलें दक्षा जाण । म्हणे मुद्गल महामुनि ॥२१॥
संक्षेपानें सांगितलें । तें आज पूर्ण झालें । ऐकेल वाचील भावबळें । त्यास अंतीं ब्रह्मपद ॥२२॥
हयासम नसे त्रैलोक्यांत । अनुपम अतुल हें असत । सर्वअर्थप्रद मानवाप्रत । ब्रहादिदेवांस योगिया ॥२३॥
नाना व्रतें विधि अनुसार । करण्याचें फळ पावें नर । हया चरित्राच्या वाचनें सत्वर । नाना तीर्थस्नानपुण्य ॥२४॥
तीर्थक्षेत्रीं करिती तर्पण । तैसेंचि देवतापूजन । यथाशास्त्र त्याचें फळ पावन । तें लाभतें श्रवणें याच्या ॥२५॥
अन्य क्षेत्रांत भक्तियुक्त । जो नर निवास करित । विधिपूर्वक तो जें लाभत । तें फळ या चरित्रवाचनानें ॥२६॥
नानाविध यज्ञें जें लाभत । देवांचें दर्शन घडतां होत । तें सर्वही फळ लाभत । या महोदरचरित्र श्रवणें ॥२७॥
इष्टापूर्तादिक कर्मे करित । नरोत्तम जें पुण्य करी प्राप्त । तें सर्व होत प्राप्त । या चरित्राच्या वाचनानें ॥२८॥
काय सांगावें बहुत । ब्रह्मभूयप्रद तो होत । या चरित्रांचे श्रवण करी जगांत । धर्म अर्थ काम मोक्षद ॥२९॥
पुत्रपौत्रादिक सर्व धन । धान्य विविध राज्यादि लाभून । अश्वादिक वाहनें महान । सर्व लाभतें श्रवणानें ॥३०॥
महोदराचें माहात्म्य जेथ गृहांत । भक्तिभवें लेखन होत । तेथ राक्षसादींचे भय नसत । चोरादींचे अग्नीचे ॥३१॥
ग्रहरोगादिक पीडा जात । या पुस्तकांच्या पूजनें निश्चित । दक्षा यांत संशय नसत । सत्य हें भक्त अनुभविती ॥३२॥
जें जें इच्छिती प्राणिमात्र मनांत । हें चरित्र जेव्हां ऐकत । तें तें महोदर देत सुप्रीत । प्रतापवंत भक्तांसी ॥३३॥
वाचकांस संतुष्ट करित । तरी तत्क्षणीं फल लाभत । गणेशासन्निध श्रवण करित । तरी पतित उद्धरती ॥३४॥
भावसंयुक्त जे असती । ते ब्रह्मभूत होती । यासम ब्रह्मलोकांत नसती । अन्य ग्रंथकोठेही ॥३५॥
ज्यांत महोदर साक्षात । योगपती असे वर्णित । ऐसें हें महान चरित । कथिलें तुज संक्षेपानें ॥३६॥
महोदराचें महिमान । ऐकून तृप्त कान होऊन । काय ऐकण्या इच्छी तव मन । सांग मजला दक्षा तूं ॥३७॥
सूत सांगे शौनकादिकांप्रत । ऐसें बोलून मुद्गल थांबत । मीही सांगितलें तुम्हांप्रत । असामान्य हें चरित्र ॥३८॥
सर्वमान्य विशेषयुत । वेदादींचे सार प्रख्यात । नानाशास्त्रें घुसळून काढित । पुराणें हीं येथून ॥३९॥
व्यास जें सार उत्तम । मानसीं पूर्वी मनोरम । ब्रह्मपद तें तुम्हां अनुपम । कथिलें मी यथामती ॥४०॥
गणेशाहून पर ब्रह्म नसत । गणेशाहून न अन्य तप पुनीत । गणेशावाचून कर्मज्ञान नसत । कांहीं नसे गणेशावाचून ॥४१॥
गणेशास एकास त्यागून । जो नर अन्य कर्मपरायण । त्याला सर्व ब्रह्मज्ञान । प्राप्त होऊनही निष्फळ ॥४२॥
सिद्धिपतीस सोडून । सिद्धि शाश्वत इच्छी जन । तरी तो स्वभावें फलहीन । होऊन जाय नरकांत ॥४३॥
बुद्धिपतीस त्यागून । स्थिर बुद्धी इच्छी जीवन । तो योग न लाभत महान । भस्मांत जणू त्या आहुती ॥४४॥
सर्वपूज्य हा एक असत । गणेश सर्वादी सर्वपावन जगांत । त्यास भजा विशेषयुक्त । वेदादींस जो संमत ॥४५॥
हें सर्व सार तुज कथिलें । महोदर कथानकरुपें भलें । आतां चित्त काय ऐकण्या झाले । आतुर सांग शौनका ॥४६॥
ऐसें हें महोदरचरित । सूतें कथिलें शौनकाप्रत । गणेशगुरुकृपेनें प्राकृतांत । अनुवाद करुन त्यास अर्पिलें ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते श्रवणफलवर्णंन नामैकपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
॥ इति श्रीमुद्गलपुराणे तृतीयः खंडः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP