आता हवि म्हणजे श्राद्धास शुद्ध पदार्थ कोणते, ते सांगतो. व्रीहि, जव, तिल, उडीद गहू, सावे, प्रियंगू, मूग, मोहरी हे पदार्थ श्राद्धास प्रशस्त होत. चणे विकल्पाने प्रशस्त आहेत. जोंधळेही विकल्पाने प्रशस्त आहेत. इष्टापूर्त, मृत, दिवस, दर्शश्राद्ध, नांदीश्राद्ध, अष्टकाश्राद्धे या काली ब्राह्मणास निंद्य पदार्थाचे भोजन देऊ नयेच. ज्यात गहू, उडीद, मूग व तैलपक्व पदार्थ नाहीत ते श्राद्ध केले तरी न केल्यासारखेच होय. राजमाष, पावटे व वाटाणे हेही प्रशस्त होत. मराठी भाषेत राजमाशास चवळी, निष्पावास पावटे, व सतीनकास वाटाणे असे म्हातात. केळी, आंबे, सुरण तीन प्रकारचे फणस, काकडी व कोशातकी म्हणजे दोडकी हे प्रसिद्ध आहेत. कुस्तुंबुरु (कोथिंबीर) वैकल्पिक होय. पडवळ, बोरे, आवळे, खजूर, चिंच, आले, सुंठ, मुळा, द्राक्षे, लवंगा, वेलदोडे, पत्री, जिरे, हिंग, डाळिंब, ऊस, साखर, गूळ, कापूर, सैंधव, समुद्रलोण, सुपारी, नागवेलीची पाने, हे पदार्थ श्राद्धास प्रशस्त होत. गाईचे दही व दूध, गाईचे व म्हशीचे तूप, हेही प्रशस्त होय. म्हशींचे ताक ताबडतोब केलेले असून त्यातून लोणी काढलेले नसलेले ग्राह्य आहे. असे काही ग्रंथकार म्हणतात. म्हशीचे, दूध, साखर वगैरे घालून घ्यावे, असे आही ग्रंथकाराचे मत आहे. निर्जल असे घुसळलेले दही सर्वत्र निषिद्ध होय. ईडानिंबू विहित व निषिद्ध असल्यामुळे वैकल्पिक आहे. अक्रोड, शृंगाटक म्हणजे शिंगाडे, चिर्भट म्हणजे खरबूज, शीत कंदली म्हणजे राताळी, हे विहित होत. आम्रातक म्हणजे आंबाडा, तंदुलीय म्हणजे (तांदुळज), माठ हे दोन विहित प्रतिषिद्ध जाणावेत. काळे मुगाशिवाय इतर मूग, चवळी व काळे पावटे हे निषिद्ध होत, असे काही ग्रंथकार म्हणतात. कदाचित् भोजनात ब्राह्मणास मध न वाढला तर चालेल, पन मधाशिवाय पिंड कधीही देऊ नये. अक्षता कन्या, गोरुपपशु, श्राद्धामध्ये मांस व मध आणि देवरापासून पुत्रोत्पत्ति ही पाच कलीत वर्ज्य होत, असे वचन असल्यामुळे मधाविषयी इच्छेनुरूप विकल्प आहे. कित्येक ग्रंथकार 'स्वकीय आचारानुसार मध मांस इत्यादि द्यावे' असे वचन असल्यामुळे देशाचारानुरोधाने व्यवस्थित विकल्प आहे, असे म्हणतात. श्राद्धात मांस देऊ नये, कारण कलियुगात मांस वर्ज्य सांगितले. व धर्मतत्त्ववेत्त्या पुरुषाने श्राद्धात मांस देऊ नये. व खाऊही नये, असे श्रीभागवतवचनही आहे. खारा, रानसुरण, वेखंड, कशेरू व काळेय इत्यादि बरेच पदार्थ मोठ्या निबंधग्रंथातही सांगितले आहेत, पण ते अप्रसिद्ध असून श्राद्धास निरुपयोगी असल्यामुळे सांगत नाही.