यावर दक्षिण किंवा वामकुक्षीस तिळासहित तीन कुश परिधान केलेल्या वस्त्राच्या शेवटास बांधून कटीस संलग्न झालेल्या वस्त्राच्या बाहेरच्या भागाने वेश्टन करून रक्षण नामक नीविबंध 'निहन्मिसर्वयदमेध्यवद्भवे ' या श्लोकमंत्राने करावा. अपसव्याने 'अपहता' या मंत्राने अप्रदक्षिण कर्म करावे, व 'उदीरता' या मंत्राने सर्वत्र तिल टाकून सव्याने प्रोक्षण करावे. 'तिलारक्षन्तु' या मंत्राने श्राद्धभूमीचे द्वारदेशी कुशयुक्त तिळ टाकावे. 'तरतसमदी' या सूक्ताने व पावमानी या ऋचांनी उदक अभिमंत्रण करून त्या उदकाने पाकादि पदार्थ प्रोक्षण करावे. अथवा 'तद्विष्णो०' या मंत्राने किंवा गायत्री मंत्राने किंवा 'यद्देवा' या मंत्राने उदक अभिमंत्रित करावे. अन्यशाखीयांनी तीन मंत्रांनीच अभिमंत्रण करावे. पाक पवित्र झाला आहे असे ब्राह्मणांकडून म्हणवून मग त्या अभिमंत्रित उदकाने पुष्पादिक पूजेचे सर्व उपचार प्रोक्षण करावेत. श्राद्धकाळी प्रोक्षणरहितपदार्थास स्पर्श करू नये. प्रोक्षणाचे उल्लंघन झाल्यास त्या मंत्राचा जप करावा. पदार्थ योग्यता बोलविल्यावर देवांची पूजा करावी. प्रत्येक उपचार समर्पण करताना देवांकडे व पितरांकडे उपचाराचे आद्यंती उदक द्यावे. देवस्थानी असलेल्या ब्राह्मणाच्या सन्निध उत्तराभिमुख बसून त्या ब्राह्मणाचा उताणा दक्षिण हात डाव्या हाताने धरून उजव्या हाताने यवासहित दोन दर्भ
'अमुकेषां विश्वेषां देवानां भुर्भुवःस्वरिदमासनं स्वाहा'
असे म्हणून हातवर उदक सिंचन करून दक्षिणभागी आसनावर द्यावेत. हातावर दर्भ देऊ नयेत. आसनाचे ठायी आसन द्यावे. ब्राह्मणाने 'धर्मोसि विसिराजाप्रतिष्ठितः' या मंत्राने घेऊन स्वासनं असे प्रतिवचन द्यावे, व त्याने आसनास स्पर्श करून उदक देऊन 'आस्यतां' असे म्हटल्यावर ब्राह्मणाने 'धर्मोसि' असे म्हणावे. नंतर उदक देऊन 'दैवेक्षणःक्रियतां' असे म्हणून अंगुष्ठरहित हस्त धरावा. 'ओंतथा' इत्यादि पूर्वी सांगितल्याप्रमाणे जाणावे. हे तिसरे निमंत्रण होय.