मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल सांगती दक्षाप्रत । महाभाग धर्मप्रिय नृप पुरुवंशांत । यज्ञकर्ते सदा धर्मरत । चरित्र वर्णन अशक्य त्यांचें ॥१॥
ऐशा या नृपपरंपरेत । शंतनु नाम नृप विख्यात । धर्मशील प्रजापालनरत । त्याचा पुत्र भीष्म नामा ॥२॥
श्रेष्ठ तो धर्म परायण असत । गंगेचा सुत पाळी ब्रह्मचर्यव्रत । शास्त्रज्ञ तो प्रख्यात । सत्यवती त्याची सापत्न माता ॥३॥
सत्यवतीपासून शंतनूस प्राप्त । दोन पुत्र जे विख्यात । चित्रांगद महाबाहू नामवंत । विचित्रवीर्य नाम दुसरा ॥४॥
चित्रांगद महातेजयुक्त । क्षत्रियांशी स्पर्धा करित । चित्रांगद गंधर्वाशी लढत । युद्धांत त्या मृत्यु पावला ॥५॥
विचित्रवीर्य क्षयरोगें पीडित । रोगदोषें त्या तो मृत । त्याचे सुहृद बहु दुःखित । त्याच्या पत्नी दोन होत्या ॥६॥
काशीराजाच्या त्या सुता । अंबिका अंबालिका दुःखिता । वैधव्याग्नींत पोळता । म्लानवदन त्या दोघी ॥७॥
सत्यवती तेव्हां स्मरण करित । आपुल्या व्यास पुत्राचें मनांत । वंशवृद्धीस्तव संतान प्राप्त । व्हावें सुतांसी म्हणोनी ॥८॥
व्यास प्रकट होऊन विचारित । माते तूं कां दिससी दुःखित । दुःखनाश तुझा करीन त्वरित । यांत कांहीं संशय म्हणोनी ॥९॥
सत्यवती व्यासास सांगत । विचित्रवीर्याच्या विधवा असत । नियोग नियमें होई रत । त्यांच्या संगे वंश वाढवी ॥१०॥
ही माझी आज्ञा मानून । आतां न करी अनमान । तेव्हां व्यासें मातृवचन । शिरोधार्य मानलें ॥११॥
कुत्सित वेष धारण करित । रात्रीं विधवा राण्यांस भोग देत । महामुनी तो वंशवृद्धी करित । आपुलें वीर्यबीज पेरुनिया ॥१२॥
मुनीच्या वीर्यगुणें अंबिका लाभत । धृतराष्ट्र हा थोर सुत । अंबालिकेसी जो झाला सुत । त्याचें नांव पांडु ऐसें ॥१३॥
त्या राण्यांच्या दासीपासून । व्यासवीर्ये विदूर जन्मून । यमधर्मे देह त्या रुपें घेऊन । मांडव्य शाप भोगिला ॥१४॥
दक्ष विचारी मुद्‌गलाप्रत । मांडव्यशाप । यमास प्राप्त । कोणत्या कारणें पूर्व काळांत । तें सर्व सांगा मजला ॥१५॥
धर्ममागीं न्याय देत । प्राणिमात्रांसी सम असत । ऐसा तो यमधर्म कां लाभत । मांडव्याचा शाप पूर्वीं ॥१६॥
मुद्‌गल दक्षास सांगती । जाणतों उत्सुकता तव चित्तीं । बरवा विचारलास प्रश्न मजप्रती । ऐक कथानक पुरातन ॥१७॥
एकदा मुनिवर्य मांडव वनांत । बैसला होता मग्न तपांत । तेथ धन चोरुन चोर येत । राजपुरुष करिती पाठलाग ॥१८॥
जेव्हां राजाचे वीर मुख्य येत । रात्रीं त्या स्थानाप्रत । धन टाकून चोर पळत । मुनीच्या संन्निध्य त्या वेळीं ॥१९॥
राजदूत धनराशी पाहती । मुनीच्या समीप भूमीवरती । मांडव्याचा तिरस्कार करिती । मौन भावें जो बैसला ॥२०॥
त्यास पकडून मारिती । आपुल्या नगरा घेऊन जाती । राजास धन देऊन सांगती । चोराचा त्या वृत्तान्त ॥२१॥
तें ऐकतां राजा कुपित । होऊन आज्ञा तेव्हां करित । या चोरास शिक्षा द्या त्वरित । राजा सेवक हातांत शूल ठोकिती ॥२२॥
त्या समयीं दुःखसमायुक्त । मांडव्य ऋषि तप करित । कश्यपा सृष्टिकरकासी स्मरत । आपुल्या गुरुसी चित्तांत ॥२३॥
स्मरण करताचि प्रकटत । कश्यप तत्काळ पुढयांत । पाहून मांडव्यासी दुःखित । म्हणे तूं भज गणनायकासी ॥२४॥
तो सर्व विघ्नाचा निहंता । भक्तांसी शांतिदाता । त्याचें भजन करण्या तत्त्वता । कोणता मार्ग तें सांगा ॥२५॥
मांडव्याचा प्रश्न ऐकून । कश्यप त्यासी सांगे वचन । गणेशाचें स्वरुप महान । भक्तीसी जें सुखदायक ॥२६॥
पंचधा चित्तवृत्तीचा चालक । मी हा चिंतामणि पावक । गजानन वेदांती ख्यात एक । ऐक रहस्य गजदेहाचें ॥२७॥
संप्रज्ञात स्वरुप देह असत । असंप्रज्ञात तें शिर वर्तत । म्हणोनी गजवक्त्र हा ज्ञात । भ्ररमरुपा महामाया ॥२८॥
तीच गौणी सिद्धी जगांत । भ्रमधारक रुपा बुद्धि असत । त्या सिद्धिबुद्धींचा स्वामी असत । योगाकार गणाधीश ॥२९॥
ऐशा योगविधानेन भजशील । योगशांतिमया शरण जाशील । तरी मांडव्या विघ्न हरेल । तुझें यांत संशय नसे ॥३०॥
ऐसे सांगून तया देत । एकाक्षर विधानें गणेश कवच अद्‌भुत । निरोप घेऊन कश्यप जात । आपुल्या गृहीं त्यानंतर ॥३१॥
मांडव्य विघ्नेशासी भजत । जैसें कश्यप विधान सांगत । गणराजाचें कवच घालित । पीडाहीन तेणें झाला ॥३२॥
कोण्या कार्यास्तव येत । महाविप्रासी त्या पाहत । हात जोडूनी प्रणाम करित । राजा भयभीत जाहला ॥३३॥
रडूं लागला पाहून अघटित । म्हणे ही काय घडली मात । महामुनीस सुळीं दिलें नकळत । घोर पाप हें असे ॥३४॥
मांडव्य त्यासी तेव्हां म्हणत । महीपाला मीं शाप न देत । रडूं नको तूं नो होय दुःखित । माझ्या कर्मदोषें हें घडलें ॥३५॥
मज सुळावरी तूं चढविलें । हें न जाणता घडलें । तें मी पाहिजे सहन केलें । कर्म भोग हा ओढवला ॥३६॥
नंतर नृप तेथ आणवित । लोहार जे कार्यकुशल असत । त्यांनी केले बहुत । परी शूळ निधेना॥३७॥
खिळा जो रुतला हातांत । बाहेर उपटण्या अशक्त । म्हणोनी भयाकुल संत्रस्त । शूलाग्र तोडिती लोहार ॥३८॥
परी जेवढा मुनि हस्तात । रुतला तेवढा तैसाच राहत । राजा मुनीची पूजा करित । परी मुनी न वाचला ॥३९॥
प्राण त्यजून मांडव्य जात । यमलोकीं तो संतप्त । कोपरक्ताक्ष विचारित । यमास श्रेष्ठ जो नियामकांत ॥४०॥
मी काय ऐसें कर्म केलें । पापरुप जें मज बाधलें । ज्यायोगें सुळावरी चढविलें । महाशठा सांग मज ॥४१॥
ऐसें घोर दुःख मज प्राप्त । कां झालें तें सांग त्वरित । मांडव्यांचें क्रोधयुक्त । वचन ऐकून यम भ्याला ॥४२॥
हातांची ओंजळ जोडून । विनीतभावें बोले वचन । कर्म कोणतें घडलें हातून । मुनिवरा तुझ्या ऐक आतां ॥४३॥
बालपणीं तू एका कीटास । काटयानें वेधिलेस । त्याचें हें कर्मफळ पावलास । शूलाग्रीं स्वयं बैसोनीया ॥४४॥
ते ऐकतां संतापयुक्त । यमासी मांडव्य म्हणत । धर्मराजा जें बाळबुद्धीनें घडत । तें कर्म कैसें बंधनकर ॥४५॥
महामूर्खा जें अज्ञानें झालें । त्या पापाचें फळ कां दिलें । म्हणोनी तुलाही पाहिजे अवतरलें । धरातलीं नव नीतिविहीता ॥४६॥
शूद्र योनींत वर्षे शत । तूं जगशील मृत्युलोकांत । कर्मफळ भोगून यमलोकांत । पुनरपि तूं तें येशील ॥४७॥
सांप्रत मी भानुजा नियम करित । ती मर्यांदा पाळ सतत । आठ वर्षे पर्यंत । घडे तें कर्म निष्फळ धरी ॥४८॥
माझ्या वचनावरुन । गणराज प्रसादें नियमन । आठ वर्षांहून जें लहान । त्या बालकांचें कर्म निष्फळ ॥४९॥
यमास ऐसें आज्ञापित । नंतर मांडव्य स्वाश्रयीं परतत । एकाक्षर विधानें तोषवित । विघ्नपासी तो महामुनी ॥५०॥
कवचाच्या प्रसादें होत । शूलाग्र जे रुतलें हातात । मांसरुपें तें करांत । सामावून गेलें दुःख शमलें ॥५१॥
आणि मांडव्यक नामें ज्ञात । तेव्हांपासून तो मुनी जगांत । स्वल्पकाळें योगीश होत । गाणपत्यप्रिय मांडव्य ॥५२॥
नित्य गणपतीची मूर्ति पूजित । सदा गणेश भावज्ञ असत । सर्ववंद्य महायशवंत । ऐसें हें मांडव्य आख्यान ॥५३॥
मांडव्याचें हें चरित । पुण्यकारक जो नर ऐकत । अथवा पठन करी श्रद्धायुक्त । विघ्नेश प्रसन्न सदा त्यासी ॥५४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते नाम चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP