मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ३७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल दक्ष प्रजापतीस । कथा सांगती पुढती सुरस । सहस्त्र वर्षें तपें विश्वेश्वरास । दया आली जमदग्नीची ॥१॥
तैसीच अनुकम्पा रेणुकेप्रती । वाटून गजानन प्रकटती । म्हणती रेणुके काय चित्तीं । तें सांग मज आतां ॥२॥
जमदग्ने एकाक्षर विधानें माझ्या चित्तास । तैसेंचि तपानें तोषविलेंस । ऐकून त्या रम्य वचनास । भार्गवदाम्पत्य हृष्ट झालें ॥३॥
गणराजास भक्तिसमन्वित । तीं उभयता प्रार्थित । धन्य वंश माजा सांप्रत । गणेशा तुमचें दर्शन झालें ॥४॥
आमुचा स्वाध्याय तप धन्य । आम्हांसारखा न कोणी अन्य । आमुचे फळा आलें पुण्य । यांत संशय मुळीं नसे ॥५॥
ऐसें सांगून प्रणाम करिती । गणेश्वरासी पूजिती । रोमांचित शरीरें त्यांचीं होतीं । स्तुति करिती हर्षभरें ॥६॥
विघ्नपालासी भक्तविघ्नहर्त्यासी । अभक्तांना विघ्नकर्त्यांसी । ब्रह्मभूतासी अनादीसी । वक्रतुंड स्वरुपासी नमन ॥७॥
गणेशानासी नाना शक्तियुतासी । अनंत गणाच्या पतीसी । नाभेदकरासी । नानाभेविहीना नमन ॥८॥
हेरंबासी सिद्धि बुद्धिवरासी । अमेयमायेनें खेळकर्त्यासी । सिद्धिबुद्धिसहायासी । स्वानंदपतीसी नमन असो ॥९॥
भक्तांसी योगदात्यासी । योगाकारासी योगासी । शांतिदासी अखंडानंदरुपासी । भुक्तिमुक्तिप्रदा नमन ॥१०॥
लंबोदरासी देवासी । एकदंतासी महोदरासी । विघ्नपतीसी सुखदायीसी । मूषकध्वजा तुज नमन असो ॥११॥
मूषकवाहनासी चतुर्भुजासी । सर्वांच्या आदिपूज्यासी । भोगीसी ज्येष्ठराजासी । सर्वांसी मातृपितृस्वरुपा नमन ॥१२॥
ज्याचें असमर्थ करण्या स्तवन । वेद देव योगीजन । शिवादी देवही थकले उन्मन । तेथ आम्हीं काय वर्णावें ॥१३॥
ऐसी स्तुति करुन । गणेशातें प्रणाम करुन । भक्तीनें स्तवन रचून । दोघेही पडली पायावरी ॥१४॥
त्या उभयतांसी वर उठवित । गणाधीश तें हर्षसंयुत । म्हणे वर मागा जो असेल वांछित । भक्तिप्रभावें प्रसन्न मी ॥१५॥
गणेशाचें वचन ऐकती । नंतर तयासी म्हणती दंपती । प्रणाम करुन पाय स्पर्शिती । हर्षोत्फुल्ल चित्तानें ॥१६॥
जरी प्रसन्नभावें वर देसी । तरी भक्ति दे सुखप्रद ऐसी । तुझ्या पादपद्मीं योगशांतीसी । देई विघ्नेशा योगेशा ॥१७॥
जी योगशांती गाणपत्यांस । प्रिय असे विशेष । सदा आनंदात्मिक रुपास । योगेशा येथ मागतों ॥१८॥
तथास्तु म्हणून सांगत । त्यांचा भक्तिभाव पाहून हर्षित । गणेश सुखदायक भक्तांप्रत । म्हणे तुमचें स्तोत्र उत्तम ॥१९॥
तुम्ही रचिलेलें स्तोत्र जगांत । वाचकां योगप्रद निश्चित । जो जें वांछी नर भक्तियुत । तें तें देईन स्तोत्र पाठका ॥२०॥
जमदग्नें तूं हो सदा शांत । माझा निस्सीम भक्त । रेणुकें तूं देहयुक्त । भज मजला योगभाविता ॥२१॥
लोक तुजला धडाविरहित । केवळ मस्तक रुपें पाहत । देवतादीस तूं दिसत । ज्ञानदृष्टीनें अंगसहित ॥२२॥
ऐसें बोलून अन्तर्धान । पावला ब्रह्मनायक गजानन । रेणुका जमदग्नी गमन । करिती नंतर स्वाश्रमाप्रती ॥२३॥
पुढें एकदा परशुराम । प्रणिपात त्यांस करुन अभिराम । साक्षात विष्णु प्रतापी मनोरम । ऐसें बोलता जाहला ॥२४॥
अर्जुनास मी मारीन । श्रीराम तो हें सांगे वचन । निःक्षत्रिय पृथ्वी करीन । आई बाबा निःसंशय ॥२५॥
तुमच्या आज्ञेचें पालन करीन । तेव्हां जमदग्नि म्हणे आनंदून । वृथा हिंसा करुं नको रे रागावून । रामा गर्व तूं सोडी ॥२६॥
तेव्हां त्या भार्गवा राम सांगत । मातेपुढें पूर्वीं प्रतिज्ञाव्रत । घेतलें मुनीश्वरा तें जगांत । सत्य करुन दाखवीन ॥२७॥
मातृभक्तिपरायण मी करीन । तदर्थ प्राणांचेंही दान । त्याचा आग्रह पाहून । जमदग्नि म्हणे पुत्रासी ॥२८॥
ऐसा जर तुझा निश्चय । तरी तूं शंकरास पूजी निर्भय । त्याची उपासना करता ध्येय । पूर्ण तुझें होईल ॥२९॥
तो अभीष्ट पूर्ण करील । ऐसें ऐकता वचन निर्मल । कैलासीं जाई राम सबल । शंकर प्रभूसी वंदन करी ॥३०॥
महेशाचें स्तवन करित । तेणें तो प्रसन्न होत । परशुराम तयासी सांगत । हृद‌गत आपुलें सफल व्हाया ॥३१॥
कार्तवीर्यासी मी मारीन । निःक्षत्रिय पृथ्वी करीन । एकवीस वेळां दिलें वचन । जैसें मी आईसी ॥३२॥
तरी हें सफल होण्यास । काय उपाय असे विशेष । तो सांगावा मज भक्तास । तेव्हां शंभू काय करी ॥३३॥
गणेशाचा एकाक्षर मंत्र देत । परशुरामासी प्रभावयुत । राम प्रणाम करुन स्वीकारित । नंतर गेला वनामाजी ॥३४॥
पूर्व जन्मीं वामन अवतारांत । त्याने जें केलें गणेशतप उदात्त । तें तेव्हां परशुराम स्मरत । विष्णूचा अंश प्रत्यक्ष ॥३५॥
वायुभक्षण करुन राहत । गणेश एकाक्षर मंत्र जपत । समाधि लावी ध्यानसंयुत । महा उग्र तप केलें ॥३६॥
तेणें विघ्नप तोषला । वर्षशतानें प्रकटला । भक्तापुढें जो जाहला । महा उग्र तप भक्तियुत ॥३७॥
त्या महाभागा भार्गवाप्रत । विष्णूस अव्यया म्हणत । वर माग मी भक्तितोषित । देईन जें मागशील ॥३८॥
त्याचें हें रम्य वचन । ऐकून करी साष्टांग नमन । गणपतीचें विशेष पूजन । करुनी जोडी करांजलि ॥३९॥
भक्तिरसानें संप्लुत । अश्रु लोचनांतून ओघळत । राम करी स्तुति पुनीत । गणेशासी त्या समयीं ॥४०॥
गणनाथा भक्तानंदविवर्धना । भक्तिप्रिया देवा गजानना । हेरंबा वेदांतवेद्यरुपा प्रसन्ना । नमन तुजला पुनःपुन्हां ॥४१॥
मनोवाणीमया योगाकारा । मनोवाणीविहीना गजवक्त्रा । निर्गुणात्म प्रधारका नराकारा । कंठाखालती सगुणा नमन ॥४२॥
अनादी सर्वपूज्या सर्वदायका । अदिपूज्या विघ्नेशा नानाविध चालका । विघ्नहंत्या भक्तसुखकारका । दुरात्म्यांसी विघ्नकर्त्या नमन ॥४३॥
सदा स्वानंदनाथा ढुंढिराजा । वक्रतुंडा लंबोदरा शंकरात्मजा । सतत शांतिरुपा देवराजा । शांतिदा तुज नमन माझें ॥४४॥
महोदरा सिद्धिबुद्धिपते नमन । नाना ऐश्वर्यदात्यों वंदन । भ्रमदा मोहकर्त्या अभिवादन । नानाज्ञानप्रभेदकरासी ॥४५॥
सुभक्तांचे भ्रममोहादी नमन । नाना दैत्यांसी मारिसी । देवांचा तूं मद हरिसी । सुरासुरमया नमस्कार ॥४६॥
सर्वत्र योगरुपा संयोग । तैसाचि तुज ना अयोग । तुझ्या स्तुतीचा योग । विघ्नेशा कैसा शक्य मजला? ॥४७॥
गणाध्यक्षा शेष शिवादीस न जमलें । तें मज कैसें जमणार भलें । तुझें स्तवन कितीही केलें । तरी तें अपूर्णच राहील ॥४८॥
म्हणोनी जोडोनिया कर । तव चरणीं ठेवितों शिर । नाथा पालन करी सत्वर । आश्रया तुझ्या मी आलों ॥४९॥
ऐसी स्तुति तो करित । भक्तिभावें कंठ दाटत । अंगावरीं रोमांच फुलत । परनानंदे नृत्य करी ॥५०॥
जय विघ्नेश जय हेरंब गणेश । तूं सर्व जगाचा ईश । ऐसें गायन करी विशेष । प्रसन्न झाला गजानन ॥५१॥
भक्तिनिमग्न त्यास पाहत । साश्रुनेत्र रोमांचयुत । गणेश त्या भक्ता म्हणत । रामा महाभागा ऐक ॥५२॥
ऐक माझे परम वचन । धन्य तूं सर्वभावें महान । माझ्या भक्तींत निमग्न । स्तोत्र रचिलें हें रसपूर्ण ॥५३॥
भक्तिरसप्रद हें स्तोत्र वाचील । अथवा जो हें ऐकेल । श्रद्धापूर्वक ध्यायील । त्याची सकल बाधा हरीन ॥५४॥
येथ भोगून अखिल भोग । अंतीं स्वानंदलोकाचा योग । जें जें वांछील सत्त्वग । तें तें देईन केशवा ॥५५॥
मजला तो नर मान्य सदा । संशय यांत न कदा । माझ्या भक्ता संपदा । सदैव मी देईन ॥५६॥
माझा हा परशू तुजला । आज मी रे असे दिला । माझी तुल्यता जगाला । तुझ्यांच आतां दिसेल ॥५७॥
सर्व राजांसहित सहस्त्रार्जुन । पावेल तव हस्तें पराभव महान । पृथ्वी निःक्षत्रिय पावन । करशील एकवीस वेळा तूं ॥५८॥
सदैव तूं जयसमन्वित । हया माझ्या परशूनें ख्यात । म्हणोनि परशुराम नामें ज्ञात । सर्वत्र जगीं होशील ॥५९॥
तुझें नाम हें सुखप्रद । स्मरणें होईल शुभद । यज्ञ करुनिया यश विशद । भूमीवरी मिळेल तुजला ॥६०॥
ऐसें उज्ज्वल यश लाभून । शांतियोगें माझें भजन । करशील तूं नितनेम पावन । ऐसें दिलें वरदान ॥६१॥
नंतर गणेश्वर अन्तर्धान । पावला जेव्हां तो गजानन । रामें स्थापिली मूर्ति तत्क्षण । ब्राह्मणांसी बोलावुनी ॥६२॥
त्यानंतर पूजा करुन जात । परशुराम स्वगृहाप्रत । चित्तांत हर्षसमन्वित । मात्यापित्यांस वंदन करी ॥६३॥
परशुधर तो आज्ञा घेत । बंधूसंगें मग निघत । कार्तवीर्या आव्हान देत । महाबळी तो पराक्रमी ॥६४॥
सिद्ध कवचांनी युक्त । अन्य नृप लढण्या येत । जे देवादींसही कठिण असत । जिंकण्या ते सर्व आले ॥६५॥
गणेशवरदानें परशुराम । करीं धरा परशु अभिराम । त्याच्या तेजें संग्राम । गाजविला तयानें ॥६६॥
कार्तवीर्याचें हजार हस्त । रोषें तो तोडून टाकित । नंतर परशूनें ठार मारित । महाघोर युद्ध करुनिया ॥६७॥
नंतर विजयी परशुराम होत । क्षत्रियांच्या वधात रत । निःक्षत्रिय पृथ्वी करित । क्रोधसंयुक्त परशुराम ॥६८॥
पुनः ब्राह्मणवीर्ये जन्मत । क्षत्रिय प्रबळ जगीं होत । राम त्या सर्वांसी मारित । पुनःपुन्हा स्वप्रतापानें ॥६९॥
एकवीस वेळा निःक्षत्रिय अवनी । करुन रक्तें तोषविली जननी । यज्ञ करुन पृथ्वी दानी । दिधली त्यानें ब्राह्मणासी ॥७०॥
तेव्हां तयाच्या निवासार्थ देत । नवीन भूमि सागर भयभीत । अन्यथा बाणें त्या हटवित । परशुराम तो प्रतापी ॥७१॥
त्या परशुरामभूमीवरी । राहून गणेशाचें भजन करी । अनन्यभावें ध्यान करी । अद्यापही तो गाणपत्य ॥७२॥
चिरंजीव तो गणनायका स्मरत । अखंड त्या  नवभूमींत । हें कार्तवीर्य आख्यान अद्‌भुत । दक्षा तुज सांगितलें ॥७३॥
रामाचें जमदग्नि रेणुकेचें । चरित्र हें आश्चर्यकर साचें । हें वाचितां ऐकतां नराचे । चिंतितार्थ पूर्ण होतील ॥७४॥
भक्तीनें करिता वाचन । भुक्तिमुक्तिप्रद हें महान । चरित्र उद्‌बोधक पावन । ऐसें रहस्य जाण दक्षा ॥७५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते परशुरामचरितकथनं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP