जेथे बहुवचनान्त पितृशब्द असेल तेथे पितृशब्द सर्व पितृवाचक असल्यामुळे ऊह करू नये. जसे अर्घ्यपात्राचे ठायी 'पितृनिमान प्रीणय' या स्थानी मात्रादिकांचे श्राद्धात 'मातृन्' असे म्हणू नये. त्यातही शुंधन मंत्रात 'शुंधन्ता पितरः शुंधन्तां पितामहः' इत्यादि व 'शुंधन्तां मातरः' इत्यादि ऊह करावाच. पण बहुवचनी ऊह करू नये. कारण, प्रथम मंत्रांतच पूज्यत्वाचा अर्थ आहे. ऋग्वेदाविषयी ऊह करू नये. असा निषेध असल्याने ऋग्वेद मंत्राचे ठायी ऊह करू नये. पिंडदानामध्ये 'येचत्वा मत्रानुतेभ्यश्च' या स्थलि मातृश्राद्धी 'याश्चत्वामत्रानुताभ्यश्च' असा ऊह करू नये. स्त्रियांमध्ये स्त्रिया व पुरुष अनुयायी होत. कारण पुमान स्त्रिया या सूत्राने स्त्रिया सहोक्ती असता पुल्लिंग शेष राहते असे वृत्तिकार म्हणतो. काही ग्रंथकार असे म्हणतात की, 'याश्च' इत्यादिक ऊह करावा. माता इत्यादिक दोन असतील तर पिंडदानामध्ये 'एतद्वामस्मन्मातरौ यज्ञदाश्री देयेच युवामत्रानु...." असा ऊह करू एक पिंड देऊन 'अस्मन्मातृभ्याअयं पिंडः' इत्यादि उच्चार करावा. अभ्यंजनाचे वेळी 'अस्मन्मातरौ० अभ्यंजाथां व अंजनाचे वेळी 'अंजाथा' याप्रमाणे पितामही व प्रपितामही दोन दोन असताही असाच ऊह करावा.
बहुत माता असतील तर "एतद्वोस्मन्मातरौ यज्ञदे श्रीदे रुद्रदे यथानामगोत्रा येच युष्मानत्रानु" असा ऊह करून एक पिंड देणे, इत्यादि जाणावे. अभ्यंजन करताना अभ्यंग्ध्वं व अंजन लावताना अंग्ध्वं, इत्यादि जाणावे. एक नाम असता एकच नाम द्विवचनान्त किंवा बहुवचनान्त उच्चारावे. आता अर्घ्यदानकालीही 'अस्मन्मातरौ' इत्यादिक ऊहाने संबोधन करून 'इदंवामर्घ्यमिदं वो अर्घ्य' असा ऊह जाणावा. त्याचप्रमाणे 'आयंतुनः पितरः सो० तिलोसि सोमदेवत्यो० उशन्तस्त्वानि०' पिंडानुमंत्रण, दशादान, उपस्थान, प्रवाहण, प्राशन, इत्यादिकांचे मंत्र बहुवचनान्त पितृपदांनी युक्त असल्याने त्यामध्ये ऊह नाही, हे सिद्ध झाले. प्रोक्षणविरहित वस्तूला स्पर्श करू नये. मानुषी वाणी उच्चारू नये. भोजन करणार्या ब्राह्मणांकडे अवलोकन करू नये व अश्रू पाडू नये. दैवकर्म, पित्र्यकर्म, जप, होमादिक कर्मे यांचे ठायी प्रयत्नाने मौन धारण केल्याने कर्माचे सर्व फल मिळते. जप, होम, पूजा इत्यादि कर्मात मौनाचा लोप झाल्यास वैष्ण्वमंत्राचा उच्चार करावा किंवा सनातन विष्णूचे 'यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपोयज्ञ क्रिया दिषु न्यूनं संपूर्णतां याति सद्योवंदेतमच्युतं', या मंत्राने स्मरण करावे. श्राद्धाच्या आरंभी, मध्ये व अंती विष्णुनाम इत्यादिकांचा उच्चार करावा.