वैश्वदेवस्थानी सम व पित्र्यस्थानी विषम ब्राह्मण असावेत असे असल्यामुळे वैश्वदेवाकडे दोन व पितृपार्वणी तीन मिळून पाच ब्राह्मण असावेत, किंवा देवस्थानी ४ व पार्वणस्थानी पिता इत्यादिक जे ३ त्या एकेकास तीन तीन मिळून १३ ब्राह्मण असावेत; किंवा पिता इत्यादिक एकेकास ५।५ असे सर्व मिळून १९, किंवा एकेकास ७।७ मिळून २५ ब्राह्मण असावेत. याप्रमाणे दर्शादि श्राद्धी पार्वणे अधिक असतील तर ब्राह्मणही अधिक सांगावे. म्हणजे वैश्वदेवस्थानी २ किंवा ४ बसवून पिता इत्यादिकांच्या एकेकाच्या ठिकाणी १।३।५।७ किंवा ९ बसवावेत असे तात्पर्य. श्राद्धविस्तर केला असता सत्क्रिया, देश, काल, द्रव्य, ब्राह्मण, संपत्ति व शुचिर्भूतपणा यांचा नाश होतो. यापक्षी अथवा असामर्थ्य असता देवस्थानि एक व पितृपार्वणी एक मिळून २ सांगावे. श्रीमद्भागवतात तेच सांगितले आहे. देवकार्यी २ व पितृकार्यी ३ किंवा देवाकडे १ व पितराकडे १ असे ब्राह्मण भोजनास सांगावे. सुसमृद्ध असला तरी श्राद्धाचे ठायी विस्तार करु नये. स्वकीयाप्तांस भोजनास सांगितल्याने जो विस्तार त्याने देश, काळ, उचितश्रद्धा, द्रव्ये, पात्रे, पूजा, ही यथाविधि घडत नाहीत; यावरून देवस्थानी २ व पित्र्यस्थानी १ असे तीन ब्राह्मणांचा जो पक्ष तो निर्मूळ समजावा. देवस्थानी २ अथर्वण वेदी ब्राह्मण पूर्वाभिमुख बसवावेत. पित्र्यस्थानी ऋग्यजुः सामवेदी असे उत्तराभिमुख तीन ब्राह्मण बसवावेत. अत्यंत असामर्थ्य असेल तर दोन पार्वणी १ ब्राह्मण सांगावा.