खंड ३ - अध्याय १०
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । सूर्य कथा पुढती सांगत । नारदमुनी परतूनि जात । तेव्हां मोहासुर हर्षित । विचार करी स्वचित्तीं ॥१॥
जाऊन बैसला एकांतांत । गणेशाचें ध्यान करित । महोदराची महिमा मनांत । जाणून हर्षित जाहला ॥२॥
शुक्रासन्निध जाऊन । तयासी करी सर्व कथन । आपुल्या गृहासी परतून । गणेशावरी मोहित झाला ॥३॥
मोहासुर झाला मोहवर्जित । त्या समयीं विष्णु तेथें येत । सामोपचारार्थ पाठवित । गणराज तेथ तयासी ॥४॥
केशवाचा मान करुन । मोहासुर करी तयाचें पूजन । महादैत्य प्रतापवान । शुभ आसनीं बैसवोनी ॥५॥
महाविष्णूस विचारित । म्हणे येथें का आलासी सांप्रत । सांग आपुलें इच्छित । सफल मी तें करीन ॥६॥
तेव्हां विष्णु तयासी म्हणत । महोदर समीप आला असत । धर्मरक्षणीं तत्पर जगांत । त्यानें मज पाठविलें ॥७॥
देव मुनींनी युक्त । सामोपचार करण्या तुजप्रत । मित्रभाव तो वांछित । दैत्यनायका तुझ्यासवें ॥८॥
देहदेहीमय ब्रह्म । गणनायक हा अनुपम । तत्त्वदर्शी मुनी सांगती मर्म । ज्या महोदर देवांचें ॥९॥
सर्वांच्या उदरीं निवसत । भोग भोगी जो समस्त । म्हणोनि महोदर नाम ख्यात । स्वल्पोदर आम्हीं सारे ॥१०॥
नगरापासून दशयोजन । आला असे महोदर महान । देव विप्रादी करिती स्तवन । त्यानें निरोप सांगितला ॥११॥
तोच मी तुज सांगेन । सर्वभावज्ञा ऐक वचन । महोदराची आज्ञा मानून । जीवन करी सुखपूर्ण ॥१२॥
विरोधभाव सोडून । दैत्येन्द्रा भूषवी आपुलें स्थान । देवांसी हर्विभाग मिळून । ब्राह्मण होवोत कर्मनिष्ठ ॥१३॥
असोत लोकवर्णाश्रमयुत । तैसेचि दुःखवर्जित । व्हावें तूं सामभावयुक्त । अन्यथा युद्धासी सज्ज व्हावें ॥१४॥
ऐसें हें गणेशाचें वचन । महाभागा तूं मानून । मित्रत्व भाव स्वीकारुन । कल्याण साधी आपुलें ॥१५॥
सूर्य सांगे वृत्तान्त । विष्णूचें वचन ऐकून म्हणत । मोहासुर प्रसन्नचित्त । महाबळी तो दैत्येन्द्र ॥१६॥
विष्णो तूं सांगसी हित । सुखकारक जें योग्य असत । तैसेंचि मी करीन त्वरित । महोदरासी तोषवीन ॥१७॥
ऐसें बोलून विष्णूप्रत । दैत्यांसी तो बोलावित । विष्णूचा उपदेश कथन करित । तेव्हां दैत्य क्रुद्ध झाले ॥१८॥
मोहासुराचें ऐकून वचन । निर्णय त्याचा जाणून । पाताळांत करिती गमन । भयव्याकुळ ते सारे ॥१९॥
शुक्राचार्यासहित । मोहासुर नंतर प्रतापवंत । विष्णूसह गणेशासी शरण जात । विप्रांनो ऐका ही कथा ॥२०॥
महोदरासमीप जाऊन । दैत्येन्द्र करी वंदन । भक्तिभावें करुन पूजन । स्तुतिस्तोत्र गाई त्याचें ॥२१॥
ब्रह्मरुपासी महोदरासी । सुरुपासी भोगभोक्त्यासी । देहदेहीमयासी । त्रिनेत्रधरासी नमन माझें ॥२२॥
मूषकारुढ देवासी । चतुर्भुजासी देवपतीसी । अनादीसी सर्वादि रुपासी । विनायकासी नमन असो ॥२३॥
हेरंबासी दीनपालासी । गणेशासी निजानंदपतीसी । ब्रह्मनायकासी ब्रह्मभूतासी । सिद्धिबुद्धि प्रदात्यासी नमन ॥२४॥
ब्रह्मासी ब्रह्मदात्यासी । योगशांतिमयासी योगपतीसी । योग्यासी योगदायकासी । एकदंतासी नमन असो ॥२५॥
सिद्धिबुद्धिपतीसी । नाथासी शूर्पकर्णासी । शूरासी सर्वांस मोहकर्त्यासी । भक्तांसी सुखदायका नमन ॥२६॥
वीरासी अभक्त-विघ्नकर्त्यासी । मायावीसी मायाधारासी । मायेनें भ्रांतिदायकासी । महोदरासी नमन असो ॥२७॥
जेथ वेदही मौन पावलें । तेथें माझे शब्द कैसे पुरले । तरी गणाध्यक्षा मी गाईलें । भक्तिभावें तुझे स्तोत्र ॥२८॥
धन्य माझी मातापिता जगांत । ज्ञात तप स्वाध्याय समस्त । धन्य देवेशा शरीर असत । जेणें पदांबुज पाहिले तुझें ॥२९॥
ऐसें बोलून करी नमन । महोदर बोले वचन शोभन । महासुरा वरदान । माग मनोवांछित ॥३०॥
तुझ्या भक्तीनें मोहित । देईन मी समस्त । तुज मारण्या आलों क्रोधसंयुक्त । परी शरणागता न मारी मी ॥३१॥
तूं रचिलेलें स्तोत्र वाचित । अथवा जो हें ऐकत । त्याचा मोह नष्ट होत । भुक्तिमुक्ति त्यांस मिळे ॥३२॥
धनधान्यादिक त्यांस लाभेल । पुत्रपौत्रांदीचें सुख विमल । गणेश वरदान ऐकून प्रबल । मोहासुर हर्षित जाहला ॥३३॥
हात जोडून म्हणे वचन । महोदरा जरी तूं प्रसन्न । तरी तुझ्या पादपद्मीं माझें मन । दृढ होईल ऐसें करी ॥३४॥
तुझ्या भक्तांचें मित्रत्व लाभावें । ऐसे वरदान मज द्यावें । मोहासुराचें वाक्य हें बरवें । ऐकून तोषला महोदर ॥३५॥
तयासी म्हणे महोदर । माझी दृढ भक्ति समय । तुझ्या मनीं होईल स्थिर । निःसंशय मोहासुरा ॥३६॥
कर्मज्ञानादि भावांत । जेथ माझें पूजन होत । तैसेचि स्मरण अविरत । तेथ भोगभोक्ता होशील ॥३७॥
आपुल्या स्थानीं राहून । स्वधर्माचें करी पालन । माझ्या भक्ता मोहविहीन । करी सर्वदा मोहासुरा ॥३८॥
त्याची आज्ञा मानून । मोहासुर जाई परतून । शांतियुक्त मनीं होऊन । गणेशचिंतनीं निमग्न झाला ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते मोहासुरशांतिवर्णन नाम दशमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP