खंड ३ - अध्याय २०
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । नरनारायण वर्णाश्रमधर्म सांगती । चार वर्ण मुख्य असती । ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जगतीं । व्यभिचारें त्यांच्या नाना वर्ण ॥१॥
मायाविनाशार्थ मुने तुजप्रत । मायेचे रुप सांगत । तेथ ब्राह्मणधर्म संक्षेपांत । प्रथम वर्णन करीन ॥२॥
ब्राह्मणांच्या चतुर्धा वृत्ति । ऐसी असे शास्त्र उक्ती । उञ्छशिल तैसें शुक्ल जगतीं । मृत तैसें अमृतक ॥३॥
अयाचित आणि भूमिकर्षण । वनात राहून उदरभरण । त्यांचें सांगेन सर्व लक्षण । जीविका ही ब्राह्मणांची ॥४॥
शेतकरी धान्य नेती । परी कांहीं उरते शेती । कणादी ते गोळा करिती । ब्राह्मण देहपोषणार्थ ॥५॥
अथवा वाणी लोकांच्या घरांत । धान्यकणादी जे पाखडित । ते वेंचून त्यावरी करित । देह पोषण ब्राह्मण ॥६॥
ऐसी एक वृत्ति कथिली । आता दुसरी ऐक भली । भूमी न नांगरता पेरणी केली । स्वयं धान्य जे वाढे ॥७॥
त्यावरी उदरनिर्वाह करित । शुक्लवृत्तीनें भिक्षा मागत । रागलोभादींनी वर्जित । त्यास म्हणती मृत रीती ॥८॥
परी जे न मागतां देती । जन तेवढेंच खाऊन जगतीं । ती जाणावी अमृत वृत्ति । ऐसे धर्मशास्त्र सांगतसे ॥९॥
शेतकरी भूमी नांगरती । तेथे धान्याची होय उत्पत्ति । त्या धान्यानें देहपोषणीं मती । ब्राह्मणानें धरु नये ॥१०॥
पूर्वभागीं स्वधर्म सांगितला । तो ब्राह्मणें पाहिजे आचरिला । सेवादीवृत्ति योगाला । ब्राह्मणें सदैव त्यागावे ॥११॥
क्षत्रियांनी शस्त्रादि धारणें करावी । देहपोषण वृत्ति बरवी । सेवादिवृत्ति मानावी । अग्निहोम करावा द्विजहस्तें ॥१२॥
क्षत्रियजानें संन्यास न घ्यावा । वैश्यानें क्रयविक्रय करावा । गोपालन वा भूमिकर्षणाचा घ्यावा । आश्रय उदरपालनार्थ ॥१३॥
संन्यासधर्मेहीन । क्षत्रियापरी वैश्यें राहून । यजन दान करावें । अध्ययनही करावें ॥१४॥
परी न करावें याजनादिक । सर्व अग्निकर्मात्मक । देवतार्चनादी पावक । ब्राह्मणहस्तें करावें ॥१५॥
वैश्य धर्म सर्व जाणून । करावें स्वधर्माचें पालन । ब्राह्मणमुखें तर्पण । मंत्रपूर्वक करावें ॥१६॥
ऐसा हा वैश्यमार्ग कथित । शूद्र त्रिवर्ण सेवेंत रत । दासासम राहून होत । गृहस्थाश्रमी द्विज सेवक ॥१७॥
द्विजासी दान द्यावें । पुराण श्रवण त्याने करावें । परी वेदाक्षर न ऐकावें । ऐसी आज्ञा शास्त्राची ॥१८॥
पुराणांत देवांचें अवतार । त्यांचें श्रवण करावें सादर । त्या देवता मूर्ती प्रतिष्ठित सुंदर । देवर्षींनी ज्या केल्या ॥१९॥
त्या मूर्तीसी स्पर्शादी न करावा । शूद्रांनी नाममंत्र जपावा । स्वेच्छा प्रस्थापित मूर्तिसि नसावा । स्पर्श त्यांचा कदापि ॥२०॥
नाममंत्रें पूजन । तैसेंचि करावें स्मरण । मृतिकेची मूर्ति स्थापून । तिचें पूजन करावें ॥२१॥
आवाहनादि पासून । विसर्जनपर्यंत पुराणोक्त जपून । मंत्र सर्वत्र अर्चन । श्राद्धतर्पण करावें ॥२२॥
ब्राह्मणांच्या मुखें सादर । करावा समग्र पूजोपचार । पुराणांतील श्लोक पवित्र । शूद्रानें ना म्हणावे ॥२३॥
परी पुराणमंत्र ऐकावे । अंत्यजातिभवें स्वभावें । नामस्मरण सदा करावें । देवमूर्तीस स्पर्शू नये ॥२४॥
पुराणमंत्रादींनी अर्चन । तैसें न करावें कांहीं कर्म । पितर देवांसी उद्देशून । धनादींचे दान द्यावें ॥२५॥
धान्याचेंही करावें दान । हा असे मार्ग पुरातन । स्वधर्मे नियमें वागता जन । शूद्रही स्वर्गलोकी जाती ॥२६॥
महाभोग ते भोगती । तयांसी सुखभोगांची प्राप्ति । ब्राह्मण प्राजापत्यपद लाभती । क्षत्रियजन इन्द्रपद ॥२७॥
वैश्य वायव्यपद पावती । शूद्रादी गंधर्व होती । स्वकर्मरतांची ही गति । मनीषी जन सांगती ॥२८॥
ऐसे नानाविध भोग भोगती । मायामयही वर्णधर्मांश्रमगती । जे ऐकती अथवा वाचिती । मायामोह नष्ट त्यांचा ॥२९॥
ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते वर्णधर्मचरिते वर्णधर्मप्रकाशो नाम विंशतितमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP