मातामह, माउतुळ, भागिनेय, दौहित्र, जामाता, गुरु, शिष्य, यजमान, श्वशुर, ऋत्विज, शालक, आतेबंधु, मावसभाऊ, मामेभाऊ, अतिथि, सगोत्री व मित्र हे मध्यम होत. दौहित्र, जामाता, भगिनीपुत्र हे विद्यादि गुणांनी युक्त असून यांस श्राद्धास निमंत्रण न केले तर दोष आहे; गुणहीन असल्यास दोष नाही. सहा पुरुषाच्या अलीकडे सगोत्री; श्राद्धास निमंत्रण करण्यास योग्य नाहीत. परगोत्री न मिळाल्यास सहा पुरुषापलीकडचे गोत्रजही भोजनास (क्षणास) सांगावे. याविषयी विशेष ऋत्विज सपिंडसंबंधी व शिष्य यांची योजना देवस्थानी करावी, पितृस्थानी करू नये. याप्रमाणे दुसरेही गुणहीन ब्राह्मण देवस्थानी योजावे. पिता, पितामह, भ्राता अथवा पुत्र किंवा सपिंडक हे परस्पर पूज्य नाहीत; म्हणजे परस्परांस श्राद्धास सांगू नये. त्याचप्रमाणे ऋत्विजही श्राद्धांमध्ये पूज्य नाहीत. हे जर अत्यंत गुणवान असतील तर त्यांस देवस्थानी योजावे.