मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ३९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । हरिवंशाचे वर्णन । मुद्‌गल करिती पुढती महान । बलरामाची भार्या गुणवान । रेवती सुरुप सुस्वभावी ॥१॥
निषेध उल्मुक हे दोन सुत । रामापासून तिज होत । सोळा हजार एकशे आठ बायका ख्यात । कृष्णाच्या ज्या अतिसुंदर ॥२॥
त्यांच्यापासून तयास होत । शेकडो हजारों सुत । प्रत्येक भार्येस दहा सुत । एक कन्या जाहली ॥३॥
प्रद्युम्न सांब मुख्य सुत । महातेजोयुत ख्यात । महारथ महाभाग ते ज्ञानसंयुत । प्रद्युम्नाचा सुत अनिरुद्ध ॥४॥
त्या प्रतापवंत अनिरुद्धाचा सुत । वर्ज नामक वंशदीप ख्यात । मुसळापासून तो अवशिष्ट । ऐसे नानाविध नृप ॥५॥
त्या सर्वांचे नामवर्णन । अशक्य दक्षा मज जाण । तेव्हां दक्ष विचारी प्रश्न । विष्णू मानव देह कैसा धरी? ॥६॥
मुद्‌गल म्हणती कथा असत । यामागें प्राचीन पुनीत । ती तुज सांगून संशय समस्त । दूर करीन मी तुझा ॥७॥
पूर्वी एकदा दैत्येशां जिंकित । देव विष्णु समन्वित । तेव्हां राज्य त्यागून वनांत । दैत्य लपले भयानें ॥८॥
त्यांस शोधून मारण्या उद्युक्त । देव शस्त्रधारी जात । प्रल्हाद प्रमुख सर्व भयभीत । असुर तेव्हां जाहले ॥९॥
ते सर्व हात जोडून प्रार्थित । राज्य सोडून आलों वनांत । शस्त्रास्त्रांनी विहीन अनाथ असत । आम्हां कां हो मारतां? ॥१०॥
देवांनो आमुचें सर्व राज्य घेतलें । तरी आतां कां शस्त्र धरिलें? । आता आम्हां पाहिजे रक्षिलें । कृपा करुन देवांनो ॥११॥
आम्ही आज दीन झालों । आमुच्या वैभवासी मुकलों । म्हणोनी दयायाचना करण्या आलों । सांप्रत प्राज्ञांनो रक्षावें ॥१२॥
तथापि विष्णूनें प्रेरित । ते देव दानवां मारण्या उद्यत । तेव्हां असुर पलायन करित । शरण जाती शुक्राचार्यासी ॥१३॥
योगनिधि भृगु दैत्यांचे गुरु । असुरांसी मारण्या सत्वरु । त्यांच्या मागून देव जाती हरुं । दैत्यजीविता क्रोधानें ॥१४॥
जेव्हां असुर भृगूच्या आश्रमांत । प्रवेश करिती भयभीत । तेव्हा दक्षा शुक्राचार्य वनांत । गेले होते समिधा आणण्या ॥१५॥
म्हणुनी दानव भृगपत्नीप्रती । हात जोडूनी प्रार्थितो । देवांपासून रक्षी सांप्रती । अन्यथा तुझ्यापुढें प्राण त्यजूं ॥१६॥
त्यांचे वचन ऐकून म्हणत । सुखप्रद शब्द तयांप्रत । भिऊं नका निवारीन मी सांप्रत । देवांसी यांत संशय नसे ॥१७॥
हें आश्वासन ऐकती । तेव्हां दानव निश्चिंत होती । हृदयांत ते संतोषती । निःश्वास सोडिती धैर्यानें ॥१८॥
एवढयांत तेथ येत । विष्णु पुरोगम देव शुक्राश्रमांत । आयुधें सज्ज त्यांच्या करांत । दैत्या मारण्या सरसावले ॥१९॥
त्यांसी म्हणे भृगूची कान्ता । असुरहिंसा नको आतां । दैत्य माझ्या शरण येतां । तुम्ही त्यांना न पीडावें ॥२०॥
हे असुर राज्यहीन । माझ्या आश्रया आले दीन । शरणागतांसी रक्षण वचन । शुक्रपत्नी मी देत आहे ॥२१॥
परी तिचें वचन न ऐकत । देवेंद्र विष्णूने प्रेरित । वज्र उगारुन धावत । दैत्यां मारावया क्रोधानें ॥२२॥
तेव्हा भृगुपत्नी क्रोधयुक्त । तपःप्रभावें स्तंभित करित । देवराजा इंद्रासी त्वरित । विष्णु तेव्हां कोपला ॥२३॥
त्यानें आपुलें तीक्ष्णधार चक्र सोडून । भृगुपत्नींचे शिर केलें छिन्न । तें शिर धरातली पडून । हाहाकार माजला ॥२४॥
त्याचक्षणीं भृगु परतत । मृत पत्नीसी जेव्हां पाहत । क्रोधें खदिरांगारासम दिसत । डोळे त्याचे संतप्त ॥२५॥
ती विष्णूस शाप देत । तूं धरणीतलावर पडशील त्वरित । ब्राह्मणीच्या वधें देवाधमा बुद्धींत । संभ्रम तुझ्या होईल ॥२६॥
आपुल्या तपानें सजीव करित । ज्ञानानें पत्नी क्षणांत । दानवाचेंही रक्षण होत । भृगुप्रभावें त्यासमयीं ॥२७॥
तेव्हां विष्णु देव शोकसमन्वित । शरण विघ्नराजास जात । पवित्र मयूरक्षेत्रांत । तेथ तप उग्र करी ॥२८॥
एक वर्ष निराहार राहत । भक्तीनें विघ्नपा तोषवित । गणराज भक्तिनियंत्रित । प्रकट जालें विष्णूपुढे ॥२९॥
म्हणती महाविष्णुप्रत । वर माग तूं हृदयेप्सित । तें ऐकतां प्रणाम करित । विष्टरश्रवावरती उठून ॥३०॥
गणेशासी भक्तिभावें स्तवित । अर्थवशीर्षपाठ तोषवित । गणेश पुनरपि म्हणे तयाप्रत । केशवा वर माग आतां ॥३१॥
श्रीविष्णु तेव्हां प्रार्थित । जरी वर देसी मनोवांछित । तरी भृगूचा शाप मज न बाधत । ऐसें करी महाप्रभू ॥३२॥
येथेंच निवास संस्थान । देई मजसी जेथ तुझें भजन । निर्विघ्नपणें सर्वदा करीन । स्वामी मज करी त्वत्पदा प्रिय ॥३३॥
तथास्तु म्हणून ढुंढी सांगत । विष्णू तुज चिंता नको चित्तांत । माझें वचन ऐक हित । भृगू माझा परमभक्त ॥३४॥
त्याची वाणी कदापि न होत । असत्य हया जगतांत । म्हणून तूं मृत्युलोकांत । पडशील यांत संशय नसे ॥३५॥
तेथ ज्ञान नव नष्ट न होईल । स्वेच्छाचारी तूं होशील । माझ्या प्रसादें सुखमय असेल । जीवन तुझें त्या वेळीं ॥३६॥
देव तुज प्रार्थितील । दैत्यवध याचना करतील । धर्मसंस्थापनार्थ घेशील । अवतार तूं मृत्यु लोकीं ॥३७॥
तेथ तुझी विशेष कीर्ति । यश महान होईल जगती । पृथ्वीवरी स्थापना निश्चिती । करशील अल्प परंपरेची ॥३८॥
तुझे परमभक्त बहुत । होतील जे जगतांत । त्यांच्या चतुर्विध इच्छा निश्चित । पुरवशील तूं विष्णू सदा ॥३९॥
देवांए कार्य करुन । जनार्दना जाशील तूं परतून । आपुल्या वैकुंठलोकीं प्रसन्न । स्वच्छंदानें तदनंतर ॥४०॥
स्वेच्छेने देहधारी होशील । माझ्या प्रसादें वांच्छित पुरेल । हृषीकेशा सर्वदा राहशील । प्रसन्न तू या क्षेत्रीं ॥४१॥
जें अन्य तूं प्रार्थिसी । तें तें जगांत पावसी । या क्षेत्रांत तुजसी । देत असे अक्षय स्थान ॥४२॥
ऐसें सांगून अंतर्धान । नंतर पावला गणेश महान । करुणानिधि तो गजानन । विष्णू तेथ निवास करी ॥४३॥
भावभक्तीनें पूर्व दिशेंत स्थापित । गणनायक मूर्ति मयूरक्षेत्रांत । विष्णुविनायक ऐसें नाम ठेवीत । द्विजगण त्या समयीं ॥४४॥
दक्षा हें तुज सांगितलें । विष्णूचें देहधारित्व कारण भलें । नाना योनिसमुद्‍भव झाले । देवाधिप कैसे तें ॥४५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते विष्णुदेहधारनवर्णन नामैकोनचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP