खंड ३ - अध्याय ५०
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्ण म्हणती युधिष्ठिरा । आतां ऐक सत्य धुंरधरा । देवादींची वनांतील तर्हा । पूर्णानंदाचें कार्यही ॥१॥
पूर्णानंद प्रतापवन्त । विष्णुमुख्य सुरांस म्हणत । आपण सारे दुःखपूर्ण चित्त । कोणत्या कारणें जाहलात? ॥२॥
ज्ञानारीनें जग समस्त । स्थावर जंगम दुःखमुक्त । केलें तया वधीन मी निश्चित । आता दुर्लभ काय तुम्हां ॥३॥
मी पुत्रत्व पावलों । विष्णुदेवा प्रसन्न अवतरलों । आता संरक्षणपर झालों । परत जा तुम्ही वैकुंठी ॥४॥
ज्ञानारी पुत्रनाशास्तव उद्यत । माझा तो असुरसुत महाभक्त । भक्तरक्षणार्थ त्वरित । स्वयं जाईन मी आतां ॥५॥
त्या दुष्टा ज्ञानारीस मारुन । स्वभक्तास सुख देईन । भय नसे चराचरापासून । म्हणोनि गर्व त्यास वाटे ॥६।
चराचरमय तें त्रैगुण्य असत । हें असे संशयातीत । म्हणून द्वंद्वविहीन रुप घेत । महाअसुरासी मारावया ॥७॥
आता स्वभक्तासाठी करीन । तें पहा कुहुहल महान । तिकडे ज्ञानारी खड्ग घेऊन । सुबोधा मारण्या धावला ॥८॥
क्रोधें संतप्त ज्ञानारीस पाहत । सुबोध परी होता शांत । तो गणेशभक्तिसंयुक्त । सांगे आपुल्या पित्यासी ॥९॥
ताता आपण अहंकारयुक्त । मायेच्या प्रभावी बुडालांत । म्हणून न जाणता चित्तांत । संस्थित त्या गणेशाला ॥१०॥
वेदवादि मतानुसार । चिंतामणि असे हा थोर । वेदांचे वचन प्रत्यक्ष अर्थपर । शरण त्यास जा तुम्हीं ॥११॥
अन्यथा आपुलें मरण । ओढवेल सुदारुण । तुमच्या भयें न सोडीन । कदापि मी विघ्ननायकासी ॥१२॥
तरी मूढपणे का वृथा श्रमतां । त्या सत्ताधार्यास कां न पाहतां । ऐसे त्यास पुत्र विचारितां । मारी तीक्ष्ण खड्ग तया ॥१३॥
तें खड्ग तीक्ष्णधार । परी सुबोधास ना वाटलें उग्र । त्याचें शरीर समग्र । निरबाध सुरक्षित ॥१४॥
तेव्हां नाना अस्त्रांचा वर्षाव । करी ज्ञानारी परी न पाडव । होई सुबोधाचा सद्भाव । निष्फल सारीं शस्त्रास्त्रें ॥१५॥
अग्न्यस्त्रादि निष्फल होत । असुरेंद्र तें पाहत । आश्चर्यचकित जाहला मनांत । तदनंतर करी मल्लयुद्ध ॥१६॥
पाय पकडून पुत्राचे त्या फिरवित । शिलेवरी त्वेषानें आपटित । तेव्हा स्वयेंचि पडत मूर्च्छित । मार बहू त्यास लागे ॥१७॥
अदृश्यभावें त्यास हाणित । विघ्नविनाश देव क्षणांत । पुन्हां जाग येतां पाहत । ज्ञानारी आपुल्या पुत्रास ॥१८॥
गणेशभजनांत तो रत । तें पाहून दुर्मती त्याचा तात । विचार करी स्वचित्तांत । परम अद्भुत काय हें ॥१९॥
मज कोण हा मारित । पाहूं न शके त्य महारिपूस जगांत । हया कुलांतकाचा अंत । स्वपुत्राचा कैसा करुं मी? ॥२०॥
पुत्राच्या मरणासाठी सतत । विविध प्रयत्न मीं करित । त्यासाठीं नाशिले दैत्यनाथ अमित । मित्रस्नेही अगणित ॥२१॥
एक मीं तरी मरेन । अथवा हया पुत्रास मारीन । काय करावें व्याकुल मन । ऐसें त्याचें जाहलें ॥२२॥
तत्क्षणीं त्यास विशेष ज्ञान । स्फुरलें वधार्थ महान । पुत्राचा रक्षक जो कोणी महान । प्रथम त्यासी मारावें ॥२३॥
नंतर मारावे सुतासी । रक्षक मरतां तयासी । पुत्रासी कोण रक्षील अंत्यक्षणासी । ऐसा संकल्प करी तो ॥२४॥
नंतर म्हणे क्रोधसंयुत । पुत्रासी तो मोहमोहित । असुर सुबोधा संबोधित । कुठे तुझा तो रक्षक? ॥२५॥
त्या महादुष्टा घेऊन येई । शठा मग पराक्रम माझा पाही । त्यास मोहमग्न पाहून सुतही । कारुण्यपूर्ण वचन सांगे ॥२६॥
ताता पहा आपुल्या हृदयांत । चित्तवृत्तिपालक तो अद्भुत । वैरभाव सोडून शरणागत । अहंकार सोडून व्हा त्याचे ॥२७॥
तरी ब्रह्मभूत व्हाल । सर्वत्र संस्थित त्यास पहाल । त्या स्वामी गजानना अमल । भावभक्तीनें जगांत ॥२८॥
परी जरी त्यास मारण्या उद्यत । झालात तरी मृत्यू क्षणांत । येईल तुम्हा संशयातीत । सत्य जाणा हें ताता ॥२९॥
तेव्हां पुनरपि त्यास म्हणत । महाभाग तो दाखवी मजप्रत । मी भजीन त्यास निश्चित । ऐसें कपटनाटक करी ॥३०॥
सुबोध तें जाणत । पित्यास्तव गणेशास स्मरत । तेव्हां मूषकारुढ येत । विष्णुपुत्र त्या जवळीं ॥३१॥
देव द्विज भयभीत । त्याच्या मागून सर्व येत । गुप्तरुपें आकाशांत । राहून आश्चर्य पाहती ॥३२॥
सुबोधासमीप जो संस्थित । त्या गणनायका पाहून संतप्त । महादुष्ट ज्ञानारी विचार करीत । वधोपाय मानसीं ॥३३॥
परी सुबोध प्रणाम करुन । विविध स्तोत्रें करी गायन । तो योगी बोले पित्यास वचन । पहा आतां हा गजानन ॥३४॥
सुबोधाचें वचन ऐकत । तेव्हां तो असुर क्रोधयुक्त । अमोघ सर्वसंहारक अस्त्र उगारित । तत्क्षणीं तो गणेशावरीं ॥३५॥
परी मध्यंतरी पूर्णानंद काय करित । जो होता ज्ञानारीच्या हृदयांत । त्या दैत्याचा जीवभाव आकर्षून घेत । युधिष्ठिरा लीलया तो ॥३६॥
एका निमिषार्धात पडत । भूमीवरी तो चैतन्यें त्यक्त । हाहाकार दैत्यगण करित । पाताळ लोकीं ते पळाले ॥३७॥
नंतर नभस्थ देव विप्रादि प्रकटत । पूर्णानंदासी प्रणाम करित । भक्तिभावें स्तवन करित । गणेश्वराचें त्या वेळीं ॥३८॥
ते स्तवन करीत असत । तेव्हां त्यांच्या समोरुन क्षणांत । सुबोधास घेऊन अंतर्हित । जाहले गणेश पूर्णानंद ॥३९॥
ते सर्व झाले खिन्न । लक्ष्मीनारायण मूर्च्छित उन्मन । धरणीतलावर कोसळून । वियोगदुःखें विलाप करिती ॥४०॥
पुत्रविरहें व्याकुळ होत । परी एक दोन मुहूर्तांत । त्यांच्या हृदयीं प्रकटत । म्हणे मात्यापित्यासी तो ॥४१॥
मी मूर्तिमंत अन्तःकरणांत । तुमच्या सदैव आहे रहात । माझा वियोग कदापि न घडत । विचार करा हा मानसीं ॥४२॥
ऐसें बोलून बुद्धिचालक होत । अंतर्धान एका क्षणांत । तेव्हां लक्ष्मीनारायण घडवित । मूर्ति त्या गणेशासी ॥४३॥
हया मूर्तीय्च्या भक्तींत । सदैव भजनीं निमग्न होत । आपुलें दुःख विसरत । स्वपुत्रविरहाचें महान ॥४४॥
ऐशापरी हा महोदर । सर्व प्रदाता उदार । प्रतापवंत हर्ता ब्रह्मभूयकर । ब्रह्मभूयप्रद तो ॥४५॥
शिव विष्णु आदी देव सेविती । भक्तिभावें मुनिगण जगतीं । योगीजन नाना प्राणी पूजिती । एकभावें तयासे ॥४६॥
महीपाला त्यास भजशील । तरी विघ्नहीन तूं होशील । स्वधर्मी राहून निर्मल । शांतियोग लाभशील ॥४७॥
ऐसें नारायण सांगत । युधिष्ठिर तेव्हां प्रेमयुक्त । महामती धर्मपालका म्हणत । कृष्णा ब्रह्मप्रदायिनी ॥४८॥
महाप्राज्ञा सांगितली मजप्रत । जी कथा सर्वकामप्रद असत । परिपूर्ण ती ऐकून चित्त । संतुष्ट झाले निःसंशय ॥४९॥
तुझ्या संगयोगें ज्ञात । गजानन जाहला मजप्रत । त्याचा मंत्र सांग पुनीत । स्त्रीबांधवांसहित मजला ॥५०॥
तेव्हां तो देवकीपुत्र देत । षडक्षर गणेशमंत्र अद्भुत । देवेश धौम्यमुखें तयांप्रत । समस्तांसी आदरें ॥५१॥
मुद्गल म्हणती दक्षाप्रत । पांडव तें द्रौपदीसहित । त्या मंत्राच्या जपें भजत । विघ्नपासी भक्तिभावें ॥५२॥
चतुर्थींचें व्रत करित । तेव्हां ते जाहले दुःखमुक्त । सूर्यापासून एक स्थाळी लाभत । अन्नदायक ते तात ॥५३॥
त्यामुळे विव्ह्द अन्नप्राप्त । बांधावा तेणें संवाधित । दुःखहीन होऊन वनांत । भ्रमण करीत ते होते ॥५४॥
व्यास वासुदेवांसमवेत । ते संचार करिती स्वानंदपुरांत । मयोरेशास तेथें पूजित । भक्तियुक्त हे सारे ॥५५॥
पांडवेशासी स्थापना करुन । पित्याचें श्राद्धदिव्रत पावन । तोषविती स्वपितरांसी प्रसन्न । थोर महिमा त्या स्थळाचा ॥५६॥
स्वानंदपुरांत पिंडदान । करितां पांडूस तत्क्षण । जाती सारे गणेशगण । आणण्या मित्रस्नेहयांसह ॥५७॥
गणेशविमानाने स्वानंदांत । ब्रह्मरुपी त्यास नेत । नंतर क्षेत्रज महिम्याने होत । पांडूचा निवास गणेशलोकीं ॥५८॥
नंतर एक वर्षे निर्विघ्न निवसत । पुढें सस्त्रीक प्रकट होत । पांडव पूर्ण करिती अज्ञातवास । युद्ध तदनंतर घोर करिती ॥५९॥
महाभारतीय युद्धांत । दुर्योधनादी वीरांस मारित । सैन्यासह कर्णादीस वधित । अंतीं राज्यलाभ झाला ॥६०॥
राज्य पुनरपि लाभत । तेव्हांही गणेशासी भजत । सर्वनायका अविरत । पांडव सारे द्रौपदीसह ॥६१॥
ऐशापरी युधिष्ठिर । आराधी नित्य महोदर । मोहशून्य स्वभावें उदार । योगी तो शांतिधारक ॥६२॥
पूर्णानंदाचा अवतार । अंतर्गत जेथ महोदर । ऐशापरी नाना अवतार । घेऊन क्रीडा दाखवी ॥६३॥
त्या अवतारांचें वर्णन । करण्यास अशक्य असून । अयुत वर्षे केलें कथन । तरी पुण्यचरित अवर्णनीय हे ॥६४॥
हें युधिष्ठिराचें चरित । पापनाशक पुनीत । वाचका पाठकासी जगांत । सर्व अर्थप्रद होईल ॥६५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते युधिष्ठिरचरितं नाम पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP