खंड ३ - अध्याय ३०
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । मुद्गल दक्ष प्रजापतीस सांगती । कथा अति रंजक जगतीं । आयूस पाच सुत होती । स्वर्भानूच्या सुतेपासून ॥१॥
दृढ विक्रम तेजयुक्त । प्रभेचे ते सर्व सुत । नहुष ज्येष्ठ त्यांच्यांत । शक्रतुल्य पराक्रमी ॥२॥
सर्व राजांस त्यानें जिंकिलें । शंभर यज्ञ त्यानें केलें । इंद्राचें मन क्षुभित झालें । परी तो कांही करुं न शके ॥३॥
राजा तो सर्व शास्त्रें जाणत । तेणें इन्द्र झाला शांत । गौतम महेंद्रा शापित । स्त्रीस भरष्ट केलें म्हणून ॥४॥
इंद्र भरष्टराज्य होत । देव सारे भयातुर होत । दैत्यांचा उग्र वेग असह्य होत । त्या समयीं तयांना ॥५॥
बृहस्पति जवळी जाती । क्षेमसाधन विचारिती । गौतम मुनि तया सांगती । नहुषासी स्वर्गराजा करा ॥६॥
तेजस्वी श्रेष्ठ नहुष होत । स्वर्गमंडळाचा इंद्र उन्नत । इंद्रासनीं तो बैसत । पालन करी सुरांचें ॥७॥
देव मुनि वर देती त्यासी । तूं ज्याकडे क्रोधें पाहसी । सत्ताहीनता तयासी । लाभेल त्वरित निःसंशय ॥८॥
नंतर अति तेजयुक्त । नहुष नराधिप तो होत । देवादी त्यास सेवित । अति गर्व झाला तयासी ॥९॥
तो स्त्रीसंगाचा लालसी होत । शचीचा सहवास वांछित । पाठवी देवांस त्वरित । आणावया शचीसी ॥१०॥
तेव्हां शची म्हणे देवांस कुपित । मी येणार नाही सांगा नहुषाप्रत । इंद्राची मी पत्नी असत । परपुरुषासी न सेवीन ॥११॥
ऐसें सांगून देवांप्रत । बृहस्पतीच्या घरीं जात । शची तयासी विनवित । सुनेचें रक्षण करा म्हणे ॥१२॥
तिची प्रार्थना ऐकून । देवगुरु तिज आश्रय देऊन । गौतमाजवळीं जाऊन । विनंती करी तयासी ॥१३॥
महेंद्रासी करावें शापहीन । माझें वचन मानून । तेव्हां गौतम म्हणे उन्मन । काय करुं तें सांग मजला ॥१४॥
उपाय मज तात सांगाल । तो मी झणीं करील सबल । तेव्हां बृहस्पति सागे युक्ति निर्मल । गौतमासी सुखप्रद ॥१५॥
विनायकाचा मंत्र इंद्रापत । द्यावा गौतमा पुनीत । तें मानून इंद्राप्रत । दिधला गौतमें गणप-मंत्र ॥१६॥
त्या मंत्राचा जप करित । देवदेवेशा गणेशास ध्यात । उत्तम तप आचरित । विदर्भप्रांतीं निर्जन वनीं ॥१७॥
वायुभक्षण करुन राहत । नासिकाग्रदृष्टी न्यस्त । विघ्नपासी तो पूजित । ऐसी गेलीं सहस्त्र वर्षे ॥१८॥
तेव्हां भक्तवत्सल गजानन । वर देण्या आला प्रसन्न । इंद्राच्या तपें तोषून । सिंहारुढ तो महाबाहू ॥१९॥
चतुर्भुजांनी विराजित । होता सिद्धिबुद्धींनो युत । नाभीवरी शेष रुळत । गजाननाच्या त्या वेळीं ॥२०॥
इंद्रासी जागें करुन । तपश्चर्येत जो होता निमग्न । म्हणे माग वरदान । मनोवांछित सांप्रत ॥२१॥
तेव्हां इंद्र करी वंदन । भक्तियुक्त मनें पुजून । सुस्थिर चित्तें स्तवन । यथामति करी गजाननाचें ॥२२॥
गणाध्यक्षा भक्तसिद्धिदायका । देवा हेरंबा विनायका । अनादि सर्वादी आदिपूज्या पालका । विघ्नेशा सर्वपूज्या नमन ॥२३॥
आदिमध्यान्त हीनासी । आदिमध्यमयासी । अंत्यरुपासी देवेशासी । विघ्नहर्त्यासी नमन असो ॥२४॥
पांशाकुशधरासी अमेयासी । सिंहवाहनासी नाना मायाधरासी । अभक्तांना विघ्नकर्त्यासी । सदा स्वानंदवासीसी नमन ॥२५॥
सिद्धिबुद्धिपतीसी नाभिशेषासी । ब्रह्मासी ब्रह्मरुपासी । ब्रह्मदात्यासी कृपालवासी ।पूर्वासी पूर्णभावज्ञा नमन ॥२६॥
धर्मअर्थकाममोक्षदात्यासी । पूर्णानंद प्रदात्यासी । कर्त्यासी, हर्त्यासी, सुपात्रासी । गणेशासी नमन असो ॥२७॥
सूक्ष्मांत सूक्ष्मरुपासी । स्थूलांत स्थूलभोक्त्यासी । स्थूलसूक्ष्मादि हीनासी । लंबोदरा तुज नमन असो ॥२८॥
तुझी काय मीं करुं स्तुति । तूं सदा शांतिरुप जगतीं । म्हणोनि करुं तुज प्रणती । त्यानें तुष्ट हो दयाकरा ॥२९॥
ऐसी स्तुति ऐकून । मघव्याची भक्ति पाहून । गणेश बोले प्रसन्नमन । भक्तोत्तमा त्या वेळीं ॥३०॥
इंद्रा तुझें हें स्तुतिस्तोत्र मजप्रत । जाहलें प्रिय अत्यंत । भुक्तिमुक्तिप्रद निश्चित । होईल वाचकां श्रोत्यांसी ॥३१॥
देवेंद्रा तूही नित्य वाचन । करी या स्तोत्राचें पावन । तेणें होशील विघ्नविहीन । महामते महाभागा ॥३२॥
तुझ्या स्तोत्रानें मीं तुष्ट असत । वर माग जें ईप्सित । तें पुरवीन समस्त । तेव्हां इंद्र प्रणाम करी ॥३३॥
म्हणे करांजली जोडून । मजला करी निर्विघ्न । माझे इंद्रपद मज लाभून । तुझी भक्ति दृढ करी ॥३४॥
तुझ्या पदकमली जडावें मन । हें क्षेत्र लाभो माहात्म्य महान । गणेश क्षेत्रांत श्रेष्ठत्व पावन । सर्वार्थप्रद हें तीर्थ करी ॥३५॥
तुझ्या पदाचा स्पर्श होऊन । तीर्थ हें तुझें पावन । करितां यात विधिवत् स्नान । स्वानंदप्राप्ती जनां व्हावी ॥३६॥
कदंब नाम तीर्थक्षेत्रांत । हें गणेश तीर्थ व्हावें ख्यात । विघ्नपा तुझ्या प्रसादें चिंतित । भक्तजनांचे पूर्ण व्हावें ॥३७॥
तथास्तु ऐसें वरदान । देऊन गणेश पावला अंतर्धान । तेव्हां करी संस्थापन । गणनाथाची मूर्ति इंद्र ॥३८॥
त्या मूर्तीची पूजा करुन । तेथ राहिला ध्यानमग्न । गणनायकाचें करी मनन । आनंद चित्तीं तयाच्या ॥३९॥
आतां नहुषाचा वृत्तान्त । दक्षा सांगतों तुजप्रत । गणेश त्या नृपासी करित । विघ्नयुक्त तदनंतर ॥४०॥
बृहस्पतीसी नहुष सांगत । इंद्र झाला असावा मृत । तो जनांसी कोठें न दिसत । शची द्यावी मज आतां ॥४१॥
वाक्यप्ति बृहस्पति त्यास म्हणत । होउनी क्रोधसमन्वित । ब्राह्मणांनी वाहिल्या पालखींत । बैसोनि जाई शचीप्रती ॥४२॥
नाना वाहनांतून देवेंद्र नेलें । आजपर्यंत कौतुक केलें । अपूर्व वाहन मनीं इच्छिलें । शचीनें ऐसे मज कळलें ॥४३॥
म्हणोनि तैसें करावें सांप्रत । नहुषासी तें मान्य होत । तो तैसेंचि करी मदोन्मत । ब्राह्मणांसी बोलाविलें ॥४४॥
तो दुरात्मा बलात्कार करित । द्विजांसी पालखीस जोडित । त्यांच्या चित्तीं दुःख बहुत । तेथ आला आत्रेय ॥४५॥
त्या दुर्वासासी जोडित । पालखी वाहण्या आज्ञा देत । नहुष द्विजभोयासी म्हणत । शीघ्र गतीनें चला तुम्ही ॥४६॥
शचीच्या महालाप्रत । पालखी न्यावी माझी त्वरित । ‘सर्पध्व’ ऐसें संस्कृतांत । सांगे मोहसंयुक्त तो ॥४७॥
लाथ मारी दुर्वासाप्रत । तो मुनि होत अत्यंत कुपित । शाप सुदारुण देत । ‘सर्पं हो तूं महादुष्टा ॥४८॥
सर्प होऊन पड भूवर । ऐसा शापि अति उग्र । दुवार्समुखांतून ऐकतां नृपवर । गर्वहीन तो जाहला ॥४९॥
पालखीतून खालीं उतरत । दुर्वासासी प्रणाम करित । म्हणे उःशाप द्यावा मजप्रत । दया करी कृपाळा ॥५०॥
धिक्कार असो माझा जगांत । ब्राह्मणाच्या विपरीत । वागलों मीं मोहें उद्धत । आतां तारी महामुने ॥५१॥
तेव्हां पाहून त्यास संतप्त । मुनिसत्तम दुर्वास म्हणत । मनीं होऊन दयावंत । तुझ्या वंशी जन्म घेईल ॥५२॥
नहुषा धर्म साक्षात । युधिष्ठिर रुपें जेव्हां जगांत । तेव्हां त्याचें दर्शन तुजप्रत । तारक होईल निःसंशय ॥५३॥
त्यानें कथिलेलें ज्ञान । ऐकतां होशील शापहीन । तोपर्यंत सर्प होऊन । महीतलावरी राहशील ॥५४॥
राजा द्विजगण सदा जगांत । पूजनीय सर्व जनांप्रत । त्यांच्या अपमानें पापयुक्त । वाहक त्यांना करुन ॥५५॥
हया कृत्यानें अति धर्मलोप झाला । तेणें तुज शाप मिळाला । धर्माचें निरीक्षण करतां तुजला । धर्मसंपन्नत्व लाभेल ॥५६॥
ऐसें बोलून दुर्वास जात । स्वेच्छापरायण स्वाश्रमाप्रत । नहुष सर्प होऊन पडत । धरणीतलावर तत्क्षणीं ॥५७॥
तदनंतर इंद्रासी आणून । इंद्रासनावरी बैसवून । देवांसहित करी सन्मान । बृहस्पति तयाचा ॥५८॥
नहुष सर्परुपें वनांत । गणेशा स्मरुन चित्तांत । स्वच्छन्दें होता फिरत । म्हणे विघ्नयुत सर्व जग ॥५९॥
विघ्नेशें मज विघ्नसंयुक्त । केलें असे निश्चित । त्यासी आतां शरण जात । तरी सर्व शुभ होईल ॥६०॥
त्या नहुषानें जिंकिलें । गणेशस्मरणें चित्त आपुलें । गाणपत्य भक्तियुक्त झालें । जीवन सप्र देहधराचें त्या ॥६१॥
ऐसा बहुत काळ जात । युधिष्ठिर त्या वनांत येत । भावांसहित द्रौपदीयुक्त । द्यूतदोषानें जेव्हां ॥६२॥
फळें संग्रहकरण्या जात । भीम तेव्हां त्या वनांत । नहुष त्यास ओळखून जखडित । आपुल्या वेटोळ्यांत सत्वर ॥६३॥
आपुल्या अंगानें आवृत । भीमास भूतळीं पाठवित । बलशाली भीम ओरडत । उच्चरवें त्या समयीं ॥६४॥
मेघगर्जनेसम नारद होत । तो धर्मंराज ऐकत । सत्वर भीमासमीप जात । काय जाहलें पहावया ॥६५॥
भीम सर्पानें वेष्टित । पाहून दुःख समन्वित । तेव्हां तो महाबळ नाग म्हणत । युधिष्ठिरासी ऐसें वचन ॥६६॥
मीं नहुष नामा असत । पुत्रा तुझ्या दर्शंना उत्कंठित । भीमासी पकडिलें या वनांत । तूं तेथ आलास म्हणोनी ॥६७॥
मीं आतां प्रश्न विचारीन । त्याचें योग्य उत्तम देऊन । जरी संतोषवशील माझें मन । तरीच भीमास सोडीन ॥६८॥
तूं सर्वज्ञ ऐसी कीर्ति जगांत । म्हणोनी ही परीक्षा घेत । नहुषाचें वचन ऐकून हर्षित । युधिष्ठिर म्हणे तयासी ॥६९॥
महाभागा आपुल्या वंशांत । तूं अससी पूर्वज भूषणभूत । नागरुपा विचारी त्वरित । संशयप्रश्न आपुले ॥७०॥
हे पूर्वजा तूं मान्य असत । तुझ्या प्रसादें मज जें ज्ञात । तें मानदा तुजप्रत । सांगेन मी यथामति ॥७१॥
तेव्हां नहुष तया विचारित । कोणतें अनृत । पाप बंध मोक्षरुप जगांत । योग ध्यानरुपं कोणतें? ॥७२॥
कर्म कोणतें अकर्म कोणतें । विकर्म कोणतें ज्ञान कोणतें । तपोमूल काय असतें । दैवत ते मज सांगावें ॥७३॥
कोणतें सार काय असार । मान्य कोणतें भूवर । अवमान्य काय तें सत्वर । युधिष्ठिरा सांग मजला ॥७४॥
हया प्रश्नांची उत्तरे देशील । तरी भीमा सोडीन मी महाबळ । स्वेच्छेनें मी जाईन यथाकाल । सर्वज्ञत्व तुझें जाणून ॥७५॥
युधिष्ठिर तेव्हां उत्तर देत । म्हणून सत्य तें ब्रह्म जगांत । जग असे अनृत । धर्म म्हणजे स्वधर्म ॥७६॥
राजसत्तमा ऐसें ज्ञान । पाप तें स्वधर्महीन । मी माझें हा भाव बंध असून । तो सुटणें हा मोक्ष असे ॥७७॥
चित्तरोध योग ख्यात । निर्विषय मन ध्यान असत । कर्म म्हणजे सत्कर्म विज्ञात । ऐसें विबुधीं जाणावें ॥७८॥
ब्रह्मार्पणणात्मक सर्व अकर्म असत । विकर्म तें पापाचरण ज्ञात । सर्व शास्त्रें ऐसें सांगत । मी ब्रह्म हें ज्ञान असे ॥७९॥
द्वंद्व समात्मक तप ख्यात । गणेश सर्व पूज्य दैवत । देवाचें भजन सार असत । नवधा तें प्रकीर्तित ॥८०॥
विषयांचें नवधा भजन । असार तें अपावन । वेद पुराणांचे वचन । स्मृतिवचन मान्य असे ॥८१॥
वेदाधारविहीन असत । तें अवमान्य जगांत । सर्वेश संस्थित हृदयांत । बुद्धि प्रचालक जाणावा ॥८२॥
ऐसें सर्व तुज सांगितलें । आतां अनिलात्मजाते पाहिजे सोडिलें । एवढयांत तेथ आलें । सहसा एक दिव्य विमान ॥८३॥
दिव्यभोगें समायुक्त । विमान अवतरलें पुढयांत । युधिष्ठिर तें पाहत । नहुषें सोडिलें भीमातें ॥८४॥
सर्पदेहाचा त्याग करित । नहुष चढला त्या विमानांत । तदनंतर तो जात स्वर्गांत । विराजला अर्धासनी इंद्रांच्या ॥८५॥
अनन्यचित्तें गणेशासी भजत । स्वर्गसुख भोगून अंती जात । शुक्ल गतीनें गजाननाप्रत । विघ्नहीन तो जाहला ॥८६॥
पुण्यश्लोक म्हणून ख्यात । जाहला नहुष जगतांत । पापनाशक त्याचें चरित । कामप्रद वाचकां श्रोत्यांसी ॥८७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते नहुषचरितं नाम त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP