मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल म्हणती दक्षाप्रत । ऐक विग्नपाचें अद्‌भुत चरित । कृष्ण पांडवांसी जें सांगत । अमित द्युति वासुदेव ॥१॥
श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिराप्रत । महापुण्यशीला ऐक वृत्तान्त । उपाय असे एक अद्‌भुत । संकट मुक्त होण्यास्तव ॥२॥
पुरातन इतिहास सांगेन । जो आहे अपूर्व महान । सर्व विघ्नहर पुण्यपावन । महोदर गुणांनी लक्ष्मीमंडित ॥३॥
एकदा देवदेवेश वैकुंठांट । विष्णु बैसला होता लक्ष्मीसरित । विश्वसेनादी  समीप असत । सुखविलासीं निमग्न ॥४॥
गरुड वाहन पुढयांत । त्याच्या होते हर्षयुक्त । अप्सरा गंधर्व देव सेवित । विष्णु देवास त्या समयीं ॥५॥
सर्व देवांच्या सान्निध्यांत । लक्ष्मी म्हणे भगवंताप्रत । सनातना महाभागाप्रत । विनयसंयुत त्या वेळीं ॥६॥
स्वामी ऐका माझी विज्ञप्ति । आपण माझी सतत गति । स्त्रियांस भर्त्यांसम जगतीं । नसे अन्य हें वेदभाषित ॥७॥
आपण साक्षात देवदेवेश । शंकरादी स्तविती विशेष । भक्तांसी सिद्धिदाते सिद्धीश । षडैश्चर्य समायुक्त ॥८॥
देवादींस पदप्राप्त होत । आपणापासून सुविहित । सर्वांस भुक्तिदाते जगात । मुक्तिदाते आपणची ॥९॥
सर्वांचे पालक आपण विश्वांत । आपुला पालक अन्य नसत । तथापि ध्यान करता सतत । कोणास भजता तें सांगा ॥१०॥
एकांतात पूजिता कोणास । आपण आनंद परमबुद्ध जगास । श्रुति सांगती रहस्यास । म्हणोनी विस्मय मम चित्तीं ॥११॥
म्हणोनी मी निर्लज्ज विचारित । कोणाचें ध्यान करिता सतत । मी आपुली चरणदासी विनीत । संशय माझा दूर करा ॥१२॥
आपण सर्वत्र द्वद्वहीन । समरुप आनंदमय महान । तरी कां मोहविता जन । ध्यान करुनी अन्याचें ॥१३॥
या पूजन ध्यानाचें आपणांस । काय फळ मिळणार विशेष । तथापि करिता भक्तीस । कोणाची आपण केशवा? ॥१४॥
श्रीकृष्ण म्हणती युधिष्ठिराप्रत । प्रियेचें हें वचन ऐकून हसत । तिला आलिंगन देऊन म्हणत । ऐक प्रिये जलधिसुते ॥१५॥
तूं शुभप्रद प्रश्न विचारलास । जो तारक सर्व भूतांस । सिद्धिदाता सकलांस । उत्तर त्याचें एक आतां ॥१६॥
जनासी मोहविण्यां न करित । ध्यान मी नित्य चित्तांत । कुलदेवास गणेशा भजत । सर्वभावें मी प्रिये ॥१७॥
गुणेश्वरापासून संजात । महेश्वर आम्ही जगीं ख्यात । पांच देव महाभागे बलयुक्त । ऐक पूर्व परंपरा ॥१८॥
गुणेशें पूर्वी आराधिला । गणनायक जो वंद्य जयाला । त्या गणेशें तेव्हां स्थापिला । स्वपदीं प्रेमभावयुत ॥१९॥
त्याच्या वरदानें होत । गणेश ज्ञान सत्तादि संयुक्त । तो गुणेशही भक्तिसंयुत । भजतो देवी त्या गणेशा ॥२०॥
त्याची सेवा करुन । आम्ही झालों ज्ञानवान । स्वकार्य प्रवर्तक पावन । महेशान प्रख्यात ॥२१॥
म्हणूनी भावसंयुक्त भजत । आम्हीं तयास आदरयुक्त । तो आमुचा कुलदेव प्रख्यात । सर्व अर्थ प्रदायक ॥२२॥
विष्णूचें वचन ऐकून । लक्ष्मी झाली विस्मित मन । महाविष्णूस बोले वचन । विनयपूर्वक तदनंतर ॥२३॥
कोण हा गणेश्वर  देव । कैसें स्वरुप कोण ठाव । तो जर आपुला कुळदेव । जनार्दना मी भजीन त्यासी ॥२४॥
देवि तू योग्य प्रश्न केलास । आता करीन वर्णनास । त्याचें स्वरुप अपूर्व सुरस । सांगेन मी तुज स्नेहानें ॥२५॥
स्वानंदीं तो गणेश वसत । ब्रह्मनायक पंचधा जन्मत । त्याचें कथानक तुजप्रत । वर्णन करतो या वेळीं ॥२६॥
नामरुपात्मक देव जगतीं । ब्रह्मांत त्याची नित्यस्थिति । तेथ स्वानंदक योग वर्णिती । असद्रूप या नावानें ॥२७॥
असता अमृतरुप असत । ते सदात्म प्रवाचक ख्यात । सत्स्वरुप स्वानंदयुक्त । ऐसे जाण प्रिये तूं ॥२८॥
जें सत्यासत्य विहीन । सत्यासत्यमय नित्य नूतन । आनंदात्मक रुपी तो महान । समस्वानंद जाणावा ॥२९॥
त्रिप्रबोध त्रिहीन । नेतिरुप मोहहीन । महाभागे तो महान । स्वानंद अव्यक्त प्रसिद्ध ॥३०॥
वेदवादी गणेशाचें वर्णन । मायामय ऐसें करिती पावन । चतुर्धा रचना करुन । तो त्यांत नित्य खेळे ॥३१॥
मायाहीनतेनें होत । ढुंढी प्रयोगवाचक अद्‍भुत । त्याचा कोणाशी संयोग न होत । ऐसे बुधजन सांगती ॥३२॥
जें मायायुक्त विहीन । तेच भरांतिदायक असून । त्या उभयतांच्याहून भिन्न । गणेश हा योगरुप ॥३३॥
त्यात योगिजनांस शांति लाभत । यांत कांहीं संशय नसत । म्हणोनी योगस्वरुपा ती ज्ञात । शांति उत्तम जाणावी ॥३४॥
मनवाणीमय सर्व असत । गकाराक्षरानें व्यक्त । मनवाणी विहीन ज्ञात । णकाराक्षररुपानें ॥३५॥
त्यांचा जो स्वामी प्रख्यात । तो हा गणाघीश वेदांत । यासाठीं भक्तिसंयुक्त । भजतों मीं त्या सर्वनायका ॥३६॥
भ्रमरुपा ती महामाया । मानदे सिद्धि जाणी सदया । सिद्धीस्तव सर्व लोक या । भ्रमण करिती जगतांत ॥३७॥
भ्रमधारकरुपा बुद्धि जाण । सिद्धि बुद्धि भ्रमाची खूण । त्यांचा स्वामी सिद्धिरमण । सदा योगशांति रुप ॥३८॥
या कारणें जे ब्रह्मभूत । ते होती त्याच्या भजनीं रत । ऐसें सांगून नारायण थांबत । समुद्रपुत्री चकित झाली ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते लक्ष्मीनारायणसंवादवर्णन नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP