मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ३६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । कार्तवीर्य राजा स्नानार्थ जात । नंतर जमदग्नी म्हणे रेणुकेप्रत । भोजन देण्या सेनेसहित । नृपास निमंत्रण केलें असे ॥१॥
तेव्हां तीं उभयता स्मरती । कामधेनू स्वचित्तीं । ती येता त्यांच्यापुढती । पूजा करुनी प्रार्थिती तिला ॥२॥
कार्तवीर्य नृप सेनेसहित । भोजनार्थ निमंत्रित । आतां कल्याणी कर तूं त्वरित । व्यवस्था त्यांच्या भोजनाची ॥३॥
त्यांची प्रार्थना ऐकतां । कामधेनू रची स्वप्रभावता । परिवलयांकित महापूर तत्त्वता । निर्मिला चतुर्विध अन्नाचा ॥४॥
पाकशालिका निर्मिली क्षणांत । ती पाहून मुनी हृष्ट मनांत । शिष्यांस पाठवून बोलावित । सेनेसहित नृपासी तें ॥५॥
म्हणे त्वरा करावी आतां । झाली सर्व अन्नाची सांगता । तदनंतर नानाविध अन्नें तत्त्वता । सर्वांस भोजन दिलें मुनीनें ॥६॥
अमृत कल्परुप तें भोजन । जेऊन सर्वांचे तृप्त मन । फलकंदादी मुखशुद्धि लाभून । तांबूल भक्षण मग करिती ॥७॥
नंतर वस्त्रादिकांनी सत्कृत । मुनी करी त्या तृप्त । कार्तवीर्य स्वनगराप्रत । परत निघाला प्रसन्नमनें ॥८॥
महामुनीस करी प्रणाम । म्हणे झाला बहु आराम । जमदग्ने तुमची शक्ति अनुपम । आज प्रत्यक्ष अनुभविली ॥९॥
त्यासमयीं प्रधान विनयसंयुत । म्हणे नृपासी विशेषयुत । धेनू असे प्रभावयुक्त । एक हया ब्राह्मणाजवळी ही ॥१०॥
ती गाय आपण मागावी । रत्न असे ती गायींत बरवी । तिच्या विना थोर पदवी । महाराज तुमची व्यर्थ वाटे ॥११॥
राज्य सारें निष्फळ भासत । त्या धेनूविण वैभव रिक्त । त्याचें हें वचन ऐकून मोहयुक्त । विघ्नपीडित जाहला ॥१२॥
म्हणे सचिवास जाऊन त्वरित । मागावी धेनू मुनीप्रत । ती आज्ञा मिळता सैन्यासहित । दुष्ट सचिव निघाला ॥१३॥
मुनीसमीप जाऊन । प्रणाम तयासी करुन । म्हणे ही धेनू देऊन । तोषवी अतिथीनृपास ॥१४॥
तेव्हां जमदग्नी कोपयुक्त । मुनिसत्तम त्यास म्हणत । महामूर्खा हे अशक्य असत । देवस्वरुपी धेनू न देईन ॥१५॥
तें ऐकता तो महावीरांस आज्ञापित । धेनूस बांधून न्या त्वरित । त्याचे सैनिक आज्ञा पाळित । घेऊन गेले धेनूसी ॥१६॥
धेनूस आश्रमाबाहेर नेती । मुनीच्या क्रोध उपजला चित्तीं । गायही संतप्त झाली अती । निर्मिलें महासैन्य तिनें ॥१७॥
त्या सैन्यानें ठार मारिलें । प्रधानासहित सैन्य नष्ट केलें । तो वृत्तान्त ऐकतां क्रुद्ध झालें । कार्तवीर्याचें अंतःकरण ॥१८॥
युद्ध करण्या उद्यत । गेला तो जमदग्नीच्या आश्रमाप्रत । त्या समयीं महासैन्यातें वधित । धेनू आपुल्या सैन्यानें ॥१९॥
कार्तवीर्य होऊन खेदयुक्त । पळाला रणातून गर्वखंडित । कामधेनू स्वर्गीं परत जात । मुनी एकला वनीं होता ॥२०॥
जमदग्नि होता बेसावध । तेव्हां जाऊन करी वध । हृदयांत बाण मारुन विद्ध । कार्तवीर्य त्या मुनीचा ॥२१॥
रेणुका ते पाहून क्रोधयुक्त । नृपासी त्या निर्भर्सित । एकवीस बाण मारुन करित । सर्वांग तेव्हां विद्ध तिचें तो ॥२२॥
होऊन अत्यंत क्षुभित । त्या नृपाधमास ती म्हणत । राजा तूं मरशील स्वल्पकाळांत । यात संशय कांहीं नसे ॥२३॥
दुर्बुद्धे तुझे सहस्त्र हात । छेदून होतील भग्न त्वरित । हें ऐकता राजा परतत । भयोद्विग्न स्वनगरासी ॥२४॥
कार्तवीर्य गेल्यावरी रडत । करुणस्वरें विलाप करित । रेणुका स्मरण करी चित्तांत । आपुल्या प्रिय सुताचें ॥२५॥
परशुराम हा तिचा सुत । गेला होता बदरी आश्रमांत । मातेनें स्मरताच प्रकटत । तिच्या पुढयांत अविलंबे ॥२६॥
आपुल्या पित्यास मृत । पाहता तो रोदन करित । मातेच्या अंगावरी दिसत । बाणशल्यें रुपलेलीं ॥२७॥
ती शल्यें तैसे बाण । ओढून काढी तो तत्क्षण । रेणुका करी तेव्हां सुजाण । सांत्वन अपुल्या पुत्राचें ॥२८॥
म्हणे शोक न करी सुता । दत्तात्रेया आण आता । यथाविधि अंत्यसंस्कार तत्त्वता । करील तो या वेळीं ॥२९॥
आपण दोघे देहयुक्त । पुन्हा धरुया उत्साह चित्तांत । त्या दुष्ट नृपा मार निश्चित । सहस्त्रकर तोड त्याचे ॥३०॥
तेथ त्या नृपाच्या देहांतून । वाहील जें रक्त उसळून । त्यानें तर्पण करुन । आपुल्या जनका तोषवी तूं ॥३१॥
एकवीस बाण माझ्या शरीरांत । मारिले त्यानें अखंडित । म्हणोनी एकवीस वेळा जगांत । निःक्षत्रीय पृथ्वी तूं करी ॥३२॥
ऐसें सांगून स्वर्गांत । देह त्यागून रेणुका जात । दत्तास बोलावून करित । राम और्ध्वदेहिक पित्याचें ॥३३॥
पाचवे दिनीं कर्म करुन । दत्तात्रेय गेल स्वस्थाना परतून । भिक्षा मागण्या ते निघून । जाता काय आश्चर्य घडलें ॥३४॥
सहावे दिवशीं व्याघ्र येत । त्या जागी एक बळवंत । त्यास पाहून भयसंयुत । परशुराम स्मरे स्वमातेसी ॥३५॥
स्मरण करतांच ती येत । शिरमात्र दृश्य असत । तिला पाहून विस्मित । जाहला तेव्हां परशुराम ॥३६॥
रेणुका विचारी तयाप्रत । बाळा कां बोलाविलेंस आर्त । तुझ्या प्रेमें मी आलें त्वरित । व्याघ्र तें अन्तर्धान पावे ॥३७॥
एवढयांत दत्तात्रेय येत । रेणुकेस पाहून रामा सांगत । तूं कां बोलाविलें या स्थानाप्रत । रेणुकेंसी सांग बा ॥३८॥
केवळ शिर तिचें दिसत । न्यून देह ती निश्चित । तरी योग्य क्रियाकर्म त्वरित । करी आतां परशुरामा ॥३९॥
तेव्हां योगश्रेष्ठा दत्तात्रेयास । कथन करी वृत्तान्तास । सर्व कर्म यथासांग करण्यास । दत्तासह तो परशुराम ॥४०॥
बाराव्या दिवशीं करित । सपिंडीकरण श्रद्धायुत । पाथेय श्राद्ध अर्पित । तेराव्या दिनीं परशुराम ॥४१॥
तदनंतर दिव्य देहयुक्त । जमदग्नी आला आश्रमांत । परशुरामास आलिंगन देत । हृष्ट होऊन मुनिसत्तमा ॥४२॥
तेव्हां दत्त भावगंभीर । जमदग्नीस देई धीर । रेणुकेसही उत्साह पर । बोध करी गणेशाचा ॥४३॥
गणेशमंत्र राजाचें भजन । करा दोघे निष्ठा ठेवून । तरी विघ्नविहीन होऊन । शांतिरुप व्हाल तुम्हीं ॥४४॥
क्षत्रियाच्या हस्तें मरण प्राप्त । तुम्हांसी म्हणोनी शांति न लाभत । विघ्नराजा न जाणता न होत । दुःखौघाचा नाश जगीं ॥४५॥
ऐसें सांगून त्यांसी देत । गणेशमंत्र एकाक्षर तयांप्रत । तो जपता ती उभय होत । तपोयुक्त तेजःपुंज ॥४६॥
दत्त हर्षसमन्वित । आपुल्या आश्रमीं परम जात । मातापित्यांच्या सेवेंत रत । परशुराम तेथेंचि राहिला ॥४७॥
जमदग्नि रेणुका पुनः जीवित । झाले ऐसा प्रभाव अद्‌भुत । संस्कारकर्मांचा साक्षात । परशुरामें अनुभविला ॥४८॥
जरी पुनजींवन झालें प्राप्त । परी चित्त होते अशांत । त्या उभयतासी लाभत । परम शांति गणेशमंत्रें ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते रेणुकाजमदग्निसंजीवनकरणं नाम षट्‌त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP